Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

महाआवास अभियानाअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळालेल्या ३ लाख २३ हजार लाभार्थ्यांचा गृहप्रवेश

महाआवास अभियानाअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळालेल्या ३ लाख २३ हजार लाभार्थ्यांचा गृहप्रवेश
, बुधवार, 16 जून 2021 (08:06 IST)
ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात आलेल्या महाआवास अभियानाअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळालेल्या ३ लाख २३ हजार लाभार्थ्यांनी मंगळवारी गृहप्रवेश केला. त्याचबरोबर या अभियानाअंतर्गत सुमारे चार लाख ६८ हजार घरकुलांची बांधकामे पुर्णत्वाच्या मार्गावर असून ती महिन्याभरात पूर्ण होऊ शकतील.अशा पद्धतीने या अभियानातून कमी कालावधीत सुमारे आठ लाख कुटुंबांना घरकुलाचा लाभ देऊन ग्रामविकास विभागाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी काढले आहेत.
 
सह्याद्री अतिथीगृह येथे हा कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात घरकुलांच्या चाव्या दिल्या. तर याचवेळी ई-गृहप्रवेशांतर्गत राज्यभरातील एकूण ३ लाख २२ हजार ९२९ लाभार्थ्यांना त्या त्या जिल्ह्यात चाव्यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार राहुल शेवाळे, खासदार विनायक राऊत आदी उपस्थित होते.
 
गेल्या दीड वर्षापासून राज्य कोरोनाच्या संकटाशी लढत असताना आपण नागरिकांना घरात राहा, सुरक्षित राहा असे आवाहन करत होतो. परंतु घर नसलेल्यांनी घरात कसे राहायचे, भूमीहीनांनी घरात सुरक्षित कसे राहायचे हा प्रश्न होता. ज्याचे उत्तर आज ग्रामविकास विभागाने दिले असून अभियान कालावधीत आठ लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट विभागाने निश्चित केले होते. त्यातील ३ लाख २२ हजारांहून अधिक घरकुले बांधून पूर्ण झाली. ज्याच्या चाव्या आज आपण लाभार्थ्यांना देत आहोत. तर उर्वरित चार लाख ६७ हजार ९५३ घरांचे काम एक महिन्यात पूर्ण होणार आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.
 
ग्रामविकास विभागाने जलदगतीने घरे बांधून गोरगरीबांना त्यांचे हक्काचे घर मिळवून दिले आहे. त्याबद्दल मी यंत्रणेत काम करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो. ३ लाख २२ हजार ९२९ घरकुलात राहणाऱ्या सदस्यांची संख्या लक्षात घेतली तर आज १५ लाख लोकांच्या डोक्यावर महाआवास अभियानातील घरकुलांनी छत उपलब्ध करून दिले आहे, त्यांना सुरक्षित केले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परदेशात शिक्षणासाठी असलेल्या शिष्यवृत्तीला मुदतवाढ