Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ब्रेन फॉग म्हणजे काय? मेनोपॉजपूर्वी काही महिलांना विस्मरणाचा त्रास का होतो?

Webdunia
मंगळवार, 13 जुलै 2021 (13:21 IST)
- लॉरा प्लिट
करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये न्यूयॉर्कच्या लेनॉक्स हिल रुग्णालयाच्या मेंदूविकारतज्ज्ञ (न्युरोलॉजिस्ट) गायत्री देवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक चूक केली. रजोनिवृत्तीच्या (मेनोपॉज) समस्येचा सामना करणाऱ्या एका महिलेला त्यांनी अल्झायमरचा रुग्ण समजलं.
 
बऱ्याच उपचारांनंतर महिलेच्या तब्येतीत सुधारणा झाली आणि याची सुरुवातीची लक्षणं ही विसरणं किंवा लक्ष विचलित होणं ही असल्याची जाणीव डॉक्टर गायत्री यांना झाली. पण या लक्षणांमागची कारणं वेगळी होती.
 
रुग्णाच्या मेंदूशी संबंधित समस्या त्यांच्या अॅस्ट्रोजनच्या (स्त्री हार्मोन) पातळीत झालेल्या घसरणीशी संबंधित होती. या हार्मोनमध्ये मेनोपॉजच्या काळात बराच चढ- उतार होत असतो.
 
या घटनेनं डॉक्टर गायत्री यांना मेनोपॉजच्या अत्यंत कमी माहिती उपलब्ध असलेल्या एका लक्षणाबाबत संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली. या लक्षणाचं नाव आहे 'ब्रेन फॉग.'
 
'ब्रेन फॉग' (याला कधी-कधी मेंटल फॉगही म्हणतात) बाबत सर्वात विचलित करणारी एक बाब म्हणजे अनेक महिलांना ही समस्या आहे, पण त्यांना याच्या कारणांबाबत माहिती नाही.
 
स्मरणशक्तीवर परिणाम
"अनेक महिलांना प्री-मेनोपॉजच्या (मेनोपॉजच्या येण्याच्या आसपासचा कालावधी, जो जवळपास सात वर्षांचाही असू शकतो) दरम्यान काही शब्द लक्षात ठेवणं, एकाचवेळी अनेक कामांवर लक्ष केंद्रीत करणं यामध्ये समस्या जाणवायला लागतात. महिलांना शक्यतो बोलण्यामध्ये अडचण नसते, पण तरीही अशा महिलांना बोलताना समस्या भेडसावण्याची शक्यता असते," असं डॉक्टर गायत्री यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.
 
''आपण कधी-कधी दुकानात जातो आणि नेमकं काय खरेदी करायचं आहे तेच विसरत असतो. त्याच प्रकारचा परिणाम स्मरणशक्तीवर होतो,'' असं इलिनॉइस युनिव्हर्सिटी, शिकागोमधील मानसोपचार, मानसशास्त्र, प्रसूती आणि स्त्री रोग विषयांच्या प्राध्यापिका आणि अमेरिकन मेनोपॉज सोसायटीच्या माजी अध्यक्ष पॉलीन माकी म्हणाल्या.
 
त्याशिवाय ब्रेन फॉगचा परिणाम हा गोष्टी सांगणं, चर्चांमध्ये सहभागी होणं आणि त्या गोष्टी लक्षात ठेवणं याच्या क्षमतेवरही होत असतो.
 
समस्या जेवढी मोठी, तेवढं लक्ष दिलं नाही
"अभ्यासात आम्हाला वैद्यकीय दृष्टीनं काही महत्त्वाच्या चुका आढळून आल्या. 10 टक्के महिलांचा स्कोअर त्यांच्या वयाच्या तुलनेत अत्यंत कमी होता. पण इतर अनेक महिलांना अगदी छोट्या समस्या जाणवतात. त्यांचा परिणाम काम करण्याच्या क्षमतेवर होत नाही, पण त्यामुळं फरक नक्कीच पडतो," असं प्रा. माकी म्हणतात.
 
डॉ. गायत्री यांच्या मते, "प्री-मेनोपॉज किंवा मेनोपॉजचा सामना करणाऱ्या सुमारे 60 टक्के महिला अनेक बदल अनुभवत असतात. पण त्याचा उपचारही होऊ शकतो."
 
अॅस्ट्रोजनची संवेदनशीलता
एक मोठी समस्या म्हणजे, मेंदूमध्ये अॅस्ट्रोजन रिसेप्टर्स असतात. त्यापैकी अनेक रिसेप्टर्स 'हिप्पोकॅम्पस'मध्ये असतात. हिप्पोकॅम्पस म्हणजे स्मरणशक्ती पूर्ववत करून पुन्हा ती परत मिळवण्यासाठी महत्त्वाचा असलेला मेंदूचा भाग.
 
"अॅस्ट्रोजनची पातळी अचानक कमी झाली की हिप्पोकॅम्पसमध्ये काही हालचालींवर परिणाम होतो," असं डॉ. गायत्री सांगतात.
 
या अभ्यासात अंडाशय (जिथं सर्वाधिक अॅस्ट्रोजन तयार होतं) काढलेल्या महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यावर अॅस्ट्रोजनचा डोस दिल्याचे चांगले परिणाम समोर आल्याचं, प्रा. माकी यांचं म्हणणं आहे.
 
पण प्री-मेनोपॉजचा सामना करत असलेल्या सर्व महिला 'ब्रेन फॉग'नं पीडित नसतात, असं का?
 
त्याचं कारण म्हणजे अॅस्ट्रॉनचा परिणाम प्रत्येक महिलेवर वेगळा होत असतो.
 
'मेंटल फॉग' किंवा 'ब्रेन फॉग' हे नाव 19व्या शतकाच्या मध्यात ब्रिटिश डॉक्टर अॅडवर्ड टिल्ट यांनी दिला होता. त्याद्वारे मेनोपॉजचा सामना करणाऱ्या व्हिक्टोरियन रोग्यांमध्ये निर्माण होणाऱ्या फॉगिंगच्या स्थितीची माहिती मिळते. पर्स कुठं ठेवली आहे किंवा घरी परत कसं जायचं, अशा बाबी लक्षात न राहणं अशी ती स्थिती असते.
 
घाम येणं आणि स्मरणशक्ती
"केवळ अॅस्ट्रोजेनला महत्त्व नसतं. झोपेच्या समस्यांसारखी इतर कारणंही लक्षात घ्यावी लागतात. मेनोपॉजवेळी 60% महिलांना झोपेशी संबंधित समस्यां निर्माण होतात - त्याचा संबंध स्मरणशक्तीशी असतो," असं पिट्सबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये मानसोपचार विषयाच्या प्राध्यापिका रेबेका थर्स्टन म्हणाल्या.
 
कमी झोपेमुळं मेमरी सर्किटमध्ये हस्तक्षेप होतो आणि खूप घामही त्यामुळंच येतो.
 
संपूर्ण शरिरात अचानक खूप उष्णता पसरते, त्यामुळं त्वचा लाल होते आणि घाम येतो.
 
झोपेवर परिणाम होण्याशिवाय खूप घाम येणं हीदेखील एक समस्या. काही महिला घामामुळं अर्ध्यारात्री झोपमोड होत असल्याची तक्रार करतात. अनेक महिलांना खूप घामामुळं अनेकदा पायजमा आणि चादरही बदलावी लागते.
 
प्रा. थर्स्टन यांच्या मते, "खूप घाम येणं ही आपण एक लहानशी समस्या समजतो. महिलांना ती सहन करावी लागत होती, पण त्याचा संबंध हृदयाशी संबंधित आजाराशी आहे, तसंच त्यामुळं मेंदूचे आजारही होऊ शकतात. त्यामुळं हिप्पोकॅम्पसच्या दोन्ही बाजूंवर परिणाम होतो आणि स्मरणशक्ती कमी होते."
 
प्री मेनोपॉजदरम्यान मूड स्विंग, एन्झायटी (जीव घाबरणं) आणि डिप्रेशन (नैराश्य) यात वाढ होते, त्याचा स्मरणशक्तीवरही परिणाम होतो.
 
जनजागृतीची कमतरता
जर ही लक्षणं एवढी व्यापक असतील तर याबाबत चर्चा का होत नाही?
 
याचं कारण कमी जनजागृती हे असू शकतं. कारण समाजामध्ये मेनोपॉजवर उघडपणे बोललंच जात नाही.
 
"हे त्रास अनेकवर्ष राहू शकतात आणि महिलांना त्या प्री-मेनोपॉजच्या काळात आहे हे लक्षातही येत नाही, ही महत्त्वाची समस्या आहे. त्यामुळं या लक्षणांसाठी इतर कारणांना जबाबदार ठरवणं सोपं असतं," असं मत युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन-मिल्वॉकीमधील मानसशास्त्राचे प्राध्यापक कॅरन फ्रिक यांनी मांडलं.
 
मेनोपॉजची लक्षणं कोणती आहेत?
मासिक पाळीचा कालावधी आणि वारंवारता (मासिक पाळीचं चक्र)
पाळीच्या दरम्यान स्त्राव नेहमीपेक्षा कमी किंवा जास्त होणं
योनीमधील कोरडेपणा
झोपेसंबंधी समस्या
जीव घाबरणं
सांधे दुखणे आणि आखडणे
मूड स्विंग
वजन कमी होणं
लघवीमार्गात संक्रमण (यूटीसी)
(स्रोत: ब्रिटिश नॅशनल हेल्थ सर्व्हिस)
 
"40 ते 50 वर्षादरम्यान वय असलेल्या महिला खूप व्यस्त असतात. त्या नोकरी किंवा घर सांभाळण्यात व्यस्त असतात. त्यांची वेगवेगळ्या वयाची मुलं असतात आणि सोबतच त्या आई-वडिलांची काळजी घेत असतात. त्यामुळं या सर्वाच्या तणावाला कारणीभूत ठरवलं जायचं," असं प्रा. फ्रिक सांगतात.
 
"तसंच काही नोकरी करणाऱ्या महिला याबाबत चर्चा करायला घाबरतात. महिलांना करिअरमध्ये काहीतरी मिळवण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात, त्या वृद्ध किंवा अशक्त दिसू नये असं त्यांना वाटत असतं."
 
बीबीसीनं ज्या डॉक्टरांशी चर्चा केली ते मेनोपॉज आणि त्याच्या मेंदूवर होणाऱ्या परिणामावर अधिक अभ्यास करण्याच्या गरजेशी सहमत आहेत. लाखो महिलांना या वेदनांमधून मुक्त करण्यासाठी जनजागृती होणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
 
उपचार काय?
प्रा. माकी यांच्या मते सर्वात पहिलं पाऊल म्हणजे, "महिलांनी घाबरू नये हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण त्यांना वाटतं की त्यांना अल्झायमर होऊ शकतो. पण त्याची शक्यता अत्यंत कमी असते, कारण त्यांच्याबरोबर जे घडत आहे, ते अगदी सामान्य आहे."
 
"या विषयी जेवढी संशोधनं झाली आहेत, त्यातून समोर आलेली माहिती जवळपास सारखीच आहे. त्यातून असे संकेत मिळतात की, मेंटल फॉगिंग तात्पुरत्या स्वरुपाचं असून कमी होत जातं. कारण मेंदूला विना अॅस्ट्रोजनचं काम करण्याची सवय होत असते.
 
पण जर खूप घाम येत असल्यामुळं तुम्हाला रात्रभर जागावं लागत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही प्रकरणांमध्ये विशेषतः तरुण महिलांमध्ये हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीही केली जाते. दुष्परिणामांपेक्षा त्याचे फायदे अधिक आहेत."
 
अनेक महिला या थेरपीबाबत चांगल्या प्रतिक्रिया देत असल्याच्या मुद्द्याशी डॉक्टर गायत्री सहमत आहेत. या थेरपीचा वापर दोन दशकांपूर्वी एक वादग्रस्त संशोधन प्रसिद्ध झाल्यानंतर खूप कमी झाला होता. त्यात हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा संबंध स्तन कँसरशी जोडण्यात आला होता. नंतर त्याला आव्हान देण्यात आलं होतं.
 
"आधुनिक हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी आधीच्या तुलनेत अधिक प्रभावी आहे. तसंच अॅस्ट्रोजनचे अनेक प्रकार असतात. अनेक बाबतींत ते फायद्याचे असू शकतात,'' असंही त्या म्हणतात.
 
ज्या महिलांना कमी लक्षणं असतील किंवा हार्मोन थेरपी घ्यायची नसेल, त्यांच्यासाठी इतरही अनेक असे उपाय आहेत ज्यामुळं कॉग्नेटिव्ह परफॉर्मन्स (स्मरणशक्तीशी संबंधिक किंवा आकलनासंबंधी कामगिरी) सुधारण्यात मदत मिळू शकते.
 
अॅरोबिक्स, खेळ किंवा मानसिक व्यायाम, झोपेच्या चांगल्या सवयी, मद्यसेवन कमी करणं आणि चांगला आहार या सर्वाचा फायदा मेनोपॉजमुळं निर्माण होणारी लक्षणं कमी करण्यात होऊ शकतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी 5 योगासने, जाणून घ्या सोप्या टिप्स

पनीर गुलाब जामुन रेसिपी

सीताफळाचे चमत्कारी फायदे जाणून घ्या

घरीच बनवा हा नैसर्गिक DIY फेस पॅक त्वचेवरील टॅन काढा

शरीराच्या या 5 ठिकाणी सूज आली तर होऊ शकतो किडनीचा त्रास जाणून घ्या

पुढील लेख
Show comments