श्रीलंकेचा स्टार वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. आतापर्यंत त्याने कसोटी, एकदिवसीय आणि आयपीएल क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, मात्र त्याने अद्याप आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीला निरोप दिलेला नाही. गेल्या वर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी या दिग्गज गोलंदाजाने आपल्या देशासाठी अखेरचा टी-20 विश्वचषक खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती.
कोरोनामुळे ऑस्ट्रेलियामधील टी-20 विश्वचषक पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे 37 वर्षीय लिंगाची टी-20 कारकीर्द अनिश्चिततेत सापडली आहे. क्रिकेट बोर्डाने आपल्या एकदिवसीय संघातून वरिष्ठ खेळाडूंना डच्चू दिल्यामुळे मलिंगा विश्वचषक स्पर्धेत खेळणार का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. एका स्थानिक वृत्तपत्राशी बोलताना श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता प्रमोद विक्रमसिंघे म्हणाले, मलिंगा हा आमच्या टी-20 विश्वचषक योजनेचा एक भाग आहे. तो देशातील महान गोलंदाजांपैकी एक आहे, हे आपण विसरू शकत नाही. सलग दोन टी-20 विश्वचषक खेळायचे आहेत आणि त्याचा फॉर्मही चांगला आहे. येत्या काही दिवसांत आम्ही मलिंगाला भेटू, तेव्हा आम्ही त्याच्याशी या संदर्भात बोलू. मलिंगाने काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राशी बोलताना म्हटले होते, मी टी20 स्वरूपात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी निवड समिती माझ्याबद्दल कोणता निर्णय घेते, हे मला समजून घ्यायचे आहे.