भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक एका महिलेनं केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे अडचणीत सापडलेत. विशेष म्हणजे या प्रकरणाची राज्य महिला आयोगानंही दखल घेतलीय. राज्य महिला आयोगानं नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना तपास करून दोन दिवसांत अहवाल देण्याचे आदेश दिलेत. राज्य महिला आयोगानं ट्विटवरून यासंदर्भात माहिती दिलीय.
नवी मुंबई येथील एका महिलेने ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात केलेला तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोगास प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये पीडित महिलेने अशी तक्रार केली आहे की, ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांच्यासोबत पीडिता 1993 पासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत आहेत, सदर संबंधातून त्यांना 15 वर्षांचा मुलगा आहे.
या महिलेने त्यांचे वैवाहिक अधिकार तसेच त्यांच्या मुलाकरिता पितृत्वाचा अधिकार मागितला असता गणेश नाईक यांनी या महिलेस आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे या महिलेच्या आणि त्यांच्या मुलाच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या महिलेने दाखल केलेली तक्रार गंभीर स्वरूपाची असून, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने त्याची दखल घेतली आहे.