लोणावळ्यातील ड्युक्स नोज परिसरातून शुक्रवारी बेपत्ता झालेल्या तरुण अभियंत्याचा मृतदेह आज पाचव्या दिवशी ड्युक्स नोजच्या दरीत पायथ्यापासून साधारण साडेतिनशे फूट खोल दरीत आढळून आला. INS शिवाजीच्या पथकाला हा मृतदेह मिळून आला.
फरहान अहमद (वय 24, रा. दिल्ली) असे या तरुणाचे नाव आहे. हा युवक शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून बेपत्ता झाला होता. सलग चार दिवस त्याचा विविध पद्धतीने शोध सुरु होता. मात्र तो मिळून न आल्याने त्याला शोधून देणाऱ्याला सोमवारी 1 लाख रुपयांचे बक्षिस ठेवण्यात आले होते.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, फरहान अहमद हा दिल्ली येथील अभियंता काही कामासाठी कोल्हापुरला गेला होता. तो एका रोबोट बनविण्याच्या कंपनीत काम करीत होता. त्याला गिर्यारोहणाची आवड असल्याने कोल्हापूर व पुणे येथील काम उरकल्यानंतर तो लोणावळ्यात आला होता. शुक्रवारी ड्युक्स या ठिकाणी तो फिरायला गेला असताना, त्याला आपण रस्ता चुकलो असून, भरकटल्याचे समजल्यानंतर त्याने भावाला फोन करून रस्ता चुकलो असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर काही वेळात त्याचा मोबाईल बंद झाला.
फरहानच्या शोधासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलातील श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं. त्याबरोबरच शिवदुर्ग रेस्क्यू टीम, वन्यजीव मावळ आणि पोलीस दल शोध घेत होते. तर आज सकाळपासून NDRF आणि INS कडून फरहान शहा याचा शोध घेण्यात येत होता. अखेर आज सकाळी INS ला फरहान याचा मृतदेह डुक्सनोझ जंगलात आढळून आला.