अयोध्येत राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी हालचाली तीव्र झाल्या आहेत. सर्व नियम लक्षात घेऊन हा कार्यक्रम भव्य स्वरूपात आयोजित केला जाईल. असे म्हटले जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः भूमिपूजन करतील, परंतु पंतप्रधान कार्यालयाने अद्याप याची माहिती दिलेली नाही. पंतप्रधान मोदी यांच्या व्यतिरिक्त इतर अनेक दिग्गजांना आमंत्रण दिले जावू शकते.
राम मंदिर चळवळीशी संबंधित भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संत समाजातील लोकांनाही भूमिपूजन कार्यक्रमासाठी बोलावले जाऊ शकते. त्यापैकी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, भाजपचे दिग्गज नेते मुरली मनोहर जोशी यांना देखील बोलावण्यात येणार आहे. तसेच उमा भारती, विनय कटियार आणि साध्वी ऋतंभरा यांना बोलवले जाऊ शकते. आलोक कुमार, मिलिंद परांडे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सहभागी होऊ शकतात. मोहन भागवत आणि अन्य काही नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सहभागी होऊ शकतात.
सरकारमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्यतिरिक्त गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे देखील या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. व्हीआयपी अतिथींची संख्या केवळ 50 पर्यंत असेल.
याशिवाय अयोध्याच्या पाच-सहा भागात एक मोठा स्क्रीन बसविला जाईल, जेणेकरून लोकांना कार्यक्रम पाहण्यात कोणतीही अडचण येऊ नये. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास श्रीराम लला यांना मणिरामदास छावणीच्या वतीने 40 किलो चांदीची सिला अर्पण करतील. ही चांदीची शिला पूजेच्या वेळी मंदिराच्या पायाभरणी दरम्यान वापरली जाईल.