Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

पुन्हा लॉकडाऊनपेक्षा नागरिकांनी सतर्क राहून संभाव्य लाट थोपवावी – छगन भुजबळ

पुन्हा लॉकडाऊनपेक्षा नागरिकांनी सतर्क राहून संभाव्य लाट थोपवावी – छगन भुजबळ
, शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021 (21:50 IST)
नाशिक जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत नसली तरी एक हजारांच्या आसपास स्थिर आहे.
लसीकरणाचा वेग विक्रमी वाढवण्यासह जिल्ह्यातील कोरोना संक्रमणात संवेदनशील असलेल्या ठिकाणांचा व परिसराचा अंदाज घेवून त्या ठिकाणांवर तात्काळ कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची मोहिम गतीमान करण्यात येईल.तसेच जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तालुक्यांतील ग्रामीण भागात नागरिकांनी कठोर निर्बंधाची वेळ न येवू देता सतर्कता बाळगून संभाव्य लाट थोपवावी, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
 
ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात मालेगाव येथून कोरोना विषयक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी बोलतांना मंत्री भुजबळ म्हणाले, नवरात्रोत्सव, दसरा दिवाळी यासारख्या सणांच्या निमित्ताने व बाजारांच्या निमित्ताने होणारी गर्दी पाहता नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना मास्क, सॅनिटाईजर, व सुरक्षित अंतराच्या नियमांचा अंगिकार केला नाही तर पुन्हा परिस्थिती गंभीर होवू शकते.
 
त्यामुळे वेळ आल्यास निर्बंधही कठोर करावे लागतील. प्रवासावर बंधने शिथिल झाल्यानंतर नागरिकांचा मुक्तसंचार तालुक्यात व जिल्हास्तरावर होत आहे. सर्वांवर सरसकट बंधने आणणे अव्यावहारिक असल्यामुळे त्यापैकी नेमके कोविड संसर्गाचा दृष्टीने संवेदनशील क्षेत्रात कोठून नागरिक जात आहेत अथवा कोणत्या कारणासाठी जात आहेत याची व्यवस्थित शहानिशा करणे गरजेच आहे. त्याचप्रमाणे योग्य प्रकारे हॉटस्पॉट ठरवून त्या हॉटस्पॉटकडे विशेष लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, हे तत्त्व लक्षात ठेवून कोविडचा अधिक प्रभाव असलेल्या जिल्ह्यांना लागून असलेल्या तालुक्यांमधील नागरिकांच्याआवागमनाची ठिकाणे प्रशासनाकडून निश्चित करण्यात येत आहेत.
 
त्यांची पडताळणी करून संबंधित तालुका प्रशासनाशी समन्वय साधून कोविड नियमांचे पालन करण्याबाबत त्या त्या आस्थापना चालकांना लेखी कळविण्यात येणार आहे. बाधित क्षेत्रातून आपल्याकडील तालुक्यांमध्ये येत असलेले नागरिक सुद्धा नेमके कोणत्या ठिकाणी अधिक प्रमाणात येत आहेत ते हॉटस्पॉट निश्चित करून त्या ठिकाणी देखील प्रतिबंधात्मक सर्व काळजी घेतली जात असल्याची खात्री करण्यात येणार आहे. सर्व आस्थापनाकडून कोरोना प्रतिबंधासाठी सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करत असल्याबाबतचे प्रमाणपत्र घेण्यात येणार आहे..
 
ग्राहकांची संख्या जास्त असलेल्या सर्व आस्थापनांमध्ये थर्मल गन व पल्स ऑक्सिमीटरद्वारे ग्राहकांची तपासणी व त्याबाबतची नोंद ठेवण्यात येणार आहे. लक्षणे असलेले नागरिक अशा ठिकाणी आढळून आल्यास त्यांना टेस्टसाठी रॅट (RAT) केंद्राकडे पाठवण्याच्या सूचना संबंधित आस्थापना चालकांना द्याव्यात, असे यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.
 
यावेळी ते म्हणाले, कॉन्टॅक्ट टेसिंगमध्ये एखादी आस्थापना वारंवार येत असल्याचे निदर्शनास आले तर संबंधित आस्थापना बंद करण्याची कार्यवाही करावी. गृह विलगीकरणात असलेल्या व्यक्तींची तपासणी करून त्या ठिकाणी गृह विलगीकरणाचे सर्व नियम पालन करण्यात येत असल्याची खात्री करावी. अन्यथा सदर रुग्णास नजिकच्या सीसीसी (CCC) केंद्रात त्यांना दाखल करावे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मध्ये येणाऱ्या व्यक्तींची कोविड चाचणी करणे बंधनकारक करावी, परंतु त्या व्यतिरिक्त प्रत्येक तालुक्यांतील हॉटस्पॉट निश्चित करून तेथे फिरणाऱ्या व लक्षणे असणाऱ्या सर्व व्यक्तींची कोविड टेस्ट करून घेण्याची व्यवस्था त्या हॉटस्पॉट च्या आस्थापना चालकांच्या मदतीने स्थापित करावी.
 
त्यासाठी रॅट चाचणीची ठिकाणे निश्चित करून त्यास प्रसिद्धीही देण्यात यावी. असे सांगून पालकमंत्री भुजबळ म्हणाले,  तालुक्यामधील संसर्गाची ठिकाणे निश्चित करून सर्व विभागाच्या समन्वयाने नियमांचे पालन होत असल्याची खात्री करावी. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापना व व्यक्ती यांच्या विरुद्ध कारवाई करावी. कोविड चाचणी केल्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत संबंधित व्यक्ती विलगीकरणात राहील याबाबत स्थानिक प्रशासन व आरोग्य विभाग यांनी दक्षता घ्यावी.
 
कोरोना प्रादुर्भावासंबंधी कॉन्टॅक्ट टेसिंग, लक्षणे, विलगीकरण कार्यवाही याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांनी सर्व ग्रामस्तरीय आरोग्य कर्मचारी यांना सूचना देऊन काटेकोर अंमलबजावणीसाठी प्रवृत्त करावे. कृषी उत्पन्न बाजार समित्या, कांदा टोमॅटो यांचे बाजार याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने तेथे गर्दी प्रतिबंधक उपाययोजना केल्या आहेत किंवा कसे तसेच मास्क चा वापर, शारीरिक अंतर याबाबत दक्षता घेतली जात आहे किंवा कसे याबाबत स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी बाजाराच्या दिवशी भेटी देऊन संबंधितांकडून योग्य कार्यवाही करून घ्यावी. संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी साप्ताहिक बैठक घेऊन रुग्ण कोठे वाढत आहेत व कोणत्याकारणाने वाढत आहेत याची कारणमीमांसा करावी व त्या दृष्टीने योग्य उपाययोजना तातडीने कराव्यात, असेही यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुख्यमंत्र्यांनी माशांचा पाहुणचार घ्यावा आणि परत जावं, विमानतळाचं श्रेय आमचंच : राणे