नाशिक महापालिकेचा लाचखोर कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडला आहे. महापालिच्या अंबड विभागीय कार्यालयातील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेला तांत्रिक सहाय्यक भाऊराव काळू बच्छाव हा तब्बल २४ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडला आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
महापालिकेच्या डांबरी रस्त्यापलीकडे केबल टाकणे आवश्यक होते. त्यासाठी रस्ता खोदण्याचा परवानगी अर्ज महापालिकेत सादर करण्यात आला. या अर्जास मंजुरी देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितली. अखेर तडजोडी अंती ही रक्कम २४ हजार रुपये करण्यात आली. त्यानंतर याप्रकरणी एसीबीकडे तक्रार प्राप्त झाली. त्याची दखल घेत एसीबीच्या पथकाने सापळा रचला. आणि बच्छाव हा या सापळ्यात अडकला. २४ हजार रुपयांची रक्कम घेताना बच्छाव हा रंगेहाथ पकडले गेला. आता याप्रकरणी बच्छाववर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. तसेच, त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.
कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करणे गुन्हा आहे. असा प्रकार होत असल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor