Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मुंबई महानगर पालिका निवडणूक: शिवसेना आणि काँग्रेसच्या वादामुळे 2017 च्या निवडणुकीची पुनरावृत्ती घडणार का?

मुंबई महानगर पालिका निवडणूक: शिवसेना आणि काँग्रेसच्या वादामुळे 2017 च्या निवडणुकीची पुनरावृत्ती घडणार का?
, बुधवार, 21 जुलै 2021 (11:20 IST)
दीपाली जगताप
राज्यात मांडीला मांडी लावून काम करणारे शिवसेना आणि काँग्रेस देशातील सर्वांत श्रीमंत महापालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मात्र एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.
 
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापाठोपाठ आता मुंबई काँग्रेसचे नेतेही शिवसेनेवर निशाणा साधू लागले आहेत. त्यामुळे काही महिन्यांवर आलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे पडघम आतापासूनच वाजायला सुरुवात झाली आहे.
 
काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबई महानगरपालिकेच्या प्राणवायू प्रकल्पात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता वर्तवली आहे.
 
एवढेच नव्हे तर यापूर्वीही पालिकेत अशा प्रकारचे घोटाळे झाले आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.
 
ते म्हणाले, "पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे की पालिकेत होणारा भ्रष्टाचार थांबवणे. यापूर्वीही मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार झाला आहे. रस्ते बांधकामाचाही घोटाळा मी उघड केला.
 
"या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. चौकशीत काही समोर आलं तर कारवाई व्हायला हवी ही आमची भूमिका आहे," असं शेख म्हणाले.
 
मुंबईत काँग्रेसकडून शिवसेनेला धारेवर धरण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही काळापासून सातत्याने शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष पहायला मिळत आहे.
 
याचे एक कारण म्हणजे दोन्ही पक्ष राज्यात सहकारी म्हणून सत्तेत असले तरी मुंबई महापालिकेची निवडणूक मात्र स्वबळावर लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
 
त्यामुळे आगामी काळात काँग्रेस शिवसेनेविरोधात आणखी आक्रमक होणार का? या राजकीय समीकरणाचा दोन्ही पक्षांना फायदा होणार की नुकसान?
 
याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो का? आणि सत्ताधाऱ्यांचा मुख्य विरोधक असलेल्या भाजपवर याचा काय परिणाम होऊ शकतो? अशा विविध मुद्यांचा आढावा आपण या बातमीच्या माध्यमातून घेणार आहोत.
 
काँग्रेस काय साध्य करू पाहत आहे?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा कार्यकाळ फेब्रुवारी 2022 मध्ये संपुष्टात येत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी त्यादृष्टीने कंबर कसली आहे.
 
सत्ताधारी शिवसेना सध्या पालिकेत क्रमांक एकचा पक्ष आहे. तरीही भाजप, काँग्रेस आणि मनसे अशा तगड्या विरोधकांचा सामना करण्याचे आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
 
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी यापूर्वीच मुंबई निवडणुकीचा रोडमॅप तयार असल्याचं म्हटलं होतं. ते म्हणाले होते, "मुंबई महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होतेय. आमच्याकडे मुंबई महापालिकेच्या 227 जागांचा 'रोड मॅप' तयार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक राजकीय परिस्थितीवर अवलंबून असतात," असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
 
साधारण दोन महिन्यांपूर्वी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दिकी यांनीही शिवसेनेवर उघड नाराजी व्यक्त केली होती.
 
बांद्रा परिसरात लसीकरण केंद्रांच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेकडून केली जात असणारी गर्दी आणि बॅनरबाजी, शासकीय कार्यक्रमाला निमंत्रण न देणे या सगळ्या गोष्टींवर सिद्दीकी यांनी आक्षेप घेतला होता.
 
ते म्हणाले होते, "शिवसेनेच्या लसीकरण बॅनरवर महाविकास आघाडीचा उल्लेख कुठेच दिसत नाही. म्हणजे, इथं आणल्या जाणाऱ्या लसी शिवसेनेच्या पक्षनिधीतून आणल्या जात आहेत का? लसीकरण केंद्रांच्या उद्घाटनाचा गवगवा करणं कृपया थांबवा," असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती.
 
तसंच शिवसेना नगरसेवकांना नियम लागू नाहीत का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. "महाराष्ट्रात कलम 144 लागू आहे. पण शिवसेना नगरसेवक आणि त्यांचे शेकडो कार्यकर्ते लसीकरण केंद्रांच्या उद्घाटनासाठी गर्दी करू शकतात. नियम फक्त सामान्य नागरिकांना लागू आहेत. शिवसेनेला हे नियम लागू नाहीत का? इथं एक व्यक्ती लस घेत असताना दहा-बारा जण फोटो काढत आहेत."
 
याविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार सचिन धानजी सांगतात, "सध्याच्या घडीला काँग्रेससाठी अशा आक्रमक भूमिका राजकीयदृष्ट्या गरजेच्या आहेत. गेल्या काही काळात मुंबई काँग्रेस फारशी सक्रिय नव्हती. पण स्वबळाच्या भूमिकेमुळे मुंबईत काँग्रेस कामाला लागली आहे."
 
दोन दशकांहून अधिक काळ शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेत सत्ता आहे. त्यामुळे शिवसेनेचा मुख्य विरोधक हा कायम काँग्रेसच राहिला आहे. त्यामुळे मुंबई पालिकेतील गैरकारभारांची चौकशी व्हावी अशी मागणी यापूर्वीही अनेकदा काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
 
यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे. शिवसेनेसमोर काँग्रेस आव्हान उभं करत असली तरी राज्यात मात्र सत्तेत एकत्र आहे. मग तरीही काँग्रेस स्वबळाची भूमिका घेत शिवसेनेवर उघड आरोप का करत आहे?
 
याविषयी बोलताना सचिन धानजी सांगतात, "काँग्रेस कायम शिवसेनेच्या विरोधातच निवडणूक लढवत होती. त्यामुळे विरोधक म्हणून आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे असे दिसते. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांचे प्रभाग दौरे सुरू आहेत. यातही आपल्याला भ्रष्टाचार, महागाई, स्थानिक प्रश्न, नागरी समस्या याबाबतची आंदोलनं दिसतील. काँग्रेससाठी हे महत्त्वाचे होते म्हणूनच कदाचित त्यांनी स्वबळाचा नारा दिला असावा."
 
तर महाविकास आघाडीत काँग्रेस आपलं वजन वाढवण्याचा प्रयत्न करत असताना मुंबई निवडणुकांसाठी काँग्रेसला महत्त्व द्यावं लागेल हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे असं ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात.
 
ते म्हणाले, "मुंबईत काँग्रेसचे महत्त्व राष्ट्रवादी काँग्रसपेक्षा अधिक आहे, मुंबईत काँग्रेसची दखल घ्यावी लागेल हे ठसवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न दिसतो. मुंबई महापालिका निवडणुकीला आणखी बराच काळ आहे. त्यामुळे पुलाखालून अजून बरंच पाणी जायचं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार की नाही हे आताच ठामपणे सांगता येणार नाही."
 
"तिन्ही पक्षात निवडणुकीपूर्वी कोणत्याही प्रकारची बोलणी किंवा करार होणार नाहीत असंही आताच स्पष्ट सांगता येणार नाही. मुस्लीम भागात काँग्रेसची ताकद अधिक आहे. त्यामुळे सध्या काँग्रेस आपलं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहे," असंही ते सांगतात.
 
केवळ काँग्रेसच नव्हे तर शिवसेना सुद्धा आता निवडणुकीच्या कामाला लागली आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेनेने सुद्धा टीम तयार केल्या आहेत. शिवसेनेचे आमदार किंवा खासदार शाखा-शाखांमध्ये जाऊन आढावा घेणार आहेत. तसंच युवा सेनेकडूनही पूर्व तयारी केली जात आहे.
 
काँग्रेसची स्वबळाची भाषा शिवसेनेला बोचली होती असंही सचिन धानजी सांगतात. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही एका कार्यक्रमात स्वबळाच्या मुद्द्यावरून काँग्रेसला चिमटा काढला.
 
"तुम्ही कशाचाही विचार न करता आम्हाला जेवायला बोलवा, आम्ही स्वबळावर तुमच्याकडे येऊ," असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला होता.
 
2017 च्या पॅटर्नची पुनरावृत्ती?
2017 साली राज्यात शिवसेना-भाजप युती सरकार होते. पण तरीही मुंबई महानगरपालिकेत दोन्ही मित्र पक्ष स्वबळावर निवडणुका लढले.
 
पुन्हा कधीही युती करणार नाही इथपर्यंत शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष पहायला मिळाला. मात्र त्यानंतर भाजपने शिवसेनेच्या खालोखाल जागा मिळवूनही मवाळ भूमिका घेत विरोधी पक्षनेते पदावरील दावा सोडला.
 
2017 साली झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला 93 जागा, भाजपला 82 जागा, कॉंग्रेसला 31 जागा तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला 9 जागा मिळाल्या. मात्र भाजपाने माघार घेतल्यामुळे तिसर्‍या क्रमांकांवर असलेल्या कॉंग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद गेलं.
 
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे 2017 आणि आताच्या परिस्थितीची तुलना करताना सांगतात, "2017 मध्ये शिवसेना आणि भाजपने एकमेकांवर टोकाचे आरोप केले होते. त्यावेळी राज्यात युतीचे सरकार होते. तर आघाडीचं सरकार असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीही स्वतंत्र निवडणुका लढले होते."
 
ते पुढे सांगतात, "याबाबत जनतेमध्ये सकारात्मक संदेश पोहचत नसला तरी त्याचा फारसा प्रत्यक्ष परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालावर होत नाही. शिवाय, निकालानंतरही समीकरणं बदलण्याची शक्यता असते."
 
2017 मध्ये ज्याप्रमाणे निकालानंतर शिवसेना आणि भाजपमधील राजकीय समीकरण बदलले त्याप्रमाणे पालिकेत महाविकास आघाडीचे पक्ष सुद्धा निकालानंतर एकत्र येऊ शकतात का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 
याविषयी बोलताना अभय देशपांडे सांगतात, "राज्यात सत्तेत एकत्र नांदत असताना पालिका निवडणुकीत मात्र एकमेकांवर बेफाम आरोप करायचे आणि निकालानंतर एकत्र यायचं ही राजकीय रणनीती सुद्धा असू शकते किंवा परिस्थितीनुरुप घेतलेला निर्णयही असू शकतो."
 
याची दुसरी शक्यता म्हणजे दोन मोठ्या सत्ताधारी पक्षांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत असताना मतदारांचे लक्षही वेधून घेता येते. यामुळे छोटे पक्ष बाजूला पडतात असंही ते म्हणाले.
 
काँग्रेस आणि शिवसेनेच्या भांडणात इतर पक्षांचे महत्त्व कमी होईल का? याबाबत बोलताना संदीप प्रधान म्हणाले, "भाजप ही लढाई सोडणार नाही. ते पूर्ण ताकदीने लढणार.तिन्ही पक्ष एकत्र येणार असतील तर भाजपला फटका बसू शकतो म्हणूनच मनसेला सोबत घेण्याची चर्चा सुरू आहे."
 
महाविकास आघाडीवर परिणाम होणार?
आताच नाही तर सत्तास्थापनेपासून अनेकदा काँग्रेस नेत्यांनी महाविकास आघाडीत आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.
 
नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी आल्यानंतर त्यांनी अधिक आक्रमकपणे भूमिका घेण्यास सुरुवात केली. त्यात आता मुंबई महानगरपालिकेत काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याने हा वाद आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई महापालिकेत 9 नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेबरोबर लढली तर त्याचा फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो. पण राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका निवडणुकांबाबत अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही.
 
काही दिवसांपूर्वीच नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार माझ्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप केला होता. तसंच "आम्ही मित्रपक्षांनाही या माध्यमातून आमचा संदेश पोहोचवला आहे. आम्ही याबाबत आताच जाहीर करत आहोत. ऐनवेळी सांगितल्यास तो पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार ठरेल."
 
त्याचबरोबर 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर ऐनवेळी दगा झाल्याचंही ते म्हणाले होते.
 
यापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय पातळीवर विरोधकांचे नेतृत्व करावं ही अनेक राज्यातील पक्षांची इच्छा आहे असं म्हटल्यावरुनही नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली होती.
 
शिवसेनेनंही सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसवर निशाणा साधला. "नानांच्या बोलण्यानं दोन दिवस राजकारण तापलं, पण काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उर्मी आली का? नानांनी त्यांची मन की बात सांगितली. त्यानं थोडी खळबळ माजली. ठीक आहे, होऊ द्या खळबळ!"
 
अभय देशपांडे सांगतात, "स्थानिक राजकारण आणि राज्य पातळीवर राजकारण दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक मुद्दे, भ्रष्टाचाराचे आरोप, उमेदवार याकडे अधिक लक्ष दिले जाते. जनतेमध्ये महाविकास आघाडीची प्रतिमा काय आहे त्यानुसार स्थानिक राजकारणाकडे पाहिलं जात नाही."
 
देशपांडे पुढे सांगतात, "कल्याण-डोबिंवली निवडणुकांच्यावेळेस युतीतल्या वादांमध्ये घशात हात घालून दात मोजण्यापर्यंत भाषा करण्यात आली होती पण त्याचा परिणाम युती सरकारवर राज्यात झाला नव्हता."
 
"मुंबईतही 2017 मध्ये पुन्हा युती करणार नाही असाही दावा केला होता. घोटाळ्यांचे आरोप 'मातोश्री' पर्यंत करण्यात आले.पण तरीही शिवसेना आणि भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढवली. त्यामुळे आताही काँग्रेस आणि शिवसेनेतील स्थानिक भांडणांचा राज्याच्या राजकारणावर परिणाम होणार नाही असं म्हणू शकतो. स्थानिक प्रश्न आणि समीकरण वेगळी असतात," असंही ते म्हणाले.
 
सध्याचं पक्षीय बलाबल किती आहे?
मुंबई महापालिकेत एकूण 24 प्रभाग आहे. 227 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
 
मुंबई महापालिकेत शिवसेना सर्वांत मोठा पक्ष आहे. त्यामुळे महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्याच्या खालोखाल भाजप हा दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष आहे.
 
2017 साली झालेल्या मुंबई महापालिकेतील निवडणुकीत 227 जागांपैकी,
 
शिवसेना - 84
भाजप - 82
कॉंग्रेस - 31
राष्ट्रवादी 9
समाजवादी पक्ष - 8
मनसे - 7
एमआयएम - 2
इतर - 3
नंतर मनसेचे 6 नगरसेवक शिवसेनेत गेले. तसंच काही अपक्षांचा पाठिंबा मिळवून शिवसेनेने 93 चा आकडा गाठला.
 
मुंबई महापालिका निवडणूक कधी होणार आहे?
मुंबई महापालिकेचा कार्यकाळ फेब्रुवारी 2022 मध्ये संपत आहे. त्यामुळे निवडणुकीला आता अवघ्या 7 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.
 
सध्या कल्याण डोंबिवली, वसई विरार, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नवी मुंबई या पाच महापालिकांच्या निवडणुका कोरोना महामारीमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत.पण मुंबई महापालिका निवडणूक वेळेवर व्हावी यासाठी निवडणूक आयोगाची काही आठवड्यांपूर्वी बैठक सुद्धा पार पडली.या बैठकीत मुंबई महापालिका निवडणूक वेळेवर होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
 
राज्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांनी दिलेल्या माहितीनुसार,कोव्हिड 19 चे सर्व नियम पाळून निवडणूक घेतली जाईल. पण एकाच बुथवर गर्दी होऊ नये म्हणून बुथ वाढवण्याची गरज आहे.
 
कोव्हिड नियमानुसार ज्या पद्धतीने तयारी करण्याची गरज आहे, त्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाला मागे ठेवून टीम इंडियाने हा विश्वविक्रम केला