Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्राचे लाडके नेते, विकासाचे शिल्पकार – देवेंद्रजी फडणवीस यांचा आज वाढदिवस!

devendra fadnavis
आपल्या धारदार वक्तव्यांनी विरोधकांना नामोहरम करणाऱ्या 'चाणक्या'ची प्रतिमा डोळ्यासमोर येते ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. तसेच प्रशासकीय अभ्यासू वृत्ती, उत्कृष्ट वक्ता आणि रणनीतिकार म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्रजींची एक खास ओळख आहे.
 
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज २२ जुलै २०२६ रोजी आपला ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू राजकारणाच्या झगमगाटात अनेकदा दुर्लक्षित राहतात. माननीय देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी नागपूर येथे गंगाधर आणि सरिता फडणवीस यांच्या पोटी झाला. राजकारण हा त्यांच्यासाठी एक वारसा होता. त्यांचे वडील विधान परिषदेचे सदस्य होते आणि त्यांची आत्या, शोभताई फडणवीस, पाच वेळा आमदार होत्या.मात्र, त्यांच्या खऱ्या वैचारिक पायाभरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये झाली, जिथे त्यांनी समाजसेवा आणि राष्ट्र प्रथम ही मूल्ये शिकली. शिक्षण घेत असताना, ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सामील झाले, जिथे त्यांच्या नेतृत्व कौशल्याला धार मिळाली.
 
फडणवीस यांचा राजकीय प्रवास खूप लहान वयात सुरू झाला. १९९२ मध्ये, नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेत असतानाच ते नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांनी १९९२ ते २००१ पर्यंत नगरसेवक म्हणून काम केले, परंतु त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट तेव्हा आला, जेव्हा ते वयाच्या २७ व्या वर्षी नागपूरचे महापौर बनले. ते नागपूरच्या इतिहासातील सर्वात तरुण महापौर होते, ज्यामुळे राज्यस्तरीय नेत्यांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले.
 
महापौर म्हणून मिळालेल्या यशानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांनी १९९९ मध्ये पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला आणि २०२४ पर्यंत सलग २५ वर्षे आमदार म्हणून काम केले. त्यांच्या प्रभावी वक्तृत्व कौशल्यामुळे आणि कायदेविषयक कामाच्या सखोल ज्ञानामुळे त्यांना पक्षात मोठे स्थान मिळाले. २०१३ मध्ये ते महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी पक्षाला प्रचंड विजय मिळवून दिला. २०१४ मध्ये त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शरद पवार यांच्यानंतर ते राज्यातील दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले. एकाच कार्यकाळात २०१९-२०२४ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते या महत्त्वाच्या पदांवर काम करण्याचा अनोखा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.
 
देवेंद्र फडणवीस हे केवळ एक यशस्वी राजकारणीच नाहीत, तर एक लेखक आणि विचारवंतही आहे. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहे.  त्यांचा प्रवास हे सिद्ध करतो की, चातुर्य, समर्पण आणि कठोर परिश्रमाने यशाची कोणतीही उंची गाठता येते. तसेच फार कमी लोकांना हे माहीत आहे की, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केवळ कायद्याची पदवी (एलएलबी) नाही, तर एका परदेशी विद्यापीठाशीही त्यांचा घनिष्ठ संबंध आहे. त्यांनी जर्मनीतील बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापनामध्ये पदव्युत्तर पदविका (पोस्ट-ग्रॅज्युएट डिप्लोमा) मिळवली आहे.
 
याच कारणामुळे, जेव्हा ते महाराष्ट्रातील मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची जबाबदारी घेतात, तेव्हा त्यांचे नियोजन अत्यंत अचूक असते. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग विक्रमी वेळेत बांधणे असो, मेट्रो नेटवर्क टाकणे असो किंवा बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती देणे असो, बर्लिनमध्ये त्यांनी शिकलेले आधुनिक नियोजन आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन त्यांच्या कामात स्पष्टपणे दिसून येतो.
 
राजकारणाच्या वर्तुळात वावरणाऱ्या फडणवीस यांच्या मनात एक संवेदनशील कलाकारही दडलेला आहे. नागपूरमधील विद्यार्थीदशेत असताना त्यांच्यात नाट्यकला आणि अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यांना कविता लिहिण्याची आणि वाचण्याचीही आवड आहे.
 
देवेंद्र फडणवीस यांना नवीन तंत्रज्ञान आणि गॅजेट्सची खूप आवड आहे. ते नेहमी स्वतःला अद्ययावत ठेवतात. याच आवडीमुळे त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाच्या (CMO) कामकाजात कागदविरहित कार्य आणि डिजिटल पारदर्शकता आणण्याचा ध्यास घेतला आहे. त्यांना सोशल मीडिया, डेटा विश्लेषण आणि नवीन सरकारी ॲप्सवर लक्ष ठेवण्यात विशेष रस आहे.   नागपूरच्या रस्त्यांवर एक सामान्य बूथ कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करणारे फडणवीस आता तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहे.
ALSO READ: सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणाऱ्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर; शरद पवारांचा विक्रम मोडला
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

''प्रशासकीय शिस्त आणि विकासाचा ध्यास घेतलेले लोकनेते – अजित पवार जयंती विशेष''