Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'1 लाखाचा कापूस व्हायचा, तिथं आता 40 हजाराचाच होतोय, शेतकऱ्याला प्रगतीचा चान्सच नाही'

Webdunia
शुक्रवार, 12 मे 2023 (12:15 IST)
श्रीकांत बंगाळे
social media
“आम्हाला दरवर्षी 1 लाखाचा कापूस होत होता आणि यंदा 40 हजाराचा झाला. म्हणजे 60 हजाराचं आमचं नुकसान झालं.”- अरविंद कान्हे
 
“सव्वा लाख, दीड लाख उत्पन्न व्हायचं एका एकरात. ते आता सरासरी 80,85,90 हजारापर्यंत चाललंय. त्यामुळे प्रगतीला काही चान्सच नाही.” - राहुल दारकुंडे
 
अरविंद कान्हे आणि राहुल दारकुंडे हे अनुक्रमे कापूस आणि कांदा उत्पादक शेतकरी. दोघेही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातल्या कायगावात राहतात. बेभरवशाच्या पावसामुळे खालावत चाललेलं उत्पन्न हा दोघांमधला समान धागा.
 
अरविंद कान्हे पूर्वी एका एकरात कापसाचं 25 क्विंटलपर्यंत उत्पादन घ्यायचे. त्यासाठी त्यांचं उदाहरणही इतरांना दिलं जायचं. आता मात्र परिस्थिती बदललीय.
 
अरविंद सांगतात, “मागील वर्षी आम्ही 16 एकर क्षेत्रावर कापूस लागवड केली होती आणि एकरी आम्हाला 5 क्विंटल उत्पन्न आलं. आम्हाला गेल्या 2 वर्षांपासून एकरी फक्त 5 क्विंटल उत्पादन मिळत आहे. पाठीमागे 2 वर्षाच्या पूर्वी आम्हाला 20 ते 25 क्विंटल उत्पादन मिळत होतं.”
 
2022च्या सप्टेंबर-ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात सततचा पाऊस झाला. पिकांची वाढ आणि काढणीचा हंगाम, अशा दोन्ही काळात झालेल्या या पावसाचा फटका शेतातील पिकांना बसला.
 
अरविंद सांगतात, “दोन वर्षांपासून खूप जास्त प्रमाणात पाऊस पडायला लागला. अतिवृष्टी जास्त व्हायला लागल्यामुळे पातेगळ जास्त व्हायला लागली आणि कापूस जास्त खराब व्हायला लागला.”
 
“ज्यावेळेस आपला कापूस वेचणीला येतो, त्यावेळेस अतिवृष्टी झाल्यानं खालचा कापूस पूर्ण खराब होतो. राहतो फक्त 25 ते 30 कैरी. त्याचा फक्त 5 क्विंटल कापूस निघतो.”
 
पावसामुळे कान्हे यांच्या शेतातील कापसाचं गेल्या वर्षी नुकसान झालं. नुकसानीचे पंचनामे होऊन आता 7 ते 8 महिने उलटलेत. पण, त्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाहीये.
 
2022 च्या खरीप हंगामातील पिकांचं पावसामुळे जे नुकसान झालं, त्याची भरपाई शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळेल, असा प्रश्न आम्ही स्थानिक प्रशासनाला विचारला.
 
संभाजीनगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देखमुख सांगतात,
 
“सततचा पाऊस पहिल्यांदाच नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण घेतलं होतं. त्याचे पैसे अद्याप सगळ्याच तालुक्यात वाटप झाले की नाही याबद्दल थोडा संभ्रम आहे. मी महसूल यंत्रणेशी संपर्क केला. हे पैसे अजूनही वाटप व्हायचे राहिलेले आहेत.
 
“साधारणपणे या महिन्याच्या अखेर म्हणजे मे महिन्याच्या अखेर या सगळ्या आपत्तीची जी काही देय रक्कम आहे, ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची सूचना राज्य सरकारडून आलेली आहे.”
 
2022 च्या खरीप हंगामातील पिकांचं पावसामुळे जे नुकसान झालं, त्याची भरपाई शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळेल, असा प्रश्न आम्ही स्थानिक प्रशासनाला विचारला.
संभाजीनगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देखमुख सांगतात,
 
“सततचा पाऊस पहिल्यांदाच नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण घेतलं होतं. त्याचे पैसे अद्याप सगळ्याच तालुक्यात वाटप झाले की नाही याबद्दल थोडा संभ्रम आहे. मी महसूल यंत्रणेशी संपर्क केला. हे पैसे अजूनही वाटप व्हायचे राहिलेले आहेत.
 
“साधारणपणे या महिन्याच्या अखेर म्हणजे मे महिन्याच्या अखेर या सगळ्या आपत्तीची जी काही देय रक्कम आहे, ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची सूचना राज्य सरकारडून आलेली आहे.”
 
अरविंद सांगतात, “शेतकऱ्याला बाकी काहीही नको. कोणतं अनुदान नको, की काही नको. बस शेतकऱ्याचा शेतमाल जेव्हा मार्केटमध्ये विकायला येतो, तेव्हा त्याला चांगला भाव मिळायला हवा. पण नेमका जेव्हा आमचं पीक मार्केटमध्ये जातं, तेव्हाच भाव पडतो आणि शेतकरी लॉसमध्ये जातो.”
 
कापसाकडून ऊसाकडे
अरविंद हे यंदा फक्त साडेतीन एकर क्षेत्रावर कापसाची लागवड करणार आहेत. बाकीच्या 12 एकर क्षेत्रावर त्यांनी ऊसाची लागवड केली आहे.
 
ऊसावर सततच्या पावसाच्या फार परिणाम होत नाही, निदान उत्पन्नाची शाश्वती तरी असते, असं अरविंद यांना वाटतं.
 
ते सांगतात, “मनात एक असं दु:ख असतं साहेब. ज्यावेळेस आपण कोणत्याही पिकासाठी तीन-साडेतीन महिने कष्ट घेतले आणि शेवटी आपल्या हातात काहीजरी भेटत नसेल, तर मग रडल्याशिवाय पर्यायच नाही साहेब त्याला.”
 
उन्हाळ्यात गारपीट झाली आणि कांदा सडला
अगदी ऐन उन्हाळ्यात, एप्रिल महिन्यातल्या गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे कायगावच्याच राहुल दारकुंडे यांच्या शेतातील कांदा पिकाचं 25 % नुकसान झालंय. आम्हाला ते त्यांच्या शेतात घेऊन गेले आणि कांदे कसे सडलेत ते दाखवू लागले.
 
राहुल यांना याआधी कांद्याचं एकरी दोनशे क्विंटल उत्पादन व्हायचं, ते आता सव्वाशे क्विंटलवर आलंय.
 
ते सांगतात, “कांद्याला पावसामुळे फटका बसू राहिला. पावसामुळे धुई पडणे, कांदा काढायच्या टायमाला पाऊस येणे, पोंगट्यात पाणी जाणे, कांद्याची सड होणं, कांदा बारीक पडणे, अशाप्रकारे आमचं कांद्याचं बरंचसं नुकसान झालं. नाहीतर पहिले एवढा पाऊस होत नव्हता. त्याच्यामुळे कांद्याचं उत्पन्न चांगलं राहायचं. कांद्याची साईज चांगली राहायची.”
 
जी अवस्था कापूस आणि कांदा पिकाची. तीच अवस्था ऊस या पिकाची आहे.
 
गंगापूर भागात जिथं ऊसाचं एकरी 70 टन उत्पादन व्हायचं, तिथं ते आता 30- 35 टनांवर आलं आहे.
 
सततच्या पावसानं ऊसाच्या प्रती हेक्टरी उत्पादनात 30 % पर्यंत घट झाल्याचं साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नुकतंच सांगितलं आहे.
 
पावसाचा पॅटर्न बदललाय?
गेल्या काही वर्षांपासून पावसाचा पॅटर्न बदललाय. सततचा पाऊस हा त्याचाच एक भाग असून त्याचा थेट परिणाम जमिनीच्या उत्पादन क्षमतेवर होत असल्याचं मत हवामान तज्ज्ञ व्यक्त करताहेत.
 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. कैलास डाखोरे सांगतात,
 
“कुठलंही पीक असेल तर त्याच्या वाढीच्या प्रत्येक अवस्थेमध्ये एक विशिष्ट प्रकारचं वातावरण लागतं. त्या वाढीच्या अवस्थेत ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाशापासून मिळणारी प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया थांबते. त्यामुळे उत्पादनामध्ये घट होते.
 
“दुसरं म्हणजे जे मोठ्या प्रमाणात पाऊस झाले, त्यामुळे शेतातील खतसुद्धा वाहून गेले. म्हणजे जमिनीच्या खाली आवश्यक असलेले न्यूट्रियंट्स आहेत तेसुद्धा पिकाला मिळालेले नाहीत.
 
“तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे यामुळे जमिनीमधला ऑरगॅनिक कार्बन (सेंद्रीय कर्ब) कमी होत चाललेला आहे. तो वाढवणं आवश्यक आहे. या तीन गोष्टींची काळजी घेतली तरच जमिनीची उत्पादकता वाढीस लागेल.”
बदलत्या हवामानानुसार, येणाऱ्या काळात पीक पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता हवामान तज्ज्ञ अधोरेखित करत आहेत.
 
पण, यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या पिकांमध्ये बदलत्या हवामानात तग धरू शकतील असे वाण विकसित करण्याची गरज आहे.

Published By -Smita Joshi 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

Maharashtra Assembly Election 2024 Live in Marathi मोदी सरकार वक्फ कायद्यात सुधारणा करणार, अमित शहांची घोषणा

येमेनच्या हुथी बंडखोरांचा अमेरिकन युद्धनौकांवर ड्रोन-क्षेपणास्त्रांनी हल्ला

Maharashtra Elections 2024: मोदी सरकार वक्फ कायद्यात सुधारणा करणार, अमित शहांची घोषणा

उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणी प्रकरणावर भाजपचे प्रत्युत्तर

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा T20 कधी होणार जाणून घ्या

पुढील लेख
Show comments