देशात एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबामधील चिमुकलीला दुर्मीळ आजार झाला आहे. मात्र, उपचाराकरिता येणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च करणे, कुटुंबीयांकरिता कठीण झाले आहे. दिल्ली मधील ७ वर्षीय माहीला गंभीर आजार झाला आहे.
हा अत्यंत दुर्मिळ आजार असल्याने, लाखो- करोडो मुलांमध्ये फारच क्वचित मुलांना होत असतो. माहीचे वडील सुशील कुमार यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांकडे यावेळी मदत मागितली आहे. माहीने स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका व्हिडिओद्वारे मदत करण्याची विनंती केली आहे. सांगितलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या केंद्रीय विद्यालयामध्ये दुसरीत शिकणाऱ्या अवघ्या ७ वर्षांच्या माहीला अत्यंत दुर्मीळ असा हा आजार झालेला आहे.
या आजारात रुग्णाच्या हाडांची वाढ थांबत असते. हळूहळू शरीराची वाढ देखील खुंटत जात असते. हाडांचे नुकसान वाढत जात असते. तसे रुग्णही अपंग होत असतो, आणि आजार अधिक तीव्र झाल्यास मृत्यूचाही धोका असतो. आतापर्यंत माहीच्या उपचारांकरिता लाखो रुपये खर्च झाले आहेत. तिच्या वडिलांनी याकरिता लाखो रुपयांचे कर्ज घेतले आहे. पण माहीच्या उपचाराकरिता २ कोटी ४३ लाख रुपयांची गरज आहे, जी रक्कम जमा करणे अशक्य आहे.
कुटुंबीयांनी माहीच्या उपचाराकरिता चक्क पंतप्रधानांकडे मदत मागितली आहे. या अगोदर मोदींनी अशा रुग्णांच्या उपचाराकरिता तत्काळ मदतीचे आदेश दिल्याची उदाहरणे आहेत. यामुळे माहीच्या बाबत देखील तिच्या कुटुंबाला आशा वाटत आहे. दिल्ली मधील एम्स AIIMS रूग्णालयात अशा एका रुग्णावर उपचार सुरू असल्याने माहीवर एम्समध्ये चांगले उपचार होतील, अशी आशा माहीचे वडील सुशील कुमार यांना यावेळी वाटत आहे.