अहमदाबाद : तब्बल एक वर्षाच्या खंडा नंतर भारत देशात एकदिवसीय सामना होत असून वेस्टइंडीज विरुद्ध भारताची एकदिवसीय मालिका सुरु झाली आहे. अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी मैदानावर हे ३ एकदिवसीय सामने होणार आहेत. काल झालेल्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्टइंडीज संघाचा ६ गडी राखून धुव्वा उडवला. युझवेन्द्र चहलच्या प्रभावी फिरकी समोर वेस्टइंडीजच्या एकाही फलंदाजांचा निभाव लागला नाही. वेस्टइंडीजने भारतासमोर १७७ धावांचे लक्ष ठेवले होते.
भारताची फलंदाजी आली तेव्हा कर्णधार रोहित शर्माच्या तडाखेबाज फलंदाजीसमोर वेस्टइंडीजच्या गोलंदाजांचा निभाव लागला नाही. कर्णधार रोहित शर्माने ५१ चेंडूंमध्ये ६० धावा केल्या. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली जरी धावांचा पाठलाग करताना ८ धावांवर बाद झाला असला तरी त्याने त्या आठ धावा करताना पण एक नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध विराट कोहली चार चेंडूत आठ धावा करून बाद झाला, मात्र दुसरा चौकार मारताच भारतीय मैदानावर जलदगतीने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५००० धावा पूर्ण करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला.
विराट कोहलीने ९६ व्या डावात हा पराक्रम केला, तर याआधी हा विश्वविक्रम मास्टर ब्लास्टर आणि क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिन तेंडुलकरने घरच्या मैदानावर १२० डावात ५००० वनडे धावांचा टप्पा पार केला होता. तर विराट कोहलीने भारत भूमीवर केवळ ९६ डावतच ५००० धावा केल्या आहेत.