Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिकच्या ईश्वरी सावकारची इंडिया बी संघात निवड; श्रीलंका व वेस्ट इंडीज मालिकेत खेळणार

Ishwari Sawkar
, बुधवार, 9 नोव्हेंबर 2022 (08:15 IST)
नाशिक –नाशिक क्रिकेटसाठी अतिशय मोठी व आनंदाची बातमी. श्रीलंका व वेस्ट इंडीज विरुद्धच्या चौरंगी मालिकेसाठी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकारची १९ वर्षांखालील इंडिया बी संघात निवड झाली आहे.
 
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ -बीसीसीआय – आयोजित १९ वर्षांखालील महिला टी-ट्वेंटी चॅलेंजर ट्रॉफीचे सामने गोवा येथे खेळविण्यात आले. त्यात ईश्वरी सावकार इंडिया ए संघाची उपकर्णधार होती. या स्पर्धेत इंडिया ए संघाच्या विजयात ६० धावा व २ बळी अशी अष्टपैलू कामगिरी करत इंडिया डी वरील संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. या स्पर्धेतील तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आयोजित विविध स्पर्धांत वेळोवेळी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना केलेल्या फलंदाजीतील जोरदार कामगिरीमुळेच ईश्वरी सावकारची ही निवड झाली आहे.
 
मागील महिन्यात झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय आयोजित , चंदिगड येथे झालेल्या १९ वर्षांखालील महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकारने १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड सार्थ ठरवत कर्णधार व सलामीची उकृष्ट फलंदाज म्हणून चांगली छाप पाडली. स्पर्धेतील पाच पैकी तीन सामने महाराष्ट्र संघाने जिंकले.
 
सलामीवीर म्हणून पाचही सामन्यांत ईश्वरी सावकारने अतिशय सातत्यपूर्ण कामगिरी करताना महाराष्ट्र संघाच्या धावसंख्येत वेळोवेळी मोठा वाटा उचलला. ईश्वरीने स्पर्धेत केलेल्या संघांनीहाय धावा अशा : मिझोराम विरुद्ध ४० ,केरळ ४१ , वडोदरा ४६, मणिपूर ३९ व हरयाणा विरुद्ध २७. या स्पर्धेत महाराष्ट्राकडून सर्वाधिक धावा केल्या तर संपूर्ण भारतात तिसरे स्थान मिळवले. या बीसीसीआय स्पर्धेतील सातत्यपूर्ण फलंदाजी मुळे सुरत येथे झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय आयोजित , वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेसाठी ईश्वरीची वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली होती .
 
१३ नोव्हेंबर पासून श्रीलंका व वेस्ट इंडीज विरुद्धची १९ वर्षांखालील महिला टी-ट्वेंटी चौरंगी मालिका वायझाग इथे सुरू होत आहे. इंडिया ए व इंडिया बी हे इतर दोन संघ असतील. इंडिया बी चे १३ नोव्हेंबरला श्रीलंका , १५ नोव्हेंबरला इंडिया ए तर १७ नोव्हेंबरला वेस्ट इंडीज बरोबर सामने नियोजित आहेत.
ईश्वरीच्या ह्या महत्वपूर्ण निवडी बद्दल नाशिकच्या क्रिकेटविश्वात आनंदमय वातावरण निर्माण झाले असून, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे, पदाधिकारी , सदस्य व प्रशिक्षक यांनी ईश्वरी सावकारचे अभिनंदन करून भविष्यातील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या मिटकरीला काय अक्कल आहे, हा बेअक्कल माणूस आहे