Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांच्याकडून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कृतज्ञतापूर्वक अभिवादन

uddhav thackeray ambedkar
, गुरूवार, 14 एप्रिल 2022 (09:12 IST)
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सशक्त, महान अशा राज्यघटनेच्या पाठबळावरच आपल्या राज्याची विकासाची वाटचाल सुरु आहे, अशी कृतज्ञता व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती दिनाच्या पुर्वसंध्येला राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
 
मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, डॉ. आंबेडकर यांनी आपल्याला जगातील सर्वोत्तम अशी राज्यघटना दिली आहे. या सशक्त राज्यघटनेच्या माध्यमातूनच आपण प्रजासत्ताक आणि बलशाली राष्ट्र म्हणून वाटचाल करत आहोत. विविधतेने नटलेल्या आपल्या देशाला राज्यघटनेच्या एका सुत्रात गुंफून एकसंघ ठेवण्याची किमया डॉ. बाबासाहेबांनी केली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना डॉ. आंबेडकर यांच्या या योगदानासाठी आपल्याला कृतज्ञच राहावे लागेल.
“भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील गरीब, वंचित, दुर्बल, उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क आणि स्वाभिमानासाठी लढण्याचं बळ दिलं. ‘शिका आणि संघटीत व्हा’ या त्यांच्या संदेशानं बहुजनांच्या कित्येक पिढ्यांचं कल्याण केलं. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, भौगोलिक विविधतेच्या भारत देशाला एकता, समता, बंधूतेच्या सूत्रात बांधण्याचं, देशाची सार्वभौमता अखंडित ठेवण्याचं काम बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे शक्य झालं. नागरिकांना एका मताचा समान अधिकार, सर्वांना स्वाभिमानानं जगण्याची, विकासाची समान संधी उपलब्ध करुन देणारे डॉ. बाबासाहेब युगपुरुष होते. त्यांचे विचार हे कुठल्या एका जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, प्रांताच्या कल्याणासाठी नव्हते, तर अखिल मानवजातीच्या कल्याणाची ताकद त्यांच्या विचारांमध्ये आहे. डॉ. बाबासाहेबांचा मानवकल्याणाचा विचार पुढे घेऊन जाणं, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाचा विकास करणं, हेच डॉ. बाबासाहेबांना खरं अभिवादन ठरेल,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचं, विचारांचं, स्मृतींचं स्मरण करुन त्यांना वंदन केलं आहे.
 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं स्मरण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांसारखे महामानव आपल्या देशात जन्मले आणि त्यांनी देशाला जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना दिली हे आपलं भाग्य आहे. डॉ. बाबासाहेब हे दूरदृष्टीचे नेते होते. त्यांचं व्यक्तिमत्वं बहुआयामी होतं. बाबासाहेब कायदेतज्ञ होते. घटनातज्ञ होते. अर्थतज्ञ होते. लेखक, पत्रकार, चित्रकार, संगीतकार सुद्धा होतं. देशाच्या राजकारण, समाजकारण, अर्थकारणाला आश्वासक दिशा देण्याचं काम त्यांनी केलं. डॉ. बाबासाहेबांनी केलेला, महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृती दहनाचं आंदोलन, शेतकरी हक्कांच्या चळवळीसारखे दिलेले लढे, रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेतील त्यांची भूमिका, हे लढे देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक सुधारणांच्या चळवळीतील क्रांतिकारी टप्पे आहेत. बाबासाहेब कृतीशील विचारवंत होते. ध्येयासाठी, विचारांसाठी लढण्याची ताकद त्यांनी समाजाला दिली. बाबासाहेबांच्या विचारातंच देशाचं, अखिल मानवजातीचं कल्याण आहे. डॉ. बाबासाहेबांचे मानवकल्याणाचे विचार सर्वदूर पोहचतील, त्यातून देशाची राज्यघटना, एकता, समता, बंधूतेचा विचार अधिक मजबूत होईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया, असं आवाहन करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेबांना जयंतीनिमित्त वंदन केलं असून सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक अडचणीत, दोन दिवसांत अहवाल देण्याचे आदेश