मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरी आज ईडीकडून छापे टाकण्यात आले. यावरून भाजपाने राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल परब, मिलिंद नार्वेकरांचीही सीबीआय चौकशी करा, अशी मागणी केली. काही दिवसांत अनिल देशमुख यांना अटक होईल आणि त्यांच्याप्रमाणेच अनिल परब यांची अवस्था होणार, अशी जहरी टीकाही त्यांनी यावेळी केली. दरम्यान, या पत्रकारपरिषदेस भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंचीदेखील उपस्थिती होती.
किरीट सोमय्या म्हणाले, अनिल परबनंतर मिलिंद नार्वेकरांना परब यांना पण त्याच वाटेवर जावे लागणार आहे. मिलिंद नार्वेकरांना दापोली-मुरुड किनाऱ्यावर अनिल परब याच्या घरापासून काही फुटाच्या अंतरावर भव्य बंगला बांधण्यास सुरुवात केली आहे. या बंगल्यासाठी समुद्र किनाऱ्यावरील साडेचारशे झाडे कापली. आज त्या जागेची किंमत १० कोटी आहे, दोन मजली बंगल्याचे बांधकाम सुरू आहे आणि बहुतेक त्याला मार्गदर्शन पर्यारवण मंत्री आदित्य ठाकरेंचे आहे. कोणत्याही प्राधिकरणाकडून परवानगी घेतलली नाही. अनिल परब यांच्या बंगल्यावर मिलिंद नार्वेकर जात असतात व मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्यावर अनिल परब जात असतात आणि या दोघांच्या बंगल्याची काळजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे घेतात, अशी टीका त्यांनी केली. त्याचबरोबर एवढं झाल्यानंतरही काही कारवाई नाही आणि हा बंगला केव्हा लॉकडाऊनच्या काळात उद्धव ठाकरेंचा उजवा हात अनिल परब रिसॉर्ट बांधत होते आणि उद्धव ठाकरेंचे डावे हात मिलिंद नार्वेकर भव्य बंगला बांधत होते. शिवसेना ही बंगला पार्टी झाली आहे, असादेखील आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.