Publish Date: Wed, 15 Jul 2026 (11:20 IST)
Updated Date: Wed, 15 Jul 2026 (11:39 IST)
मराठी रंगभूमीचे दैवत आणि अद्वितीय गायक-अभिनेते नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच 'बालगंधर्व' यांची पुण्यतिथी १५ जुलै रोजी असते.
मराठी रंगभूमीचे शिल्पकार आणि अद्वितीय गायक-अभिनेते नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच 'बालगंधर्व' यांचा स्मृतिदिन दरवर्षी १५ जुलै रोजी पाळला जातो. २६ जून १८८८ रोजी पुणे येथे नाराणराव श्रीपाद राजहंस यांचा जन्म झाला. प्रथम किर्लोसकर नाटक मंडळीत काम करणार्या बालगंधर्वांनी पुढे स्वत:ची गंधर्व संगीत नाटक मंडळी काढली. मानापमानातील भामिनी', विद्याहरणमधील देवयानी, स्वयंवरामधील रुक्मिणी, एकच प्यालातील सिंधू या त्यांनी अजरामर केलेल्या भूमिका. पुणे येथील १९२९ च्या महाराष्ट्र नाट्य संमेलनाचे अध्क्षपद भूषविलेल्या बालगंधर्वांना अभिनयासाठी संगीत नाटक अकादमीचे राष्ट्रपती पदकही लाभले होते. पद्मभूषण विभूषित बालगंधर्व म्हणजे मराठी संगीत रंगभूमीला पडलेले इंद्रधनुष्यी स्वप्न होते.
रंगभूमीवरील योगदान
'बालगंधर्व' उपाधी: त्यांच्या बालवयातील मधुर गायनाने प्रभावित होऊन लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्यांना 'बालगंधर्व' हे नाव दिले.
स्त्री-भूमिकांचे सुवर्णयुग: ज्या काळात स्त्रिया नाटकात काम करत नव्हत्या, त्या काळात बालगंधर्वांनी आपल्या अभिनय, रूप आणि लाघवी आवाजाने स्त्री-भूमिका जिवंत केल्या. त्यांनी साकारलेली भामिनी (मानापमान), सिंधू (एकच प्याला) आणि रुक्मिणी (स्वयंवर) आजही मैलाचा दगड मानली जाते.
नाट्यसंगीताचे वैभव: 'स्वयंवर', 'मानापमान', 'सौभद्र' यांसारख्या अनेक नाटकांतून त्यांनी गायलेली पदे आज एका शतकानंतरही रसिकांच्या ओठांवर आहे.
त्यांनी आपल्या अभिनयाने आणि अवीट गोडीच्या नाट्यसंगीताने मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ घडवला. एकंदर २७ नाटकांत ३६ भूमिका केलेला हा राजहंस म्हणजे, जशा जन्मती तेज घेऊन तारा, जसा मोर घेऊन येतो पिसारा। तसा येई कंठात घेऊन गाणे, असा बालगंधर्व आता न होणे।
Edited By- Dhanashri Naik