सौंदर्य आणि स्त्री या अजोड आहे. सौंदर्यासाठी स्त्रीची लालसा अगदी आदीम काळापासून आहे. प्राचीन काळातील स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी सुगंधित उटण्याने किंवा पाण्यात गुलाब पाकळ्या टाकून स्नान करीत असत. थोडक्यात सौंदर्यलालसा चिरतरूण आहे.
आताच्या काळात तर सौंदर्याच्या नावाने एक बाजारपेठ निर्माण झाली आहे. अनेकविध सौंदर्य प्रसाधने या बाजाराचा हिस्सा आहेत. सौंदर्य वाढविण्याचे प्रत्येक साधन हे कुठे ना कुठे रचनात्मकता व कल्पकतेशी जोडले गेले आहे. मग वेगवेगळ्या पध्दतीच्या केशरचना असो किंवा कपाळावर लावण्यात येणार्या विविध आकारातील टिकल्या, किंवा 'नेल आर्ट' मधील चमकते तारे. शरीराच्या प्रत्येक भागाला सौंदर्याचा स्पर्श व्हावा यासाठी स्त्रिया अत्यंत जागरूक असतात. मग नखासारखा अतिशय लहान भाग का असेना. नखे सुंदर दिसण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने सजविले जाते.
नेल आर्टचा अर्थ वेगवेगळ्या पध्दतीने नखे सजविणे हा होय. मूळ रूपात याला आर्टिफिशिअल नेल टेक्नॉलॉजी म्हटले जाते. अमेरिकेत जवळपास 30 वर्षांआधी याची सुरूवात झाली. यात रंगबिरंगी नेलपेंटपासून छोटे छोटे तारे, मोती यांचा वापर केला जातो. यासाठी ब्यूटी पार्लरमध्ये वेगळी जागा राखून ठेवली जाते. स्त्रिया वाट्टेल तितके पैसे खर्च करून नखे सजवितात. गुरगावमध्ये (दिल्ली) तर एक आंतराष्ट्रीय नेल एक्सपर्ट 'नेल पार्लर' चालू करत आहेत. या पार्लरमध्ये नेल आर्ट मशीन आहे. या मशीनमध्ये जवळपास 2500 नेल डिझाईन आहेत. याचा उपयोग करणे खूपच सोपे असते. फक्त आपली आवडती डिझाईन निवडायची व मशीनखाली आपली नखं ठेवायची. काही वेळातच आपली आवडती डिझाईन नखांवर येते. या मशिनने आपल्या आवडत्या व्यक्तीचा फोटोसुध्दा स्कॅन करून नखांवर छापता येतो.
सौंदर्यातही तंत्रज्ञान आले आहे ते असे. पण हे न करताही आपण स्वत:च्या कल्पनाशक्तीने नखे सजवू शकतो. नखांना छिद्र पाडून त्यात आपण रिंगही घालू शकतो. अशा अनेक पध्दतींनी नखे सजवू शकतो. आवडत असल्यास प्रत्येक नख वेगवेगळ्या पध्दतीने रंगवू शकतो. आज बाजारात आर्टिफिशिअल नखंसुध्दा विक्रीला असतात. यामुळे आपण नखे वाढविण्याच्या त्रासातून मुक्त होऊ शकतो. नेल आर्ट करण्याचा खर्च 200 रूपयांपासून हजारो रूपयांपर्यत असतो. यासोबतच आपण नखांच्या स्वच्छतेवरही लक्ष दिले पाहिजे. नेल आर्टच्या प्रयोगानंतर क्युटीकल तेलाने मसाज अवश्य करावा.