Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

देवेंद्र फडणवीस: 'मला सहआरोपी बनवता येईल का, अशा रितीने पोलिसांनी प्रश्न विचारले

देवेंद्र फडणवीस: 'मला सहआरोपी बनवता येईल का, अशा रितीने पोलिसांनी प्रश्न विचारले
, सोमवार, 14 मार्च 2022 (18:00 IST)
"राज्यात जो बदल्यांचा महाघोटाळा झाला ही सर्व माहिती मी केंद्रीय गृहसचिवांना पाठवली. त्यानंतर सीबीआय चौकशी लागली. या सरकारने याबाबतचा रिपोर्ट दाबून ठेवला. तो मी बाहेर काढला. मला पोलीसांनी प्रश्नावली पाठवली होती. मी त्याचं उत्तर देणार आहे असं कळवलं होतं. त्यानंतर मला अचानक काल नोटीस देण्यात आली. मी विधीमंडळात जे सरकारचे घोटाळे बाहेर काढतोय त्यानंतर ही नोटीस आली."
 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रविवारी (13 मार्च) पोलिस चौकशी झाली. या चौकशीनंतर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत नेमकं काय झालं याबद्दल आपली बाजू मांडली.
 
देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली होती. या नोटिशीनुसार 13 मार्चला सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या निवासस्थानी सायबर गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी चौकशीसाठी दाखल झाले.
 
डीसीपी हेमराज सिंह राजपूत आणि एसीपी नितीन जाधव हे फडणवीस यांच्या घरी पोहोचले आणि त्यांचा जबाब नोंदवण्यात आला.

यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, "आज मला जे प्रश्न पाठवण्यात आले होते आणि आजच्या चौकशीतले प्रश्न पूर्ण वेगळे होते. जणूकाही मी official secrecy act चा भंग केला आहे असे ते प्रश्न होते. एखाद्या साक्षीदारांसारखी ती चौकशी नव्हती. ती मी आरोपी असल्यासारखी होती. मला सहआरोपी बनवता येईल का, अशारीतिने पोलिसांनी प्रश्न विचारले.
 
"मी ट्रान्सक्रिप्टची कागदपत्रं गुप्त असल्यामुळे ते मी उघड केलं नाही. हे सर्व संवेदनशील मटेरियल मी प्रसिद्धीच्या मागे न लागता, संबंधित अधिकाऱ्यांकडे सूपूर्द केले आहेत. हे सर्व कागदपत्रे आणि ट्रान्सक्रिप्ट नवाब मलिक यांनी माध्यमांना दिले आहेत. त्यामुळे जर याची चौकशी करायची तर नवाब मलिकांची झाली पाहिजे."
 
संबंधितांचा जबाब घेणं गरजेचं - गृहमंत्री
या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
 
मुंबईतल्या पत्रकार परिषदेत वळसे पाटील म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांना 5 वेळा नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसचा अर्थ समन्स असा होत नाही. फडणवीस यांनी काही बदल्यांबाबतची माहिती समोर आणली, त्याबाबत माहिती घ्यायची होती. त्यांना याआधी देखील दोनदा प्रश्नावली पाठवण्यात आली आहे.
 
"राज्य विभागाची गोपनीय माहिती बाहेर गेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या याप्रकरणी 5 अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्यांचा संबंध आहे, त्यांचा जबाब घेणं गरजेच आहे,'' असंही राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत.
फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी सध्या भाजपचे अनेक नेते जमले आहेत. राज्यातही अनेक ठिकाणी फडणवीसांना दिलेल्या नोटीशीच्या प्रतींची होळी केली जात आहे.
 
काल काय घडलं?
महाराष्ट्रात झालेल्या पोलीस अधिकारी बदली घोटाळ्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांना 12 मार्च रोजी नोटीस बजावण्यात आली.
 
त्यानुसार फडणवीस यांना 13 मार्च रोजी बीकेसीमधील सायबर गुन्हे शाखेसमोर उपस्थित राहायचं होतं.
 
पण, देवेंद्र फडणवीस यांनी संध्याकाळच्या सुमारास ट्वीट करत म्हटलं होतं की, "गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त यांचा दूरध्वनी मला आत्ता आला होता. त्यांनी सांगितले की, तुम्ही पोलिस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ. मी माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून, दिवसभर घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात."

राजकीय आरोप-प्रत्यारोप
देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीवरून सुरु असलेल्या गोंधळावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत ट्विट करत म्हणाले की, ''कमाल आहे! काही लोक व काही राजकीय पक्ष स्वत:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत? महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनधींनीना राजकीय सुडापोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले.
 
"लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का?''
तसेच काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी ही ट्वीट केलं आहे. ते म्हणतात, "उगीच कांगावा करणाऱ्या भाजपासाठी- CRPC 160 , हे साक्षीदारांसाठी आहे. गुन्हेगारांसाठी नव्हे."

या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही, "भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्रातील तमाम जनता देवेंद्रजींच्या पाठीशी खंभीरपणे उभी आहे."
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं की, "या संदर्भात रीतसर कायदेशीर प्रक्रिया असेल, ती देवेंद्र फडणवीस पूर्ण करतील. कारण कायद्याचा सन्मान करणारे आम्ही लोक आहेत.
 
"देवेंद्रजी तर स्वत: मुख्यमंत्री राहिले आहेत. गृहखात्याचे प्रमुख म्हणून गृहमंत्री राहिलेत आणि ते निष्णात वकील आहेत. पोलिसांना किंवा कायद्याला साथ देणं, हे आम्ही ठरवलं आहेत. त्यांना जी मदत लागेल, ती दिली जाईल."
"आमच्यासोबत दंडेलशाही करणार असाल, जो आरोप करतो त्याचीच चौकशी करणार असाल, तर भाजप सहन करणार नाही. महाराष्ट्रातली जनता चिडून आणि पेटून उठली आहे," असंही प्रवीण दरेकर म्हणाले.
 
भाजपचे आमदार नितेश राणेंनी महाविकास आघाडीला इशारा देत म्हटलं की, "केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षनेते, आमदार यांसारख्या लोकांमधून निवडून आलेल्यांना तुम्ही अशाप्रकारे नोटीस देत असाल, प्रोटोकॉल डावलून तुम्ही कृत्य करत असाल, तर तुम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये शिक्षा मिळेल."
 
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले की, "उद्धव ठाकरेंना त्यांची इज्जत गोवा आणि उत्तर प्रदेशनं त्यांच्या हातात दिलीय. बदलीने किती पैसे घेतले याचा हिशेब देत नाहीत. फडणवीस असो किंवा सोमय्या, कितीही दबाव आणला, तरी हिशेब द्यावा लागेलच. ठाकरे सरकारचे 'डर्टी डझन' समोर येणारच."
 
काय आहे प्रकरण?
दरम्यान, महाराष्ट्रात झालेल्या पोलीस अधिकारी बदली घोटाळ्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
 
याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी 12 मार्चला दुपारी पत्रकार परिषदेत म्हटलं, "मार्च 2021 मध्ये प्रदेश भाजपा कार्यालयात एक पत्रपरिषद घेतली होती. त्यात पोलिस बदल्यांच्या रॅकेटचे संपूर्ण पेनड्राईव्ह, ट्रान्सक्रिप्ट यासंदर्भात माहिती देत, ते मी त्याच दिवशी दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांना सादर केले होते. पुढे न्यायालयाने ही चौकशी सीबीआयकडे दिली.
 
"तथापि, महाविकास आघाडी सरकारने आपला हा घोटाळा दाबण्यासाठी एक एफआयआर केला. यासंदर्भात मला नोटीसा देण्यात आल्या. माहिती देईन, असे मी सांगितले होते. आता मला सीआरपीसी 160 अंतर्गत पोलिस ठाण्यात उपस्थित राहण्यासाठी नोटीस प्राप्त झाली."

"विरोधी पक्षनेता म्हणून माझा विशेषाधिकार आहेच आणि माहितीचा स्त्रोत मला विचारला जाऊ शकत नसला तरी मी चौकशीला जाणार आणि विचारलेल्या प्रश्नांना योग्य उत्तर देणार. पोलिसांनी चुकीची केस केली असली तरी माजी गृहमंत्री म्हणून पोलिसांना पूर्ण सहकार्य करीन," असंही फडणवीस पुढे म्हणाले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फडणवीसांचा नवा पेन ड्राइव्ह बॉम्ब