चीनने तिबेटमध्ये आज (25 जून) पहिल्यांदाच बुलेट ट्रेन सुरु केली आहे. तिबेटची राजधानी ल्हासा आणि निंगची दरम्यान ही बुलेट ट्रेन धावेल.
435.5 किलोमीटर्सचा हा मार्ग भारतातल्या अरुणाचल प्रदेशाच्या अगदी जवळून जातो. सिच्युआन - तिबेट रेल्वे प्रकल्पाअंतर्गत या मार्गावर बुलेट ट्रेन सुरु करण्यात आली आहे.
चीनमधला सत्ताधारी पक्ष - कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना 1 जुलैला शताब्दी साजरी करणार असतानाच हा रेल्वेमार्ग सुरु करण्यात आलाय.
तिबेटच्या स्वायत्त भूभागामध्ये शुक्रवारी पहिल्यांदाच विजेवर धावणारी बुलेट ट्रेन सुरु करण्यात आल्याची बातमी झिनुआ या चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिली आहे. सिच्युआन - तिबेट रेल्वे ही तिबेटमधली दुसरी रेल्वे आहे. यापूर्वी किंगाची - तिबेट रेल्वेसेवा सुरु करण्यात आली आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी नोव्हेंबरमध्ये तिबेटच्या या नवीन रेल्वे योजनेविषयीच्या सूचना दिल्या होत्या. सीमेवरील सुरक्षा आणि स्थैर्य कायम राखण्यात या नवीन रेल्वेमार्गाची महत्त्वाची भूमिका असेल, असं म्हटलं जातंय.
सिच्युआन - तिबेट रेल्वे चेंगडुपासून सुरू होईल आणि यानमार्गे तिबेटमधल्या कांदोपर्यंत येईल. यामुळे ल्हासा आणि चेंगडुदरम्यानचा प्रवास सध्याच्या 43 तासांवरून कमी होऊन 13 तासांवर आला आहे.
अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा हिस्सा असल्याचा दावा चीन करत आलाय. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर 3,488 किलोमीटरच्या सीमेवरून भारत आणि चीनमध्ये वाद आहे.