Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या दारी; राज्य सरकारवर दबाव टाकण्याची खेळी

भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या दारी; राज्य सरकारवर दबाव टाकण्याची खेळी
, बुधवार, 24 मार्च 2021 (16:30 IST)
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्य सरकार कोणतीही कारवाई करत नसल्याची तक्रार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे भाजपच्या शिष्टमंडळानं केली आहे. फोन टॅपिंग प्रकरणावरून राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणीही भाजपच्या शिष्टमंडळानं केली आहे. या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का आहेत, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे, या प्रकरणाचा राज्यपालांनी अहवाल मागवावा, अशी मागणी केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
 
राजभवनात राज्यपालांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. काही आठवड्यांमध्ये राज्यामध्ये घडणार्या घटना चिंताजनक असून, मुख्यमंत्र्यांचं मौन सर्वात चिंताजनक गोष्ट आहे. शरद पवार यांनी दोनदा पत्रकार परिषदा घेऊन अनिल देशमुख यांना पाठिशी घातलं, असं फडणवीस म्हणाले. काँग्रेसचं अस्तित्व नसल्यासारखं चित्र आहे.
 
दिल्लीतील नेते वेगळे बोलतात. इथले नेते वेगळे बोलतात. केवळ सत्तेसाठी हे सगळे एकत्र आले आहे, अशी टीका त्यांनी काँग्रेसवर केली. काँग्रेसची या प्रकरणात काय भूमिका आहे. काँग्रेसला किती वाटा आहे, असा सवाल त्यांनी केला.
 
या सर्व प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मौन का आहे. ते बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलतं केलं पाहिजे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच बदल्यांमधील भ्रष्टाचारावर काय कारवाई केली, यावर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा अशी आमची मागणी असल्याचंही फडणवीस म्हणाले. १०० हून अधिक मुद्दे आम्ही राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिल्याचं भाजपच्या नेत्यांनी सांगितलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सचिनच्या फॅनने घोरावडेश्वर डोंगरावरून पाहिला भारत इंग्लंडचा वनडे सामना