क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या गाडीला काल जोरदार अपघात झाला. रात्रीच्या वेळी गाडी चालवणं आणि अचानक डुलकी लागल्याने हा भीषण अपघात झाला. रस्ते अपघातात हजारो लोक दरवर्षी मृत्यूमुखी पडतात. सप्टेंबर महिन्यात टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री, त्याआधी आमदार विनायक मेटे यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. हायवेवर गाडी चालवताना काय काळजी घ्यायची हे समजून घेऊया.
1.प्रवासाचं नियोजन
गाडी रस्त्यावर येण्यापूर्वीचा हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत, तिथे जाण्याचा रस्ता कसा आहे, हायवे आहे की एक्सप्रेसवे, टोल किती, किती वेळ लागणार याची इत्यंभूत माहिती हवी.
मुळात त्या ठिकाणी आपण गाडी चालवू शकू का? हा प्रश्न स्वत:ला विचारा. थोडीही शंका असल्यास एखाद्या निष्णात ड्रायव्हरला सोबत घ्या. त्या रस्त्यावरून आधी कोणी गेलं असेल तर त्या व्यक्तीकडून व्यवस्थित माहिती घ्या. जवळ गॉगल बाळगा.
जर रस्ता माहिती नसेल तर मॅपचा आधार घ्या. त्यासाठी फोन व्यवस्थित चार्ज करून ठेवा. प्रवासाची वेळ हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. पर्याय असेल तर रात्रीचा प्रवास टाळा. रात्री सर्वांना झोप येते हे सार्वकालिक सत्य आहे. त्यामुळे तुम्ही जागे असाल आणि समोरच्याला किंवा मागच्याला झोप लागली तर तुम्हालाही चिरनिद्रा लागू शकते हे लक्षात घ्या.
अगदीच पर्याय नसेल तर बरोबर एक पर्यायी ड्रायव्हर घ्या. त्याला नाईट ड्रायव्हिंगची सवय असलीच पाहिजे. नाईट ड्रायव्हिंग हा एक वेगळा विषय आहे. त्यामुळे त्यात कोणतीही हयगय करू नका.
2.गाडीची देखभाल
आपली गाडी ही आपल्या कुटुंबातील सदस्यासारखी असते. तिचे गुण-अवगूण आपल्याला माहिती असतात. ती कधी खराब होते, ती कुठे कुरकुरते हे सगळं आपल्याला माहिती असतं. किंबहुना असावं. मोठ्या प्रवासाला निघताना, हवा, पेट्रोल/डिझेल/सीएनजी पुरेसं आहे याची खात्री करून घ्या. आपण ज्या प्रवासाला निघतोय तिथे जाताना किती इंधन लागतं याचा अंदाज घ्या.
गाडीतल्या आवाजांकडे नीट लक्षात द्या. कुठलाही अनावश्यक किंवा अनपेक्षित आवाज ऐकू आल्यास त्याची दखल घ्या. चाकात किंवा गाडीत खाली काही अडकलेलं असू शकतं. तसंच हेडलाईट, टेललाईट, हॉर्न व्यवस्थित आहेत की नाही हे तपासून पहा. नसल्यास तातडीने दुरुस्ती करा. गाडीत टूल किट ठेवा. हायवेवर गाडीच्या मेकॅनिकचा नंबर असू द्या.
गाडीच्या लाईट्सचा, विशेषतः पार्किंग लाईट्सचा वापर कसा करायचा, हे जाणून घ्या. धुक्याच्या ठिकाणी, बोगद्यांमध्ये, कमी दृश्यमानता असलेल्या भागांमध्ये लाईट्स ऑन करायला हवे. आणि बाहेर पडल्यावर आठवणीने बंद करायला हवे.
प्रत्येक 100 किमी नंतर गाडीच्या इंजिनाला आराम द्या. 'आम्ही नॉन स्टॉप गेलो' ही फुशारकी मारण्याच्या नादात राहू नका. याविषयी माहिती नसल्यास अनुभवी लोकांचा सल्ला घ्या.
3.मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक
एकदा गाडी रस्त्याला लागली की हा मंत्र सतत घोकत रहा. एकाग्रता हा गाडी चालवण्याचा कणा आहे. उत्तम गाडी चालवणं ही एक कला आहे आणि विज्ञानसुद्धा आहे. गाडी सुरू केल्यावर एकदम वेग पकडू नका आणि एकदम हळू चालवू नका. सहप्रवाशांशी गप्पा मारा पण वारंवार टाळ्या देणे, हातवारे करणे, मस्ती करणं, असले कोणतेही प्रकार करू नका.
सहप्रवासी तसे नसतील तर त्यांना नीट सांगा. सोबत लहान मूल असेल तर विशेष काळजी घ्या. लहान मुलांनी कितीही आग्रह केला तरी त्याला किंवा तिला मांडीत बसवून गाडी चालवू नका. फोनवर बोलायचं असेल तर ब्लूटूथवर बोला. पण फोन हातात धरू नका. तसंच व्हॉट्सअप किंवा तत्त्सम गोष्टी चेक करत बसू नका.
वेगावर नियंत्रण हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आपण किती वेगाने गाडी चालवू शकतो याचा एक साधारण अंदाज आपल्याला असतो. तिथे अजिबात हिरोगिरी करू नका. गाडी नवीन असेल, त्याचा वेग तपासण्याची ही वेळ नाही. 150 किमी वेगाने गाडी कशी चालवली ही स्टोरी इन्स्टावर टाकण्यात काहीही शौर्य नाही हे लक्षात ठेवा.
हायवेवर लेन चेंज करताना इंडिकेटर कसा द्यायचा आणि मागच्या गाडीला पास देताना कसा द्यायचा, हे काळजीपूर्वक करा. अनावश्यक संकेत लोकांची दिशाभूलही करू शकतात. हे सगळं माहिती नसेल तर त्याचा सराव करून घ्या. त्यानंतरच रस्त्याला लागा.
ब्लाइंड स्पॉटवर ओव्हरटेक अजिबात करू नये, हे नेहमी लक्षात घ्या. अधूनमधून ब्रेक घ्या, तोंडावर पाणी मारा, जोरजोरात चुळा भरा. हा उपाय हास्यास्पद वाटत असला तरी त्याचा फायदा होतो. वेगवेगळ्या ढाब्यावर चूळ भरत असलेले ट्रक ड्रायव्हर आठवले ना?
4. दारू पिऊन गाडी चालवू नका
दारू पिऊन गाडी चालवू नका हे सांगून लोकांची, पोलिसांची तोंडं थकत नाही. या विषयावर प्रचंड जनजागृती होते. तरीही लोक ऐकत नाही. दारू पिऊन किंवा कोणत्याही अंमली पदार्थाच्या प्रभावाखाली गाडी चालवू नका. तीच गोष्ट कफ सीरप किंवा तत्सम औषधांना लागू होते.
आज तेरा दोस्त गाडी चलाएगा म्हणत अनेक शूरवीर मैफिल जिंकण्याचा प्रयत्न करतात पण त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका.
कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्याला स्पष्ट शब्दात समज द्या. तुम्ही ड्रायव्हर नसाल तर प्याययेल्या ड्रायव्हरबरोबर अजिबात बसू नका.
5. तंद्री लागते, त्यामुळे जपून
इतकं सगळं केल्यावर, अगदी शुद्ध अंत:करणाने गाडी चालवली तरी एका विशिष्ट टप्प्यानंतर तंद्री लागते. त्याला हायवे हिप्नॉसिस असं म्हणतात. कल्पना करा की तुम्ही घरी पेपर वाचत आहात, तुमच्या डोळ्यासमोर पेपर आहे, पण किचनमधून काही आवाज येताहेत. तुमचं लक्ष त्या आवाजाकडे आहे, तुम्ही पेपर वाचता आहातच, तरी ते शब्द तुमच्या डोक्यात जात नाही.
खूप वेळ गाडी चालवली की अशीच अवस्था होते. याचा अर्थ ड्रायव्हरचं लक्ष नाही असं होत नाही. पण ड्रायव्हर वेगळ्याच तंद्रीत असतो. अशा वेळी समोर काही आलं तर तो लगेच प्रतिक्रिया देईलही. त्यात वाद नाही. तरी तो किंवा ती वेगळ्याच तंद्रीत असते.
बऱ्याचदा याच अवस्थेमुळे प्रतिसाद देण्यात वेळ जातो आणि अपघात होतात. त्यामुळे गाडी चालवताना असं काही वाटलं तर लगेच तंद्रीबाहेर या, आणि ड्रायव्हिंगचा आनंद घ्या.
हायवेवर गाडी चालवणं हा इतका जिकिरीचा अनुभव आहे का? तर अजिबात नाही. योग्य ती काळजी घेतली तर त्यासारखा आनंद नाही. अशा रोड ट्रीप असंख्य आठवणींना जन्म घालतात.
पण योग्य काळजी घेतली नाही तर आपण फक्त लोकांच्या आठवणीत राहण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे काळजी घेणं अत्यावश्यक आहे.
Published By- Priya Dixit