पाच राज्यांच्या निवडणुकींच्या निकालानंतर अशी परिस्थिती निर्माण होईल की महाराष्ट्रातून महाविकास आघाडी सरकारलाही सत्तेवरून जावं लागेल असं भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा वर्तवलं आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात पोलीस पक्षपातीपणे कारवाई करत असल्याचा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले, "महाविकास आघाडी सरकारची आताची परिस्थिती पाहिली तर कोणाही सांगू शकेल की हे सरकार आता जास्त काळ टिकणार नाही. आतापर्यंत दोन मंत्र्यांचे राजीनामे झाले. इतरांचेही येतील. पोलिसांच्या बदल्यांबाबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून आपल्याला यादी येत होती असं माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी मान्य केलं आहे. तर देशमुख म्हणाले अनिल परब यांच्याकडून त्यांना यादी येत होती."
"तसंच परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांना पुन्हा नोकरीत घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी दबाव आणल्याचं म्हटलं आहे. अशी स्थिती निर्माण होईल की महाविकास आघाडीला सत्ता सोडावी लागेल," असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.