मुंबईत शिवाजी पार्क परिसरात राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्यांच्या प्रकरणावरुन बॅनर झळकला आहे.
त्यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यातील सभेनंतर झालेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी ठाण्यात उत्तरसभा आयोजित केली आणि या सभेत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांचा दाखला देत राज्य सरकारला एकप्रकारे 3 मे पर्यंतचा अल्टीमेटमच दिला आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या संजय राऊतांवरही जोरदार हल्लाबोल केला आणि सभेनंतरही त्यांच्यावर टिकास्त्र सोडण्यात येत आहे. आता राज यांच्या भूमिकांवरुन मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात बॅनर झळकला आहे.
राज यांच्या भूमिका बदलीवरुन त्यांना लक्ष्य केलं जात असून आता दादरच्या शिवसेना भवनासमोर राज ठाकरेविरुद्धचा एक बॅनर झळकला आहे. या बॅनरवर तीन फोटोंची जागा आहे. मात्र, यातील एक जागा रिकामी असून तिथे प्रश्नचिन्ह देण्यात आलंय. राज ठाकरेंची पुढील भूमिका काय असेल? याबाबतचा हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
पहिल्या फोटोत राज यांच्या डोक्यावर मुस्लीम टोपी दिसून येत असून 'काल' असं येथे लिहिण्यात आलंय. दुसऱ्या फोटोत त्यांनी घेतलेल्या हनुमान चालिसाच्या भूमिकेचं चित्र दिसत आहे. त्यामध्ये, हनुमान आणि आज असं दिसून येत आहे. तर, तिसऱ्या फोटोत प्रश्नचिन्ह देण्यात आलं असून उद्या... असा शब्द लिहिण्यात आलाय.
हे बॅनर कोणी लावले हे अद्याप स्पष्ट नाही, मात्र बॅनर आता काढण्यात आले असून पोलीस याचा तपास करत आहेत.