पुणे शहरात पीसीएमसी ते स्वारगेट व वनाज ते रामवाडी या दोन मार्गिकांमध्ये मेट्रो रेल उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हा मार्ग एकंदर 31 किमीचा असून त्यात 6 किलोमीटर लांबीचा कृषी महाविद्यालय ते स्वारगेट हा भुयारी मार्ग आहे. सध्या पुणे मेट्रोचे सुमारे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. विविध पातळ्यांवर कामाची गुणवत्ता नियमितपणे तपासली जाते आहे. ही गुणवत्ता जागतिक दर्जाच्या NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये परीक्षण केले जात आहे.
महामेट्रोच्या गुणवत्ता नियंत्रक प्रणाली यामध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी महामेट्रोने ISO 9001 या प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. 4 मार्च 2021 रोजी महामेट्रोला ISO 9001 : 2015 हे गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
महामेट्रो पर्यावरण संवर्धनाकडे सुरुवातीपासूनच सतर्क आहे. झाडांचे पुनर्रोपण, नवीन झाडांची लागवड , सौरऊर्जेचा वापर, बायोडायजेस्टर व IGBC ग्रीन बिल्डिंगच्या धर्तीवर स्टेशनची उभारणी अश्या अनेक पर्यावरण संवर्धक उपाययोजना महामेट्रो राबवत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी अधिक सुसूत्रता आणण्यासाठी महामेट्रोने ISO 14001 : 2015 प्रमाणपत्रांसाठी अर्ज केला होता. त्याचेही प्रमाणपत्र महामेट्रोला प्राप्त झाले आहे.