मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७७ टक्के गुणांसह यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे पत्रकारिता पदविका प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री शिंदे यांना वृत्तपत्रविद्या व जन संज्ञापन पदविका शिक्षणक्रमाचे प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी हा पदविका अभ्यासक्रम ऑगस्ट २०२१ मध्ये विशेष प्रावीण्यासह अर्थात ७७.२५ टक्के गुण मिळवून पूर्ण केला होता. शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा येथे झालेल्या या सोहळ्याप्रसंगी कुलगुरू पाटील यांच्यासमवेत विद्यापीठाचे कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील उपस्थित होते.
यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी मुक्त विद्यापीठाची बी.ए. पदवी विशेष प्रावीण्यासह पूर्ण केली आहे. त्याचप्रमाणे मानवी हक्क प्रमाणपत्र शिक्षण क्रमही विशेष प्रावीण्यासह पूर्ण केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या यशाने विद्यापीठाच्या लौकिकात भर : पाटील
महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या लौकिकात मुख्यमंत्री शिंदे यांच्या या यशाने भर पडली आहे. त्यांना प्रमाणपत्र देताना कुलगुरू म्हणून विशेष आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. पाटील यांनी व्यक्त केली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor