नांदेड : बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्याकांडातील प्रमुख शूटर दीपक रांगा याला नांदेड पोलिसांनी पंजाब येथील कारागृहातून ताब्यात घेतले. त्याला आज न्यायालयात हजर केले असता २१ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ५ एप्रिल २०२२ रोजी संजय बियाणी यांच्या शारदानगर निवासस्थानासमोर दोघांनी गोळ््या झाडून त्यांची निर्घृण हत्या केली होती. संजय बियाणी यांनी खंडणी न दिल्याने कुख्यात दहशदवादी हरविंदर सिंह उर्फ रिंदा याने त्यांची हत्या घडवल्याचे पोलिस तपासात उघड झाले होते.
एसआयटीने या प्रकरणात नांदेडमधून एकूण १७ जणांना अटक केली. गोळ््या झाडणारे दोघे फरार होते. त्यापैकी दीपक रांगा याला गेल्या जानेवारी महिन्यात एनआयएने नेपाळ बॉर्डरवर अटक केली होती. त्याच्यावर पंजाब येथील मोहाली पोलिस मुख्यालयावर ग्रेनेड हल्ला केल्याचा आरोप होता. शिवाय अनेक प्रकरणात तो पंजाब, हरियाणा, नांदेड पोलिसांना हवा होता. सध्या दीपक रांगा चंदीगड कारागृहात बंद होता. संजय बियाणी हत्याकांडाच्या तपासासाठी नांदेड पोलिसानी दीपक रांगा याला ताब्यात घेतले. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २१ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.