Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

निमिषा प्रिया : येमेनमध्ये भारतीय नर्सला झाली फाशीची शिक्षा, जीव वाचवण्याचा त्यांच्याकडे एकमेव मार्ग शिल्लक

suicide
, बुधवार, 6 डिसेंबर 2023 (23:31 IST)
केरळमध्ये राहणाऱ्या 19 वर्षांच्या निमिषा प्रियाने 2008 ला तिची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी येमेन गाठलं होतं.
निमिषा यांच्या आई केरळमध्ये मोलकरीण म्हणून काम करतात. आपल्या मुलीबद्दल सांगताना त्या म्हणाल्या की, "निमिषा येमेनला गेली आणि तिथे एका सरकारी रुग्णालयात नर्स म्हणून काम करू लागली, आम्हाला वाटलं होतं की आतातरी आमची गरिबी दूर होईल."
 
येमेनला जाऊन सुमारे पंधरा वर्षं झाली तरी निमिषा यांच्या परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. परदेशी जाऊन आर्थिक परिस्थिती सुधारण्याचं त्यांचं स्वप्न आता एक दुःस्वप्न बनलं आहे.
 
कारण येमेनमध्ये राहणाऱ्या 34 वर्षीय तलाल अब्दो माहदी यांची हत्या केल्याप्रकरणी निमिषा यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे आणि येमेनच्या तुरुंगात सध्या त्या अखेरचे दिवस मोजत आहेत. मागच्या अनेक वर्षांपासून युद्धग्रस्त असणाऱ्या येमेनच्या मध्यवर्ती तुरुंगात त्यांना आता ठेवण्यात आलंय.
 
येमेनच्या सर्वोच्च न्यायिक परिषदेने निमिषा यांनी केलेला माफीचा अर्ज फेटाळून लावला. पण येमेनमध्ये शारिया कायद्याचं पालन केलं जात असल्यामुळे त्यांच्याकडे आणखीन एक मार्ग शिल्लक आहे आणि तो म्हणजे मृत व्यक्तीच्या कुटुंबाला 'दिया' किंवा 'ब्लड मनी' च्या माध्यमातून नुकसानभरपाई देऊन त्यांच्याकडून माफी मिळवणं.
 
त्यामुळे आता हा मार्ग वापरून निमिषा यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आणि काही समर्थक अहोरात्र प्रयत्न करत आहेत.
 
'तिच्याऐवजी मला फाशी द्या'
स्वतःच्या मुलीवर कोसळलेल्या संकटाबाबत बोलताना निमिषा यांच्या 57 वर्षांच्या आई प्रेमा कुमारी यांना अनेकदा रडू कोसळलं.
 
कोचीच्या दक्षिण भागात राहणाऱ्या प्रेमा कुमारी म्हणतात की, "मी येमेनला जाऊन त्यांच्याकडे दयेची भीक मागीन. मी त्यांची माफी मागेन, तिच्याऐवजी माझा जीव घ्या अशी विनंती त्यांना करेन. तिला एक लहान मुलगी आहे आणि त्या मुलीला तिच्या आईची गरज आहे."
 
पण येमेनला जाणं अजिबात सोपं नाही. भारत सरकारने 2017 मध्ये येमेनला जाण्यावर बंदी घातली होती आणि ती बंदी अजूनही कायम आहे. त्यामुळे तिथे प्रवास करण्यासाठी विशेष परवानगीची गरज लागते.
 
सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल अॅक्शन कौन्सिल नावाच्या एका ग्रुपने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, निमिषाची आई आणि तिची 11 वर्षांची मुलगी मिशाल यांना सनाला जाण्याची परवानगी मागितली आहे. त्यांच्यासोबत दोन कौन्सिल सदस्यही असतील असं त्या अर्जात म्हटलं आहे.
 
मागच्या शुक्रवारी (1 डिसेंबर) भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज फेटाळला असून. येमेनमध्ये भारताचा दूतावास नसल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव ही परवानगी नाकारल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
 
येमेनची राजकीय परिस्थिती बघून भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियामधून काम करणाऱ्या हौथी बंडखोरांनी येमेनच्या अधिकृत सरकारविरुद्ध बंड करून राजधानी सनाचा ताबा मिळवला आहे. भारताने हौथी बंडखोरांच्या सरकारला मान्यता दिलेली नाही त्यामुळे भारतीय नागरिकांसाठी येमेनला जाणं ही अत्यंत धोकादायक गोष्ट आहे. राजधानी सनाला जाण्यासाठी त्यांना आधी एडनला जावं लागेल आणि तिथून 12-14 तासांचा रस्त्याने प्रवास करून सना गाठावं लागेल.
 
सेव्ह निमिषा कौन्सिलने त्यांचा अर्जाचा पुनर्विचार करण्याची विनंती दिल्ली उच्च न्यायालयाला केली आहे. आणि प्रत्येक दिवसागणिक प्रेमा कुमारी यांची काळजी वाढतच आहे. त्या आपल्या मुलीबाबत बोलताना म्हणतात की, "माझ्या मुलीचा परदेशात मृत्यू व्हावा, असं मला वाटत नाही."
 
सेव्ह निमिषा कौन्सिलचे सदस्य असणारे बाबू जॉन म्हणतात की, "निमिषासोबत जे काही घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे. तिच्यासोबत असं घडायला नको होतं."
 
ते म्हणाले की निमिषाने उज्वल भविष्यासाठी येमेन गाठलं होतं पण यादवी युध्दामुळं ती तिथेच अडकली.
 
निमिषा अभ्यासात अत्यंत हुशार होती आणि एका स्थानिक चर्चने तिच्या नर्सिंगच्या शिक्षणात तिला मदत केल्याची माहिती प्रेमा कुमारी यांनी दिली. पण ती केरळमध्ये नर्सिंगच्या नोकरीसाठी अपात्र होती कारण तिने डिप्लोमा करण्यापूर्वी तिचं शालेय शिक्षण पूर्ण झालं नव्हतं.
 
2011 ला निमिषा यांनी भारतात येऊन टॉमी थॉमस यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर हे जोडपं येमेनला परतलं, तिथे टॉमी यांनी एका इलेक्ट्रिशियनचा सहाय्यक म्हणून काम केलं. पण त्यांना मिळणाऱ्या पगार कमी असल्याने 2014 मध्ये टॉमी आणि त्यांची दोन वर्षांची लहान मुलगी भारतात परतले. सध्या ते कोचीमध्ये रिक्षा चालवतात.
 
त्याचवर्षी निमिषा यांनी सरकारी रुग्णालयातली कमी पगाराची नोकरी सोडून स्वतःचं क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. येमेनमध्ये एखादा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला स्थानिक व्यक्तीसोबत भागीदारी करावी लागते असा कायदा आहे आणि तिथेच या गोष्टीत माहदी यांचा प्रवेश होतो. माधी यांचा कपड्याचा व्यवसाय होता आणि निमिषा यांनी सुरू केलेल्या क्लिनिकमध्येच त्यांच्या बायकोची प्रसूती झाली होती.
 
जानेवारी 2015 मध्ये, जेव्हा निमिषा आपल्या मुलीच्या बाप्तिस्म्यासाठी भारतात आल्या होत्या त्यावेळी माहदी हेदेखील सुट्ट्यांसाठी भारतात आले होते.
 
निमिषा आणि त्यांच्या पतीने त्यांच्या नातेवाईक आणि काही मित्रांकडून सुमारे पन्नास लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्यानंतर एका महिन्याने निमिषा येमेनला स्वतःच क्लिनिक सुरू करण्यासाठी परत गेल्या. तिथे त्यांच्या पतीला आणि मुलीला बोलावून घेण्यासाठी त्यांनी कागदपत्रांची तयारीही सुरू केली होती पण मार्चमध्ये येमेनचं गृहयुद्ध सुरू झालं आणि ते दोघे येमेनला निमिषा यांच्याकडे जाऊ शकले नाहीत.
 
हे युद्ध सुरू झाल्यानंतर भारत सरकारने 4,600 भारतीय आणि 1,000 इतर देशांच्या नागरिकांची येमेनमधून सुटका केली. पण युद्धानंतरही येमेनमध्येच राहिलेल्या लोकांमध्ये निमिषा यादेखील होत्या. थॉमस म्हणाले की, "आम्ही ते क्लिनिक सुरू करण्यासाठी एवढे पैसे गुंतवले होते त्यामुळे तिला परत येणं शक्य झालं नाही."
 
थॉमस त्यांच्या मोबाईलवर त्या दोघांनी सुरू केलेल्या अल अमन मेडिकल क्लिनिकचे फोटो दाखवतात. त्यांनी दाखलेल्या फोटोमध्ये त्यांच्या क्लिनिकमध्ये असलेल्या निळ्या रंगाच्या नवीन खुर्च्या, स्वत: कक्ष, लॅबशेजारी पांढरा कोट घालून उभा राहिलेला एक व्यक्ती, प्रतिक्षालयात लावलेला नवाकोरा सोनीचा टीव्ही आणि औषधांच्या दुकानात बसलेले माहदी दिसत होते.
 
त्यांच्या क्लिनिकला लोकांचा चांगला प्रतिसादही मिळू लागला होता पण काही काळाने निमिषा यांनी माहदी यांच्याबाबत तक्रारी सुरू केल्याचं थॉमस म्हणाले.
 
दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली एक याचिका बीबीसीने पहिली आणि त्यात असं लिहिलं आहे की, "माहदी यांनी कोचीला आल्यावर निमिषा यांच्या लग्नाचा एक फोटो चोरला आणि त्या फोटोमध्ये काही बदल करून त्यांनी निमिषा यांच्याशी लग्न केल्याचा बनाव रचला."
 
त्या याचिकेत असंही लिहिलं आहे की, "माहदी यांनी निमिषा यांचा शारीरिक छळ केला, त्यांचा पासपोर्ट जप्त केला जेणेकरून निमिषा येमेन सोडून जाऊ शकणार नाहीत." निमिष यांनी या त्रासाला कंटाळून पोलिसांकडे तक्रार केली तेंव्हा तेथील पोलिसांनी "काहीही कारवाई तर केली नाहीच पण निमिषा यांनाच सहा दिवस तुरुंगात टाकलं."
 
खून आणि त्यानंतर झालेली अटक
थॉमस यांनी 2017 ला पहिल्यांदा या खुनाची माहिती मिळाली.
 
याबाबत बोलताना ते म्हणतात की, "येमेनमध्ये एका मल्याळी नर्सला तिच्या पतीचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तिने मृतदेहाचे तुकडे केले. अशा मथळ्याची ती बातमी होती." त्यानंतर येमेन आणि सौदी अरेबियाच्या सीमेवर निमिषा यांना अटक झाली होती. येमेनमध्ये माहदी यांचा मृतदेह एका पाण्याच्या टाकीत सापडल्यानंतर एक महिन्याने निमिषा यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं.
 
थॉमस त्यांच्या लग्नाचा अल्बम दाखवत विचारत होते की, "निमिषाने माझ्यासोबत लग्न केलेलं असताना हा माणूस तिचा नवरा कसा असू शकतो?"
 
थॉमस म्हणाले की, "अटक झाल्यानंतर काही दिवसांनी निमिषा यांनी थॉमस यांना फोन केला तेंव्हा ते दोघेही रडत होते. ती म्हणाली की तिने माझ्यासाठी आणि आमच्या मुलीसाठी हे सगळं केलं. तिला सोपा मार्ग निवडून माहदीसोबत संसार करता आला असता पण तिला ते करायचं नव्हतं. तिला सुनावलेली शिक्षा कळल्यावर माझं तिच्यावर असणारं प्रेम खूप वाढलं आहे."
 
स्थलांतरितांच्या हक्कांसाठी लढणारे आणि सर्वोच्च न्यायालयात काम करणारे वकील केआर सुभाष चंद्रन हेच निमिषा यांच्या आईचा खटला दिल्ली उच्च न्यायालयात लढत आहेत. त्यांनी सांगितलं की, "निमिषाला माहदीचा खून करायचा नव्हता. ती सुद्धा एक पीडित आहे."
 
ते म्हणाले की, "माहदीने जप्त केलेला पासपोर्ट परत मिळवून तिला भारतात यायचं होतं. म्हणूनच तिने त्याला बेशुद्ध केलं पण औषधांच्या अतिवापरामुळे त्याचा मृत्यू झाला."
 
आखाती देशांमध्ये अर्ध-कुशल आणि अकुशल भारतीय कामगारांच्या शोषणाचं प्रमाण मोठं आहे. या विषयांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की अनेक आखाती देशांमध्ये 'कफाला' नावाची पद्धत वापरली जाते, ज्यानुसार कंत्राटदार त्यांच्याकडील कामगारांची कागदपत्रं आणि पासपोर्ट ताब्यात घेतात. या प्रकाराला आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने आधुनिक गुलामगिरी असं नाव दिलं आहे. यामुळे मजुरांचा आणि कामगारांचा अनेक मार्गांनी छळ होत असल्याचीही माहिती त्यांनी दिलीय.
 
चंद्रन म्हणाले की, "कफालाला बळी पडणाऱ्यांमध्ये बहुतांश भारतीय महिला असतात ज्या घरगुती काम करण्यासाठी आखाती देशांमध्ये जाऊन स्वतःची गरिबी मिटवण्याचा प्रयत्न करतात."
 
चंद्रन निमिषाच्या खटल्याची पुन्हा सुनावणी घेण्याची मागणीही करत आहेत, जेणेकरून निमिषा यांना पुन्हा बचाव करण्याची संधी मिळू शकेल.
 
ते म्हणाले की, "तिच्या खटल्याची योग्य ती कायदेशीर सुनावणीच झाली नाही. तिथल्या न्यायालयाने तिला एक कनिष्ठ वकील दिला होता पण अरबी भाषा येत नसल्यामुळे ती त्याच्याशी बोलूच शकली नाही. तिला कोणताही दुभाषी दिला गेला नाही त्यामुळे ती कोणत्या कागदपत्रांवर सही करत आहे हेही तिला कळलं नाही."
 
दिल्लीत असणाऱ्या येमेनच्या अधिकाऱ्यांनी या खटल्यावर कसलंच अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
 
सेव्ह निमिष कौन्सिलच्या उपाध्यक्ष असणाऱ्या वकील दीपा जोसेफ म्हणाल्या की, निमिषाला वाचवण्यासाठी भारत सरकारचं सहकार्य खूप महत्वाचं असणार आहे. माहदी यांच्या कुटुंबीयांची माफी मागून ब्लड मनी देणे आणि निमिषाची सुटका करणे हाच एकमेव उपाय आहे."
 
केरळच्या एका सुप्रसिद्ध व्यावसायिकाने आधीच निमिषाच्या सुटकेसाठी एक कोटी रुपयांची मदत करण्याची तयारी दाखवलेली आहे. आणखीन पैसे लागत असतील तर केरळचे नागरिक आणि समाज नक्कीच मदत करेल असा विश्वास सेव्ह निमिष कौन्सिलला आहे.
 
जोसेफ म्हणाल्या की, "मृताचे कुटुंबीय ही नुकसानभरपाई स्वीकारतील आणि निमिषाची सुटका होईल अशी मला आशा आहे. तिने अतिशय गंभीर गुन्हा केलेला असला तरी तिच्या आई आणि मुलीसाठी मला तिला वाचवायचं आहे."
 
निमिषा यांच्या आई प्रेमा कुमारी यांना येमेनला जाऊन माहदी कुटुंबीयांची माफी मागण्याची आशा करत आहेत आहेत.
 
येमेनच्या न्यायालयाने निमिषा यांचा माफी अर्ज फेटाळण्याआधी थॉमस आणि निमिषा यांचं बोलणं झालं होतं. त्या संभाषणात निमिषा आशावादी वाटत होत्या. त्या म्हणाल्या की, "माझ्यासाठी प्रार्थना करा." पण निकाल लागल्यानंतर मात्र त्या 'निराश' वाटत असल्याची माहिती थॉमस यांनी दिली.
 
ते म्हणाले की, "तिचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत हे सांगून मी तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला पण तिला ते पटत नव्हतं. मी अजूनही कशी आशावादी राहू शकते? असा प्रश्न तिने मला विचारला."
 
Published By- Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जागतिक जीवन विमा कंपन्यांच्या यादीत LIC ही जगातील चौथी सर्वात मोठी विमा कंपनी