Select Your Language
स्वप्नावर आली ओल
, शुक्रवार, 2 जुलै 2021 (16:23 IST)
स्वप्नावर आली ओल
उन्हाची भूल
कोसळे रावां….
चिमटीत पिळावा जीव
तशी घे धाव
हवेतिल वणवा….
गावांचे चाहुलतंत्र
उन्हाळी मंत्र
भारतो जोगी…
कवटीत मालवी दीप
स्मृतींचे पाप
लावितो आगी..
हिरकणीस ठेचुन जाळ,
पेटवी माळ
पांगळा वैरी….
घाटात हरवली गाय
कापतो काय
कसाई लहरी….
जेथून मृगजळी धार
उन्मळे फार
दिठींची माया…
घारींनी धुतले पंख
भव्य नि:शंक
सूर्य सजवाया…..
शपथेवर सांगुन टाक
कोणती हाक
कोणत्या रानी,
झाडीत दडे देऊळ
येतसे गडे
जिथून मुल्तानी….
मुद्रेवर कोरुन डंक
खुपस तू शंख
हृदयदीप्तीने
गणगोत काढता माग
मला तू माग
तुझी जयरत्ने….
पक्ष्याविण रुसले झाड
नदीच्या पाड
पृथ्वीचे रंग…
मिथिलाच उचलते जनक
पेटता कनक
भूमिचे बंध….
ग्रेस
पुढील लेख