मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली. त्यांच्याशी मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत चर्चा केली. जेव्हा दोन नेते एकत्र भेटतात तेव्हा राजकीय चर्चा होतेच. तशी आमच्यातही झाली, असं सांगतानाच महापालिका निवडणुकीत एकत्र यायचं की नाही याचा निर्णय राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसच घेतील, असं सूचक विधान भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केलं.
मुंबई बँकेची निवडणूक होत आहे. या निमित्ताने सहकार पॅनल स्थापन करण्यात आलं आहे. या पॅनलमध्ये मनसेनेही सामील व्हावं म्हणून प्रसाद लाड यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. लाड यांनी राज ठाकरे यांच्याशी दीर्घ चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात ही भेट होती. सर्व पक्षाच्या नेतृत्वाने सहकार पॅनेल सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून बँकेची निवडणूक झाली पाहिजे हा सर्वांचा प्रयत्न होता. त्याबाबतीत राज यांच्याशी चर्चा केली. या संदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि त्यांचं फोनवर बोलणं करून दिलं. दरेकर लवकरच राज ठाकरेंना भेटायला येतील. राज ठाकरे सहकार पॅनलसोबत येतील ही अपेक्षा आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मदत होईल, असं त्यांनी सांगितलं.
महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांच्या राज ठाकरेंशी गाठीभेटी वाढल्या आहेत. महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्रं येण्याची चिन्हे तर नाहीत ना? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राजकीय उद्दिष्टाने बघितलं तर सर्वच बाबतीत बघता येईल. मी नेहमी राज ठाकरेंना भेटतो. भेटल्यावर राजकीय चर्चा नक्कीच होते. पण जो काही निर्णय आहे. तो देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंचा आहे. मी फक्त जिल्हा बँकेच्या संदर्भात त्यांना भेटलो. त्याबाबतच मी सांगू शकतो. पुढचं सांगू शकत नाही, असं सूचक विधान त्यांनी केलं.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत आहेत, मनसेही यावे
गेल्याच महिन्यात देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंना भेटले होते. आता आमच्यासमोर जिल्हा बँकेचा विषय आहे. सहकार पॅनल निवडून आणणं हे आमचं उद्दिष्ट आहे. सहकारात राजकारण नको. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे. तसंच मनसेही सोबत यावी ही अपेक्षा आहे. सहकारातून सहकार्य करण्यासाठीच सहकार असतो. त्याचा अर्थ तोच असतो. तोच प्रयत्न होत आहे. मनसे नेत्या रिटा गुप्ता आणि इतर नेते उद्या आमची भेट घेतील. त्यानंतर दरेकर आणि नलावडेंची भेट घेऊन ते पुढचा निर्णय जाहीर करतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.