आंध्र प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू यांचे एक विचित्र विधान समोर आले आहे. या मुळे चांगलीच चर्चा केली जात आहे. भाजपची सत्ता आल्यास राज्यात दर्जेदार दारू 50 रुपयांना उपलब्ध करून दिली जाईल, असे त्यांनी जाहीर सभेत आवाहन केले आहे. सध्या राज्यात दर्जेदार दारूची क्वार्टरची एक बाटली 200 रुपयांना मिळत असल्याचे सांगितले. मंगळवारी पक्षाच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यादरम्यान, राज्यात बनावट ब्रँडची दारू चढ्या भावाने विकली जात असल्याचा आरोप करत वीरराजू यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. तर राज्यात चांगली ब्रँडेड दारू उपलब्ध नाही.
भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यातील प्रत्येक व्यक्ती दारूवर महिन्याला 12 हजार रुपये खर्च करत आहे. राज्यात एक कोटी लोक दारू पितात, या एक कोटी लोकांनी भाजपला मतदान करावे, असे मला वाटते. भाजपचे सरकार आल्यास त्यांना 75 रुपयांना दर्जेदार दारूची बाटली दिली जाईल. जर महसूल चांगला असेल तर 50 रुपये प्रति बाटलीही विकली जाईल. असे आश्वासन त्यांनी जनतेला दिले आहे. सत्ताधारी पक्षाच्या लोकांचे दारूचे कारखाने असून, ते राज्यात निकृष्ट दर्जाची दारू देत असल्याचा आरोप त्यांनी केला.