Publish Date: Thu, 05 Aug 2021 (09:53 IST)
Updated Date: Thu, 05 Aug 2021 (09:54 IST)
कोरोनाचे संकट असो की पूरस्थिती असो, या परिस्थितीत माणसांना जगविण्याऐवजी मेलेल्या माणसांचे आकडे जाहीर करणारे सरकार राज्यात आहे, अशी टीका माजी मंत्री आमदार आशीष शेलार यांनी जळगावात केली. मुंबई विमानतळाला भाजप सरकारनेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिले असून आता या सरकारने हस्तांतराचा ठराव करून नंतर टक्केवारी घेतली जात असल्याचाही आरोपही त्यांनी केला. जळगावात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका करीत मनसे असो की राष्ट्रवादी काँग्रेस असो, यांच्याशी भाजप युती करणार नाही, असेही स्पष्ट केले.
कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात आकडे लपविण्यात आले. आता कोकणात पुराविषयी रेड ॲलर्ट देण्यात आला असताना तेथील नागरिकांना वाचविण्यासाठी राज्य सरकारने कोणतेच प्रयत्न केले नाही. नंतर पुराचे संकट आले व मृतांचे आकडे जाहीर करण्यात आले. त्यामुळे हे सरकार वाचविणारे नाही तर मृतांचे आकडे सांगणारे सरकार असल्याचे शेलार म्हणाले. पूरग्रस्तांना केलेली मदत परत घेण्यात येते, एवढे हे हवालदिल सरकार असून तेथील पालकमंत्रीही उदासीन असल्याची टीका त्यांनी केली. कोरोना संकटात शालेय शुल्क वाढीबद्दल त्यांनी शिक्षण सम्राटांसमोर झुकू नका, असा सल्ला राज्य सरकारला दिला.