काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उददेशून घाणेरडी टीका केली आहे. यावर नाना पटोले यांच्यावर गुन्हा का दाखल होत नाही ? असा सवाल आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केला आहे.
मागील काही दिवसांपासून कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे चर्चेत आहेत. त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भाजप पुन्हा आक्रमक झाले आहेत. नुकतेच त्यांनी इगतपुरीत बोलताना वादग्रस्त विधान केले. ज्याची बायको पळते, त्याचे नाव मोदी ठरते, असे पटोले म्हणाले. या विधानावरून भाजप आक्रमक झाला आहे.
या पार्श्वभूमीवर बोलताना डॉ. पवार म्हणाल्या की, राज्यात काँग्रेसची परिस्थिती अत्यंत खराब असून काँग्रेस ला येत असलेल्या पराभवांमुळे या नैराश्यातून पटोले असे वक्तव्य करत आहेत, पराभवाच्या मानसिक धक्क्यातून सावरता सावरता त्यांना जळी स्थळी मोदी दिसायला लागले आहेत, वैयक्तिक टीका करणे ही आपल्या राज्याची आणि देशाची संस्कृती नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या कि, नाना पटोले याना प्रसिद्धीच्या हव्यासाचा नवीन छंद जडलेला दिसतो आहे, राज्यातील प्रश्नांना समोर न जाता पळ काढण्यासाठी पटोले यांच्याकडून मोदींवर टीका करण्यात येत आहे. अशा विधानातून नाना पटोले यांच्या बुद्धिमतेची दिवाळखोरी समोर आली आहे. आमच्या नेत्यांना वेगळा न्याय, नाना पटोले यांना एक न्याय, मात्र असेही घडत असताना नाना पटोले यांच्यावर गुन्हा का दाखल होत नाही ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. आमच्या नेत्यांना वेगळा न्याय, नाना पटोले यांना एक न्याय. पटोले यांना असे वक्तव्य करण्यासाठी परवाना काढणाऱ्यांचे काय, म्हणत त्यांनी काँग्रेस श्रेष्ठींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.