Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दलित युवकाचा बेदम मारहाणीत मृत्यू; कोंबडा बनण्याची शिक्षा, कित्येक तास काठीने बडवल्याचा आरोप

Webdunia
सोमवार, 27 मे 2024 (13:04 IST)
राजस्थानमधील झुंझनु जिल्ह्यात दलित युवकाला 'आमच्या दुकानातून दारू का विकत घेत नाही' असे म्हणत बेदम मारहाण करण्यात आली. या युवकाला अत्यंत कठोर शिक्षा देण्यात आल्या. कोंबडा बनवण्यात आले, बेल्ट आणि काठ्यांनी मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना काय आहे, युवकाला कधी, कशी मारहाण करण्यात आली याचा हा ग्राउंड रिपोर्ट.
 
"मी एकटीच राहिले. तो माझा लाडका, माझ्या गळ्यातील ताईत, माझं सारंकाही होता. मी त्याला लहानाचा मोठा केला होता. माझी इच्छा आहे की एकतर मला तरी फाशी द्या किंवा त्यांना तरी फाशी द्या."एका झाडाखाली खाटीच्या शेजारी जमिनीवर हात जोडून बसलेल्या रडत हुंदके देणाऱ्या 65 वर्षांच्या या वयोवृद्ध महिलेचं नाव राधा देवी आहे.
 
26 वर्षांपूर्वी राधा देवीचे पती हडमान वाल्मिकी यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचा सर्वांत लहान मुलगा रामेश्वर फक्त सहा दिवसांचा होता. त्यांनी एकटीनं आयुष्याचा संघर्ष करत रामेश्वरचं संगोपन केलं आणि आता तोच त्यांच्या म्हातारपणाचा आधार होता. 14 मे च्या दिवशी रामेश्वरची त्याच्या घरापासून जवळच कथितरित्या हत्या करण्यात आली. त्याला कथितपणे जवळपास सहा तास लाठ्यांनी निर्दयीपणे मारहाण केल्यानं त्याचा मृत्यू झाला. या उतार वयात थकलेलं शरीर, चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि मागील दहा दिवसांपासून तापानं फणफणलेल्या राधा देवी आपल्या मुलाच्या खून्यांना फाशी देण्याची मागणी करत आहेत.
 
बलौदा गावातील घटना
राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर शहरापासून जवळपास अडीचशे किलोमीटर दूर असलेल्या झुंझुनू जिल्ह्यात हरियाणाच्या सीमेच्या अगदी जवळ बलौदा गाव आहे. गावात पक्क्या रस्त्याहून निघून सरकारी शाळेच्या शेजारून जाणाऱ्या वाळूच्या वाटेवरून एक किलोमीटर पुढे गेल्यावर गल्लीच्या कोपऱ्यावर असलेलं एक घर. याच घराच्या चार भिंतीच्या आत एका झाडाखाली राधा देवी बसलेल्या आहेत.
 
घराच्या अगदी मागे काही अंतरावर एक गोशाला आहे. 26 वर्षांच्या रामेश्वर तिथे साडे नऊ हजार रुपयांवर नोकरी करायचा. घराच्या दुसऱ्या बाजूला काही अंतरावर सूरजमल यांची रिकामी पडलेली एक हवेली आहे. याच हवेलीमध्ये रामेश्वरला जवळपास सहा तास काठ्यांनी अत्यंत निर्दयपणे मारहाण करत हत्या करण्यात आली होती.
 
आरोपींची इतकी दहशत होती की गावातील अनेकांना ते मारहाण करत होते, मात्र त्याची कोणी तक्रार केली नाही.
गावातील मनीष हा 25 वर्षांचा तरुण म्हणतो, "या गुन्हेगारांनी RBM नावानं एक ग्रुप बनवला आहे. त्यांचा अनेक गुन्ह्यांमध्ये समावेश आहे. ते सर्व एकत्र मिळून बेकायदेशीर कामं करतात." "हे आरोपी गावातील कोणालाही मारहाण करतात. त्यांनी गावात खूप दहशत पसरवली आहे."
 
जेवणसुद्धा केलं नाही
घरातील परिस्थिती या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीची जाणीव करून देते. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सर्व वस्तूदेखील घरात नाहीत. घरात खाटेवर काही भांडी आहेत, काही कपडे आणि बंद पडलेली चूल आहे. हुंदका आवरत राधा देवी सांगतात की "गोशालेतून तो घरी आला होता. मी त्याला जेवण करण्यास सांगितलं तर तो म्हणाला मी आताच तर आलो आहे. थोड्या वेळानं जेवतो. मग तो थंड पाणी घेण्यासाठी टाकीकडे गेला."
 
त्या सांगतात, "मला दहा दिवसांपासून ताप आहे. मी थोड्या वेळ आराम करण्यासाठी झोपले होते. बराच वेळ झाला तरी रामेश्वर आला नाही. म्हणून मी पाहण्यासाठी गेले तर गावातील सुभाष या तरुणानं सांगितलं की रामेश्वरला दारू विकणारे लोक घेऊन गेले."
 
"मी हात जोडून त्याला म्हटलं की ते कुठे घेऊन गेले आहेत तिथे मला घेऊन चल. मी स्वत: शोधण्यास गेले मात्र माझ्या रामेश्वरला कुठे घेऊन गेले आहेत हे कोणीही सांगितलं नाही. थकून भागून मी घरी परतली आणि तीन वाजता खाटेवर झोपले."
 
हातानेच घराच्या दरवाजाकडे इशारा करत त्या सांगतात, "संध्याकाळी मी जागे झाल्यावर पाहिलं तर रामेश्वर जमिनीवर पडलेला होता. मी रडू लागल्यावर सर्व लोक गोळा झाले. सर्वांनी मला पकडून दरवाजा बंद केला." "माझा मुलगा कोणाशी भांडणंदेखील करायचा नाही. माझी दोन मुलं कोटपूतली आणि सीकर मध्ये पाच-पाच हजार रुपयांवर मजुरी करतात." रडत त्या म्हणाल्या, "माझा रामेश्वरच माझ्या सोबत राहायचा. माझ्या लाडक्या मुलाला का मारलं?"
 
घटनेचा साक्षीदार काय म्हणाला?
रामेश्वरला न्याय मिळवून देण्यासाठी झुंझुनूच्या कलेक्टरला अर्ज देऊन परतलेल्या गावकऱ्यांपैकी एक जेठूरामनं सांगितलं की रामेश्वर बरोबर त्यांना देखील जबरदस्ती उचलून रिकाम्या पडलेल्या हवेलीत नेण्यात आलं होतं. जेठूरामनं बीबीसीला सांगितलं की "14 मे च्या दिवशी सव्वा बारा वाजता मी सरकारी हॉस्पिटलमधून औषधं घेऊन येत होतो. रामेश्वर गावातील टाकीतून पाणी नेत होता. आम्ही सोबत होतो."
 
"दारूचे दुकानदार आले आणि आम्हाला मोटरसायकलवर बसवून जबरदस्ती सूरजमलच्या हवेलीत घेऊन गेले. त्यांनी हवेलीचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर मला उठाबशा काढायला लावल्या, मला कोंबडा बनायला लावलं."
 
ते पुढे सांगतात, "तिथे पाच लोक होते. त्या पाचही जणांनी शंभर-शंभर फटके मारण्याची भाषा केली. रामेश्वरला हात बांधून वर टांगलं. ते त्याला कधी पायावर तर कधी जमिनीवर लोळवून अतिशय निर्दयपणे काठीनं मारहाण करत होते."
 
"त्यातील एक जण व्हीडिओ बनवत होता. त्यांना कसलीच भीती नव्हती. संध्याकाळी जवळपास सहा वाजेपर्यत ते मारहाण करत होते. त्यांनी रामेश्वरला खूप निर्दयीपणं मारलं." ते सांगतात, "रामेश्वरचा तिथेच मृत्यू झाला होता. रामेश्वर बेशुद्ध आहे असं समजून ते जेव्हा त्याला घेऊन गेले, त्यावेळेस संधी मिळताच मी हवेलीतून पळून आलो." जेठूराम सांगतात, "मारहाण करताना ते बोलत होते की आम्ही वीस लाख रुपये देऊन दारूचा परवाना मिळवला आहे. तुम्ही लोक आमच्या दुकानातून दारू विकत घ्या. या सर्वांना फासावर लटकवलं पाहिजे."
 
मारहाणीनंतर रामेश्वरला हरियाणात घेऊन गेले
झुंझुनू जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक राजर्षी राज वर्मा यांनी बीबीसीला सांगितलं, "मारहाण केल्यानंतर जेव्हा रामेश्वर बेशुद्ध झाला, तेव्हा आरोपी त्याला जवळच्याच हरियाणातील सतनाली मधील एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. रस्त्यातच रामेश्वरचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांनी मृतदेह बलौदा गावातील त्याच्या घरी आणला आणि तिथून ते फरार झाले होते."
 
गावातील मुकेश सांगतात, "संध्याकाळी जवळपास साडे सहा वाजता मी दुकानातून सामान घेऊन येत होतो. रामेश्वरच्या घराजवळ गाडीत ते पाच तरुण होते. त्यांनी मला हाक मारल्यावर मी घाबरलो." "त्यांनी मला सांगितलं की याला गाडीतून उतरव. हा बेशुद्ध झाला आहे. याच्या घरच्यांना कळव. मी घाबरत घाबरत त्याला गाडीतून उतरवलं आणि घराकडे निघून आलो. मी त्या लोकांना घाबरून रामेश्वरला गाडीतून उतरवलं होतं. रामेश्वरच्या अंगावर कपडे नव्हते."
 
रामेश्वरच्या भावानं काय सांगितलं?
रामेश्वरचा मोठे भाऊ कालूराम कोटपूतलीमध्ये राहून मजुरी करतात. घटनेची माहिती मिळताच ते घरी आले आहेत. ते सांगतात, रामेश्वर गौशाळेत काम करण्याबरोबरच डफली वाजवायचा. गावातील एखाद्या वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर रामेश्वरला डफली वाजवण्यासाठी बोलावलं जायचं. तो अतिशय हसतमुख होता आणि त्याला नाचणं, गाणं आवडायचं." कालूराम कंठ दाटून आलेल्या आवाजात सांगत होता, "मी कोटपूतली मध्ये रामेश्वरच्या लग्नाचं बोलणं करत होतं. मात्र इकडे ही घटना घडली." रामेश्वर आपल्या घरच्या मागील बाजूस असलेल्या गोशाळेत जवळपास चार वर्षांपासून काम करत होता. गोशाळेत काम करणाऱ्या संतोष सांगतात, "तो खूप चांगला मुलगा होता. तो खूप गाणी म्हणायचा आणि हसतमुख असायचा. आम्ही सकाळी पाच वाजताच कामावर यायचो. आम्ही इथे चारा घालणे आणि साफ सफाईचं काम करतो." रामेश्वरची आठवण काढून संतोष रडू लागतात.
 
त्यांच्याच दारूच्या दुकानातून दारू विकत घेण्याचा दबाव
सूरजगड पासून बलौदा गावात येण्याच्या मुख्य रस्त्यावरच गावात दारूचं दुकान आहे. राजस्थान सरकारच्या अबकारी विभागाकडून या दारूच्या दुकानाचा घेण्यात आलेला परवाना सुशील कुमार या बलौदा गावातील व्यक्तीच्या नावावर आहे. मात्र सुशील कुमारनं हे दारूचं दुकान चालवण्यासाठी बेकायदेशीपणे आरोपी चिंटूला दिलं होतं. चिंटू गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्या विरुद्ध सूरजगड पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. गावकऱ्यांनी आपल्याच दारूच्या दुकानावरून दारू विकत घ्यावी यासाठी चिंटू गावकऱ्यांना धमकवायचा आणि मारहाण करायचा.
 
बलौदा ग्रामपंचायत आहे. गावच्या ग्रामपंचायत कार्यालयाजवळ उभे असणारे कालू शर्मा सांगतात, "वीस दिवस आधी याच लोकांनी जीतू आणि पवन यांनादेखील मारहाण केली होती आणि मला देखील कोंबडा होण्यास सांगितलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की आमच्या दारूच्या दुकानावरून दारू विकत घ्या." कालू शर्मा सांगतात, "या लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यांनी आता त्या तरुणाला मारून टाकलं आहे, उद्या ते आणखी कोणाला तरी मारतील."
 
पोलिस अधीक्षक राजर्षी राज वर्मा म्हणतात की "चौकशीत आरोपींनी सांगितलं आहे की रामेश्वर देशी दारू प्यायचा. आरोपी दारूच दुकान चालवायचे, त्यामुळे त्यांना या गोष्टीचा राग होता की तो त्यांच्या दुकानातून दारू का विकत घेत नाही. याच कारणामुळे त्याला मारहाण करण्यात आली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला."
 
"आम्ही हातपाय जोडले, पाया पडलो मात्र त्यांनी सोडलं नाही"
जेठू यांचा मुलगा मनीष सांगतो, "मी एका कार्यक्रमात गेलेलो होतो. तिथे लोकांनी सांगितलं की माझे वडील आणि रामेश्वर यांना घेऊन गेले आहेत. ते ऐकताच आम्ही जेवण अर्धवट सोडून पळालो."
 
"मी आणि माझी पत्नी हवेलीत गेलो. तिथे माझ्या वडिलांना कोंबडा बनवण्यात आलं होतं. रामेश्वरचे हात बांधलेले होते. काठी आणि बेल्टने त्याला मारहाण करण्यात येत होती. मी आणि माझ्या पत्नीनं त्यांना हात जोडून सांगितलं, त्यांच्या पाया पडलो. मात्र त्यांनी सांगितलं की तुम्ही आता जा, यांना आम्ही थोड्या वेळानं सोडू."
 
मनीष सांगतो, "मी गावातील लोकांकडे मदत मागण्यासाठी गेलो. मात्र सगळ्यांनीच सांगितलं की सूरजगडला पोलिसांकडे जा. मात्र पोलिस स्टेशनमध्ये जाण्याची माझी हिंमत झाली नाही. मला भीती वाटत होती की पोलिसांकडे गेलो तर हे लोक काय करतील." तो पुढे सांगतो, "माझ्या वडिलांना त्यांनी धमकी देखील दिली की जर आमच्याविरुद्ध जबाब नोंदवलास तर तुला गोळी घालू. त्यानंतर माझ्या वडिलांना हवेलीतून सोडण्यात आलं होतं."
 
गोशाळेत काम करणाऱ्या संतोष म्हणतात, "तो अकरा वाजता घरी गेला होता. दुपारी तीन वाजता मला कळालं की दारूचं दुकानवाले रामेश्वरला घेऊन गेले आहेत. मी अनेक लोकांना फोन करून सांगितलं की चला आपण त्याला सोडवून आणू. मात्र सोबत येण्यास कोणीही तयार झालं नाही."
 
टार्गेट पूर्ण न झाल्यास अबकारी विभाग करतो दंड
राजस्थानचा अबकारी विभाग वेगवेगळ्या दारूच्या दुकानांना एका निश्चित गॅरंटीत म्हणजे ठराविक रकमेची दारू विकण्याचं टार्गेट देतो. जर त्या रकमेपेक्षा कमी रकमेची दारूविक्री झाली तर तो विभाग दारू दुकान मालकावर दंड आकारतो. झुंझुनू जिल्हा अबकारी अधिकारी अमरजीत सिंह यांनी बीबीसीला सांगितलं की "बलौदा गावातील दारूच्या दुकानांसाठी वर्षाची पन्नास लाख रुपयांची गॅरंटी आहे. मात्र त्यांनी पन्नास लाख रुपयांची दारू विक्री करायची आहे. म्हणजेच विभागाच्या नियमानुसार जर दारू दुकानदार वर्षभरात पन्नास लाख रुपयांच्या दारूची विक्री करू शकला नाही तर त्याच्यावर दंड आकारण्यात येतील."
 
आरोपी चिंटू बलौदा गावात परवाना नसताना बेकायदेशीर पद्धतीनं दारूचं दुकान चालवत होता. यावर कारवाई का करण्यात आली, असं विचारल्यावर अमरजीत सिंह म्हणतात, "आम्हाला याबद्दल माहिती नव्हती." ते सांगतात की, "ज्याच्या नावावर परवाना होता त्यानेदेखील संबंधित विभागाला याबद्दल सांगितलं नव्हतं. मात्र आता तीन दिवसांसाठी दारूचं दुकान बंद करण्यात आलं आहे आणि परवाना रद्द करण्यासाठी कारवाई केली जाते आहे."
 
पोलिसांची कारवाई
या तीन आरोपींनी बलौदा गावात बेकायदेशीरपणे घरं बांधली आहेत असं सांगत 23 मे ला संध्याकाळी प्रशासनानं त्यावर बुलडोझर चालवला होता. झुंझुनू जिल्हा पोलिस अधिक्षक राजर्षी राज वर्मा यांनी बीबीसीला सांगितलं की "घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ जिल्ह्यातून स्पेशल टीम तयार करून 48 तासांमध्येच मुख्य आरोपींना अटक करण्यात आली." "या प्रकरणात सहा मुख्य आरोपी आहेत. पाच आरोपींना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे. आणखी एका आरोपीवरदेखील गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यालादेखील लवकरच अटक केली जाईल. हा आरोपी तिथे हजर होता मात्र थेटपणे तो घटनेत सामील नव्हता." पोलिस अधिक्षक वर्मा यांचं म्हणणं आहे की राजस्थान पोलिस हे प्रकरण गांभीर्यानं हाताळते आहे आणि लवकरच आरोपपत्र दाखल केलं जाईल.
 
मृत पावलेल्या रामेश्वरचे मोठे भाऊ, 38 वर्षांचे काळू राम यांनी घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे पंधरा तारखेला सूरजगड पोलिस स्टेशनमध्ये चिंटू, प्रवीण कुमार, सुभाष, सुक्खो, प्रवीण, दिपेंद्र सह अन्य एका विरोधात एफआयआर नोंदवला होता. पोलिसांनी या प्रकरणात आयपीसीचं कलम 143, 341, 323, 362, 342, 302, 201 आणि एससी एसटी अॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदवला असून आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी या घटनेचा व्हिडिओ बनवला होता. तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेची सर्वत्र चर्चा होते आहे.
 
घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. कारवाई करण्यास विलंब झाल्याबद्दल पोलिस अधिक्षक वर्मा सांगतात, "घटना घडल्यानंतर 16 तारखेलाच आम्ही आरोपींना अटक केली आहे. व्हिडिओ आता दोन दिवस आधीच सोशल मीडियावर आला आहे."
 
घटनेचे राजकीय पडसाद
या घटनेनंतर राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोशल मीडिया व्यासपीठ, एक्स वर ट्विट करत म्हटलं, "झुंझुनूमध्ये दारू माफियाकडून एका दलित तरुणाला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली आणि त्याचबरोबर त्याचा व्हिडिओदेखील बनवून व्हायरल करण्यात आला. ही गोष्ट राजस्थानात सरकार आणि पोलिस प्रशासन दुर्बळ झाल्याचं चिन्हं आहे."
 
"राज्यात भाजपा सरकार आल्यानंतर दलितांविरोधातील गुन्ह्यांमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये प्रतिमा निर्माण करण्यात गुंग असलेल्या राजस्थान सरकारनं या घटनांची गांभीर्यानं दखल घ्यावी आणि यापुढे या प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काम करावं." आम आदमी पार्टीनं देखील ट्विट केलं आहे, "मोदी सरकारमध्ये दलितांचे अधिकार तर काढून घेतले जात आहेतच, त्याचबरोबर त्यांची निर्दयीपणे हत्यादेखील केली जाते आहे." भीम आर्मीचे राजस्थानातील माजी अध्यक्ष जितेंद्र हटवाल यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी बीबीसीला सांगितलं, "दलित समाजात या घटनेमुळे राग आहे. या प्रकारच्या घटना सातत्यानं घडत आहेत. यांना आळा बसावा यासाठी कठोर कायद्याची आम्ही मागणी करत आहोत." त्यांनी पीडित कुटुंबाला पन्नास लाख रुपयांची नुकसान भरपाई आणि एक सरकारी नोकरी देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
 
कॉंग्रेसचे झुंझुनू जिल्हा अध्यक्ष दिनेश सुंडा यांनी या घटनेबाबत बीबीसीला सांगितलं की "राज्यातील भाजपा सरकार, आरोपींना अटक केली आणि त्यांच्या घरावर बुलडोझर चालवल्याचं सांगून या घटनेतून हात झटकते आहे. मात्र हे तरुण गुन्हे का करत आहेत. बेरोजगार तरुण दारू पिणं किंवा दारूच्या व्यापाराच्या दलदलीत अडकत चालले आहेत. केंद्र आणि राज्य सरकार तरुणांना रोजगार देत नाही आणि त्यांच्याकडे लक्ष देत नाही म्हणून गुन्ह्यांमध्ये वाढ होते आहे."
 
भाजपाचे झुंझुनू जिल्ह्याचे अध्यक्ष लाल सैनी म्हणतात, "सरकार आणि पोलिस प्रशासनानं तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. गुन्हेगारांमध्ये कायद्याची जरब असली पाहिजे जेणेकरून या प्रकारच्या दुर्दैवी घटना पुन्हा घडता कामा नये. त्यामुळेच गुन्हेगारांना सांगण्यात येतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यास सर्व प्रकारची कारवाई होण्याची शक्यता आहे."

Published By- Dhanashri Naik 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments