मुंबई महापालिका आणि सरकारने केलेल्या सूचनांचे पालन करून मुंबईकरांनी दिवाळीदरम्यान कमीत कमी फटाके फोडण्यावर भर दिला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत ध्वनिप्रदूषण बऱ्याच प्रमाणात कमी झाले असून वायुप्रदूषण रोखण्यातही यश आले.
मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरात फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे वायुप्रदूषणात वाढ झाल्याची नोंद करण्यात आली असली तरी ती गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. वांद्रे, खार दांडा, सांताक्रुझ, विलेपार्ले, माहीम, दादर, मरिन ड्राइव्ह आणि वरळी सीफेस या परिसरांचा यात समावेश आहे. शिवाय दिवाळीत झालेल्या वायुप्रदूषणाच्या तुलनेत उर्वरित दिवसांत होणारे वायुप्रदूषण अधिक असल्याची नाेंद झाली आहे. यास येथील वाहने, कारखाने, रस्ते, धूळ, धूर आणि धुरके कारणीभूत आहे.