जगभरात आज 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस सण साजरा केला जाणार आहे. हल्ली शाळा, महाविद्यालय आणि खासगी कार्यालयात देखील ख्रिसमसनिमित्त विविध संकल्पना राबवून हा सण साजरा केला जातो.
मात्र या वर्षी विश्व हिंदू परिषदेने शाळांमध्ये ख्रिसमस साजरा करण्यास विरोध दर्शवला आहे.
मध्य प्रदेशमधील भोपाळ शहरातील अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहून त्यांनी शाळेत ख्रिसमस साजरा करु नये, तसेच विद्यार्थ्यांना सांताक्लॉज बनवू नये, अशी ताकीद या पत्राद्वारे दिली आहे.
विश्व हिंदू परिषदेनं पत्रात लिहिलंय की, “मध्य भारतातील लोक हे सनातन हिंदू धर्म आणि त्याची परंपरा मानतात. मात्र शाळेत ख्रिसमसच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना सांताक्लॉज बनण्यास भाग पाडलं जातं. हा आपल्या हिंदू संस्कृतीवर एकप्रकारे हल्ला आहे.
हिंदू धर्मातील विद्यार्थ्यांना ख्रिश्चन धर्माची प्रेरणा देण्याचे हे एक षडयंत्र आहे. तसेच विद्यार्थ्यांना ख्रिसमसनिमित्त वेगळे कपडे घ्यायला लावणे, ख्रिसमस ट्री घ्यायला भाग पाडणे, हे देखील पालकांवर आर्थिक ताण आणणारे असते.”
“शाळा हिंदू मुलांना सांताक्लॉज बनवून ख्रिश्चन धर्माबद्दल श्रद्धा आणि आस्था उत्पन्न करण्याचे काम करत आहेत का? आमची हिंदू मुलं राम बनो, कृष्ण बनो, बुद्ध बनो किंवा महावीर, गुरु गोविंद सिंह यापैकी काहीही बनो. याशिवाय क्रांतिकारी, महापुरुष ही बनोत पण सांताक्लॉज बनायला नकोत. ही भारताची भूमी संतांची भूमी आहे. सांताक्लॉजची नाही.
“जर शाळा विद्यार्थ्यांना सांताक्लॉज बनण्याचा आग्रह करत असेल तर अशा शाळांविरोधात विश्व हिंदू परिषद कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग अवलंबेल,”, अशा इशाराही या पत्रातून देण्यात आला आहे.