Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मंदिरे बंद करायचा निर्णय झाला आणि देवाला आनंदच झाला

मंदिरे बंद करायचा निर्णय झाला आणि देवाला आनंदच झाला
, मंगळवार, 20 एप्रिल 2021 (13:05 IST)
मंदिरे बंद करायचा निर्णय झाला आणि देवाला आनंदच झाला.
आसपास कोणी नाही हे बघून देव विटेवरून खाली उतरला.
आळोखे पिळोखे दिले आणि चालत आत महाली आला.
रुक्मिणीदेवीची आवराआवर सुरू होती. 
कामाची घाई उडाली होती.
लॉकडाऊन मुळे सर्व दासदासींना सुट्टी दिली होती.
त्यामुळे कामाचा संपूर्ण भार देवीच्या अंगावर आला होता.
देव पाऊलाचाही आवाज न करता आत आले.
आणि एकदम रुक्मिणीदेवीच्या समोर उभे राहिले.
अचानक आज यावेळी देवाला इथे पाहून देवी आश्चर्यचकित झाली. 
 
"आजपासून मी घरीच राहणार.....
तेही तुझ्यासोबत. आता आपण आपला वेळ एकत्र घालवू....
पुर्वी वृंदावनात जसे आपण रहात होतो तसेच आता रहायचे. तुला वेळ देता यावा म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे."
"अहो कोणाला सांगताय हे ....
मी अर्धांगिनी आहे तुमची...
मला सर्व समजते...
लॉकडाऊन मुळे मंदिर बंद केलंय.....
नाहीतर गेली अठ्ठावीस युगे भक्तासाठी विटेवर उभे राहीलेले तुम्ही....
आताच बरी तुम्हाला माझी आठवण आली.."
 
देवाची लबाडी रुक्मिणीदेवीच्या ध्यानात आली होती.
"तसं नाही, पण आता मी ठरवलंय तुला वेळ द्यायचा.."
"अरे वा! रोज काकड आरतीला घराबाहेर पडून शेजआरती झाल्यावरच घरी येणारे तुम्ही केवळ या लॉकडाऊनमुळे घरी बसलात...आणि म्हणे वेळ देणार!"
"बरं ते जाऊ दे! आता आपण एकत्र छान क्वालीटी टाईम घालवूया ..."
"तुम्हाला बोलायला काय जातंय...
घरात सर्व दासदासींना मी पगारी सुट्टी दिलीय..मला खुप काम आहे...."
समोर ठेवलेले एक बत्तासे तोंडात टाकत देवाने सांगीतले.
 
"रुक्मिणी तुझं काम लवकर आवर तोपर्यंत मी नारदाकडून जरा आजूबाजूला काय चाललंय याची माहिती घेतो."
"अजिबात चालणार नाही....
येथे मी एकटी काम करणार आणि तुम्ही तिकडे गावगप्पा मारत बसणार.....
तुम्हीही मला घरकामात मदत करायची..."
"मी मदत करायची..?
अग मी वैकुंठाचा राजा आहे ...
तु मला कामाला लावणार...?"
"हो. आता ते सर्व विसरा...
दोन आठवडे मला मदत करायची.."
"हो केली असती पण मला काय येणार त्यातले..."
देवांने काम टाळायचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला.
"तुम्हाला काम येत नाही....माझ्या लक्षात आहे सारं..."
"काय ते"
"तुमची कामं"
"कोणती"
"चोखोबांची गुरे राखलीत,त्या जनीसोबत जात्यावर बसून तिला दळण दळू लागलात,नाथांच्या घरी पाणी भरले,
नामदेवाच्या घरी पंक्तीत तुम्ही जेवण वाढायला होता,शिवाय सोयराबाईची लुगडी धुतलीत तुम्ही....."
देव नजर चुकवत चाचपरत बोलू लागले
"अग ते म्हणजे....."
"आणखी सांगते ना, 
सावतामाळ्याच्या शेतात भाजी पिकवायला जायचा, गोरोबाकाकांची मडकी भाजलीत, दामाजी पंताचे कर्ज फेडले, तुकोबांच्या आवलीच्या पायातील काटा तुम्ही काढलात पण घरी बायकोचे एक काम करायला नको...
म्हणे मला कुठे कामं येतात...."
"बर ठिक आहे. अडला हरी ...."असं म्हणत देवाने समोरच्या टेबलावरील आवराआवर करायला घेतली.
"तुम्ही काहीच करू नका फक्त स्वस्थ बसून रहा. मी सारा स्वयंपाक केलाय तुमच्या आवडीची भाजीभाकरी केलीय. बर्याच दिवसांनी संधी आलीय आपण दोघे मिळून जेऊया."
 
देवालाही जाणवले, आजपर्यंत दुनियेचा भार वाहतावाहता आपलं रुक्मिणी कडे दुर्लक्षच झालं.
आता दोन आठवडे कोठेही जायचे नाही....केवळ तिलाच वेळ द्यायचा ...असे मनसुबे देव मनात रचत होते तेवढ्यात गरूडाने नारद आल्याची वर्दी दिली. 

नारदमुनी देवाच्या कानी लागले....तसतसे रुक्मिणीकांताच्या चेहर्यावरील हावभाव बदलत गेले. देवांनी नारदाला निरोप दिला आणि आवरायला घेतले.
 
"हे काय?...कुठे चाललात.?.. आणि हे बॅगेत काय भरलय?"
देवीच्या प्रश्नांनी श्रीरंग भानावर आले.
"हे काय हा खाकी युनिफॉर्म, हा स्टेथास्कोप, हा झाडू हे काय घेतलंय...कुठे चाललाय तुम्ही.." 
 
"रुक्मिणी मला जायला हवं....सगळीकडे हाहाकार माजलाय...आता जर मी नाही गेलो तर लोकांचा माझ्या वरील विश्वास उठेल....लोक यांच्यातच मला बघतायत  .....आत्ता लोकांसाठी पोलीस, डॉक्टर, सफाई कामगार, बँकवाले, एम्बुलन्स् ड्रायव्हर हेच देव आहेत.....मी हेच करणार आहे...."

श्रीहरी घाईघाईत न जेवताच निघून गेले....
देवीने डबा भरला आणि टेबलवरचा परिचारिकेचा गणवेश घेतला आणि देवामागे तीही निघाली.....गेली अठ्ठाविस युगे ती हेच करत होती.रुक्मिणीदेवीलाही यातच आनंद होता.....
 
रस्त्यावर सावळा पांडू हवालदार कमरेवर हात ठेवून विटेवरून उतरून वाटेवर उभा होता...त्याचा भाजीभाकरीचा डबा त्याने रस्त्यावरील निराधरांना कधीचाच दिला होता. आपल्या आवडीचा डबा दुसर्याला देऊन उपाशी पोटी तो पुन्हा रस्त्यावर उभा राहिला होता...स्वतःच देवत्व सिद्ध करायला..

-सोशल मीडिया

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Jio चा शानदार स्वस्त प्लान, 75 जीबीपर्यंत डेटासह Netflix आणि Prime Video मोफत