पोटामध्ये जंत होणं ही भारत आणि अनेक देशांमध्ये आढळणारी एक मोठी समस्या आहे. आपले खाण्याचे पदार्थ पाणी किंवा इतर मार्गांनी हा संसर्ग होताना दिसतो. बहुतांशवेळा याची महत्त्वाची लक्षणं म्हणजे विष्ठेमध्ये लांब जंत दिसणं किंवा पोटात दुखणं तसेच गुदद्वाराजवळ खाज येणं अशी असतात. या लक्षणांनंतर तपासणी करता पुढील निदान केले जाते.
पोटामध्ये अशाप्रकारचे जंत दिसतात त्यांना गॅस्ट्रिक वर्म्स असंही म्हटलं जातं. त्याचे राऊंडवर्म्स, फ्लॅटवर्म्स, टेप वर्म्स असे अनेक प्रकार आहेत.
या प्रत्येक जंताची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. त्यांचं जीवनचक्र आणि आपल्या आरोग्यावर होणारे परिणामही वेगवेगळे असतात.
मातीच्या संपर्कामुळे आपल्या पोटात जाणाऱ्या जंतांचे राऊंड, व्हीप, हुक, अन्सायलोस्टोमा असे प्रकार आहेत.
जंताची लागण कशी होते?
जंतांची लागण बहुतांशवेळा एखाद्या वस्तूवर जंताची अंडी असतील आणि त्याला आपला स्पर्श झाला तसेच त्यानंतर आपण हात धुतले नाहीत तर होऊ शकते.
जंतांची अंडी असलेल्या मातीशी संपर्क येणं किंवा जंताची अंडी असलेल्या अन्नाचं ग्रहण केल्यास किंवा तसे पाणी प्यायल्यास संसर्ग होतो.
सांडपाणी व्यवस्था नीट नसलेल्या जागी तसेच शौचकुपं स्वच्छ नसतील तरीही संसर्ग होतो. न शिजवता मांस खाल्ल्यास तसेच जंतांचा संसर्ग असलेले मासे खाल्ल्यास त्रास होऊ शकतो. काहीवेळेस पाळीव प्राण्यांमुळेही संसर्ग होऊ शकतो.
अनेक बालकांमध्ये थ्रेडवर्म्सची लागण झालेली दिसून येते. या लांब दोरीसारख्या जंतांची अंडी पोटात गेल्यामुळे त्रास सुरू होतो. या जंतांची अंडी गुदद्वाराजवळ घातलेली असतात. त्यामुळे खाज येते आणि हाताला चिकटतात.
ही अंडी कपडे, खेळणी, दात घासायचा ब्रश, स्वयंपाकघर किंवा बाथरुममधील फरशी, अंथरुण, अन्न कशावरही पसरलेली असू शकतात.
या वस्तू किंवा पृष्ठभागांना जे लोक स्पर्श करतात आणि नंतर तोच हात तोंडाला लावतात त्यांना जंतांचा संसर्ग होऊ शकतो. थ्रेडवर्म्सची अंडी दोन आठवड्यांपर्यंत टिकू शकतात.
अंडी पोटात गेल्यावर त्यातून आपल्या आतड्यात अळ्या बाहेर पडतात आणि एक दोन महिन्यात त्याचे मोठे जंत होतात.
एकदा उपचार झाल्यावर अशा अंड्यांशी संपर्क आल्यावर मुलांना परत त्याचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे मुलांनी नियमित हात धुतले पाहिजेत, तशी सवय त्यांना लावली पाहिजे.
हे थ्रेडवर्म्स होऊ नयेत यासाठी
सर्वांनी हात नीट धुतले पाहिजेत, नखं कापली पाहिजे.
खाण्यापूर्वी, शौचाला जाऊन आल्यावर तसेच बाळाचे लंगोट बदलल्यानंतर हात धुतलेच पाहिजे.
मुलांना नियमित हात धुण्याची सवय लावली पाहिजे. दररोज स्वच्छ अंघोळ केली पाहिजे.
दात घासण्यापूर्वी आणि नंतर ब्रश नीट धुतले पाहिजेत.
अंथरुण-पांघरुण, टॉवेल गरम पाण्यात धुतले पाहिजेत. सॉफ्ट टॉय स्वच्छ ठेवली पाहिजेत.
स्वयंपाकघर आणि बाथरुममध्ये स्वच्छता ठेवा.
आता या जंतापासून आपलं रक्षण कसं करायचं याचा विचार करू.
युनायटेड किंग्डमची आरोग्य सेवा एनएचएसने याबद्दल काही सूचना केल्या आहेत.
त्यानुसार कोणताही अन्नपदार्थ खाण्यापूर्वी आपण हात स्वच्छ धुतले पाहिजेत. मातीला स्पर्श झाल्यावर तसेच मलत्यागानंतर हात स्वच्छ धुतले पाहिजेत. जिथं पाणी अस्वच्छ आहे अशी शंका तुम्हाला असेल त्या प्रदेशात गेल्यावर शुद्ध केलेले किंवा बाटलीबंद पाणी प्यायचा प्रयत्न करा.
सर्व भाज्या, फळं नीट धुवूनच खा, आपल्या घरातील पाळीव प्राण्यांना जंतांची औषध वेळेवर द्या. त्यांची विष्ठा शक्य तितक्या लवकर दूर करा.
लहान मुलांना कुत्रा-मांजर यांच्या विष्ठेच्या जवळच्या भागात खेळू देऊ नये. जिथं संसर्गाची जास्त शक्यता वाटते तिथं फळं, भाज्या शक्यतो टाळाव्यात.
संसर्गाची शक्यता जास्त वाटते अशा प्रदेशात अनवाणी चालू नये.
पोटात जंत झाल्याचं कसं ओळखायचं?
जंत झाल्यावर काही लक्षणं दिसून येतात.
लहान मुलांना किंवा प्रौढांमध्ये पोटात दुखणे, मळमळ वाटते किंवा अस्वस्थ वाटतं, उलटीची भावना वाटते.
अनेक लोकांना डायरिया होतो तर काही लोकांना बद्धकोष्ठही होतो.
रुग्णांची भूक कमी होते तसेच वजनही कमी होते. जंतांचा संसर्ग झालेल्या रुग्णांना अशक्त वाटतं तसेच थकवाही येतो.
गुदद्वाराजवळ खाज येते, झोप लागत नाही आणि अस्वस्थ वाटतं. प्रौढांमध्ये पोटात गॅसेस होण्याचा त्रास दिसतो. काही रुग्णांमध्ये अॅनिमियाही झालेला दिसतो.
जंत निर्मूलन का गरजेचं आहे आणि ते कसं करायचं?
आपल्या शरीरात असणारे वेगवेगळे जंत आरोग्यावर विपरित परिणाम करू शकतात. त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या आणि गुंतागुंत निर्माण होऊ शकते.
त्यामुळे रक्तक्षय होऊ शकतो तसंच लहान मुलांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. कुपोषणाचा धोका असतो तसेच आपल्या अवयवांचंही नुकसान होऊ शकतं.
यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने नियमित जंत निर्मूलनाचा उपाय सुचवलेला आहे.
हे जंत निर्मूलन कसं करायचं याबद्दल डोंबिवली येथे कार्यरत असणाऱ्या मधुसूदन मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे आरोग्य संचालक डॉ. रोहित काकू यांनी बीबीसी मराठीला माहिती दिली.
ते म्हणाले, "मातीमुळे होणाऱ्या जंतांचं निर्मूलन करण्यासाठी 12 ते 23 महिन्याची बालकं, 1 ते 4 वर्षं वयोगटातील मुलं आणि 5 ते 12 वयोगटातील मुलं यांना वर्षातून एकदा किंवा वर्षातून दोनवेळा प्रिव्हेंटिव्ह किमोथेरपी या उपचारातून औषधं दिली जातात. वयोमानानुसार आणि गरजेनुसार यातील औषधाचा डोस कमी जास्त केला जातो."
जंत निर्मूलन कसं करायचं?
डॉ. रोहित सांगतात, "जंतामुळे अनेक आजार लहानमुलं आणि मोठ्या माणसांनाही होत असतात त्यामुळे वर्षातून दोनदा म्हणजे प्रत्येक सहा महिन्यांनी ही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 2 वर्षाच्या पुढील मुलांपासून ही प्रक्रिया सुरू करता येईल."
"या प्रक्रियेत पोटात आलेले परजिवी बाहेर पडतात. जिथं मातीतून जंत मोठ्या प्रमाणात मुलांच्या शरीरात जातात त्या भागामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने ठराविक काळानंतर जंतनिर्मूलनाचा कार्यक्रम सुचवला आहे."
Published By- Priya Dixit