Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रेम नक्की म्हणजे काय असतं?

love
webdunia

रूपाली बर्वे

प्रेम, प्यार, मोहब्बत, इश्क, स्नेह, किती तरी नावे आहेत पण हे नक्की असतं तरी काय ? हा प्रश्न पडणे साहजिक आहे.. तर यावर कोणी म्हणेल भावना असतात तर कोणी केमिकल लोचा सांगत फिरकी घेतं... तर मूर्खपणा म्हणणारे लोक देखील कमी नाही... कोणी जीवनासाठी ऑक्सिजनप्रमाणे गरजेचं असल्याचे सांगतं तर कुणी बरबादीचे कारण ठरवतं... मग नक्की हे चांगलं आहे का वाईट?
 
कुणाच्याही प्रेमात पडलं की सर्व आनंदी वाटू लागतं... रम्य, एखाद्या वार्‍याचा झोका येतो तसं... नदीचा खळखळ आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट, मनात होणार्‍या गुदगुल्या हव्याहव्याश्या वाटतात... नकळत ओठावर हसू तरंगून जातं... कुणी काही बोलत असलं तरी मन वेगळ्याच विचारात गुंतलेलं असतं... गुणगुणत राहतं, मेंदूला ताळे लावून हृद्याचे ठोके आणि उडत असलेलं मन तसंच भटकत राहवं... कल्पनेत जगत रहावं... 
 
कल्पना कितीही उंचावर उड्डाण घेऊ शकते... मात्र धडकी भरते जेव्हा कल्पनेचे पंख कापले जातात...त्यानंतर जे काही अनुभवायला मिळत त्यामुळे प्रेम हा शब्द देखील नकोसा वाटू लागतो... सब बकवास है... ठाम मत तयार होतं...घृणा, द्वेष,‍ राग, तिरस्कार, दु:ख नवीन शब्दांची ओळख होते.
 
मात्र ज्यांची गाडी रुळावर असते आणि सर्व मनाप्रमाणे घडतं त्यांना आधीतर सुख- आनंद आपल्या पदरात पडल्याचा विश्वासच बसत नाही... सगळं एखाद्या परिकथेसारखं वाटतं... भविष्य सोनेरी दिसतं... मग.... चित्रपटासारखं The Happy Ending... असं वाटतं असलं तरी... त्यातून निर्माण होतं चित्र खर्‍या जीवनाचं... जानू, शोनू, बाबू कधी मूर्ख, बावळट, अक्कलशून्य होतात कळतच नाही... आधी अदा म्हणून स्वीकारलेल्या सवयी सजा वाटू लागतात... 
 
व्यावहारिक जीवन जगताना होणारी तडजोड... ताण... हे सांभाळण्यासाठी केवळ गुण आणि संयम लागतं अर्थातच प्रेम सुद्धा पण या ओढाताणीत प्रेम कुणीतरी खुंटीवर टांगलं जातं... त्याची खरी परीक्षा तर आता सुरु झालेली असते... वरवरुन सुंदर दिसणारे सुद्धा अनकेदा आतून पोकळ झालेले असते... सर्वच भोगतात असे नाही... काही खरोखर प्रेमाने निभावून जीवनाचं सोनं करतात आणि चमकतात पण याचे प्रमाणे कमीच म्हणावे... कारण ज्याप्रमाणे अग्नीमध्ये तापून सोनं कुंदन बनतं त्याचप्रमाणे संघर्षानंतर जीवनाची ज्योत उजळताना दिसते...
 
मात्र स्वत:ला प्रेमात अपयशी समजणारे, प्रेम पदरात असून त्याची किंमत नसणार्‍यांना बघून तरी यात गुंतलो नाही याची खात्री करुन सुखी होऊ शकतात... पण खुमखुमी असते... मृगतृष्णा असल्याचे जाणूनही... त्यामागे धावत राहण्याची...
 
पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे... प्रेम कधीच अपयशी होत नसतं... प्रेम कधीही तात्पुरतं नसतं... तात्पुरतं असतं ते आकर्षण... प्रेम तर्कसंगत नसते, प्रेम मागणी करत नसतं... प्रेम निस्वार्थी आणि निरागस असतं.... प्रेमात समर्पण करणारे महान म्हणवले जातात खरे... पण प्रेमापोटी समर्पण देवापुढे केलं जातं... कारण तेथे श्रद्धा असते... मनुष्याला प्रेम करताना समर्पणापेक्षा आपुलकी, सन्मान आणि विश्वासाची गरज असावी... एकमेकांच्या आनंदात सुख पाहणे हे प्रेम असतं... एकमेकांची काळजी घेणं हे प्रेम असतं...
 
प्रेम कधीच बदलतं नाही, प्रेम करणारी माणसं बदलतात कारण ती प्रेमात अपेक्षा, सोय, गरज, मालकी शोधतात... प्रेम संपत नाही... आकर्षण संपतं आणि नात्यात प्रेम उरलंच नाही म्हणून बदनाम होतं.. खरं तर माणसं कंटाळतात...
 
प्रेम एक सुंदर भावना आहे.... ठरवून होत नाही तरी आदर, स्नेह, गुण, ममता, काळजी आणि मुख्य म्हणजे सहवासात प्रेम अजूनच बहरतं...

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Lungs Health:जास्त सिगारेट ओढणाऱ्यांची फुफ्फुसे राहतील निरोगी, आहारात या पदार्थांचा करा समावेश