ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असतानाच, साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. गेल्या महिनाभरात शहरामध्ये मलेरियाचे २२ तर डेंग्युचा एक रुग्ण आढळून आला आहे. यामुळे सर्तक झालेल्या महापालिका प्रशासनाने आता शहरात व्यापक प्रमाणात धूर आणि औषध फवारणी सुरु केली आहे. त्याचबरोबर पाण्यामुळे साथीचे आजार पसरू नये यासाठी प्रत्यक्ष घरी जाऊन पाण्याची तपासणी करण्यासही सुरुवात केली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये फेब्रुवारी महिन्यात डेंग्युचा एक रुग्ण आढळला होता तर, एक संशयित रुग्ण आढळला होता. याच महिन्यात मलेरियाचे एकूण २२ रुग्ण आढळले आहेत. तर, चिकनगुनियाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. परंतु डेंग्यु आणि मलेरियाचे रुग्ण आढळल्याने शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून रुग्णांचा आकडा अधिक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.