शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सदस्य विनायक मेटे यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी बीड शहरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एका अधिकाऱ्याने रविवारी रात्री ही माहिती दिली. मेटे यांचे पार्थिव मुंबईहून बीडला रस्त्याने अॅम्ब्युलन्समध्ये नेण्यात येणार आहे.
अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे
सोमवारी सकाळी 8 ते 10.30 या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याचे शिवसंग्राम पक्षाने सांगितले. दुपारी शासकीय इतमामात अंत्ययात्रा काढण्यात येणार असून स्वातंत्र्यदिनाच्या अधिकृत कार्यक्रमांच्या समाप्तीनंतर दुपारी 4 वाजता मेटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कार अपघातात मृत्यू झाला
मेटे यांच्या अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहण्याची शक्यता पक्षाकडून व्यक्त करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील माडप बोगद्याजवळ मुंबई-पुणे महामार्गावर विनायक मेटे (52) यांची कार ट्रकच्या पाठीमागून धडकल्याने त्यांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात मेटे यांचा चालक आणि त्यांच्यासोबत असलेला एक पोलीस हवालदार जखमी झाला आहे.