भारतीय लष्कराला दुर्गम भागात आणि उंचावर असलेल्या भागात माल पोहोचवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषत: 18 हजार फुटांवरील हलक्या वजनाच्या वस्तू किंवा शस्त्रे पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टरवर अवलंबून राहावे लागते किंवा रस्ता असेल तर वाहनानेच वाहतूक करता येते. आता हे अवघडकाम ड्रोनद्वारे केले जाईल. भारतीय लष्कराकडे 40 किलो पेलोडची क्षमता असलेले स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेले ऐरावत ड्रोन्स आवडले आहेत आणि त्यांची डिलिव्हरी देखील लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे
फिरोजाबादच्या आयुध उपकरण फॅक्टरी हजरतपूर (OEFHZ) ने लष्करी ऑपरेशन्ससाठी 20 ते 100 किलो वजन वाहून नेण्याची क्षमता असलेले लॉजिस्टिक ड्रोन तयार केले आहेत, यामध्ये 20 किलो वाहून नेण्याची क्षमता असलेले ऐरावत-1, ऐरावत-2 यांचा समावेश आहे. तर 100 किलोग्रॅम पेलोड क्षमता असलेले ऐरावत-3 अजूनही विकासाच्या टप्प्यात आहे. ऐरावत-3 हिमालयाच्या उंच भागात भारतीय लष्करासाठी एअर ॲम्ब्युलन्स म्हणून काम करेल.
ऑर्डनन्स कंपनीचा दावा आहे की ऐरावत हे जगातील पहिले हाय अल्टीट्यूड लॉजिस्टिक ड्रोन आहे.
या वर्षाच्या सुरुवातीस उत्तर काश्मीर मध्ये उरी, कुपवाडा, पूर्व लडाखमधील न्योमाआणि अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टर मध्ये ऐरावत -2 लॉजिस्टिक ड्रोनच्या चाचण्या घेण्यात आल्या. खराब हवामानात देखील ड्रोनने पेलोड सह 5000 मीटर उंचीवर यशस्वी उड्डाण केले.
ऐरावत 2 चे वैशिष्टये म्हणजे त्याची पेलोड क्षमता 40 किलो आहे. त्यात आठ रोटर आहे. हे चारही दिशात ड्रोन फिरवू शकतात. तासाभरात हे पूर्ण चार्ज होऊ शकते. 45 मिनिटे हवेत राहू शकते. कंपनीचा दावा आहे की ऐरावत -2 लॉजिस्टिक ड्रोन समुद्र किनाऱ्यापासून 18 हजार फूट पर्यंत उड्डाण करू शकते.
ऐरावत-3 भारतीय लष्करात सामील झाले तर ती उंचावर असलेल्या भागात एअर ॲम्ब्युलन्स म्हणून खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकते.काहीवेळा खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरची मदत मिळत नाही आणि अनेक दिवस वाट पाहावी लागते. ऐरावत-3 आल्यानंतर जखमी आणि आजारी सैनिकांना वैद्यकीय केंद्रात नेणे शक्य होणार आहे. कंपनी या ड्रोन मध्ये अचूक स्थान आणि हवामानाची माहितीसाठी रडार यंत्रणा जोडणार आहे.