उत्तराखंड सरकारने बाहेरील राज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी काही शर्तींसह चारधाम यात्रा सुरू करून दिली आहे. आता पर्यंत केवळ खंडातील भाविकांना या यात्रेसाठी परवानगी होती. तसेच सरकारकडून स्पष्टपणे सांगितले की, या दरम्यान, कोविड १९ संदर्भातील अन्य सामान्य आदेश देखील जारी असतील.
याबाबत अधिक माहिती देताना उत्तराखंड चारधाम देवस्थानचे प्रबंधन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविनाथ रमन यांनी सांगितले की, आता अन्य राज्यातील भाविकांना देखील चारधाम यात्रेस येण्यास परवानगी असेल. परंतू त्यांच्याकडे उत्तराखंडात यायच्या आधीच्या ७२ तासा पर्यंतचे आरटीपीसीआरचे निगेटिव्ह रिपोर्ट असणे गरजेचे आहे.
असे भाविक देखील ही यात्रा करू शकतात ज्यांनी उत्तराखंडात येऊन निर्धारित क्वारंटाइन काळ पूर्ण केला आहे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना चारधाम देवस्थानचे प्रबंधन बोर्डाच्या वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल तसेच यामध्ये आपले नाव, ईमेल आयडी, कोविड १९ निगेटिव्ह असलेला रिपोर्ट अपलोड करावा लागेल.
वेबसाईट वर अपलोड केलेल्या कागदपत्रांची मूळ प्रत सोबत ठेवावी लागेल. क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण केलेल्या भाविकांना फोटो आयडी अपलोड केल्यानंतर त्यांना त्यांचा पास उपलब्ध होईल आणि त्यानंतर ते मंदिरात जाऊ शकतील.