Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑनलाईन जुगार व गैरप्रकार रोखण्यासाठी कायदा करणार-देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis
, शुक्रवार, 15 डिसेंबर 2023 (08:45 IST)
नागपूर  : ‘महादेव अ‍ॅप’च्या माध्यमातून झालेल्या फसवणुकीची अंमलबजावणी संचालनालयाकडून तसेच राज्यात दाखल गुन्ह्यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू आहे. अशा प्रकारचे गुन्हे आणि गैरप्रकार रोखण्यासाठी आता राज्य शासन डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करीत असून गरज पडल्यास राज्य सरकार कायदाही करेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. महादेव अ‍ॅपच्या संचालकांच्या दाऊद कनेक्शनचीही येत्या 2 महिन्यांत चौकशी करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
 
भाजपाच्या आशिष शेलार यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. या वेळी महादेव अ‍ॅपच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात ऑनलाईन अनधिकृत बेटींग करण्यासाठी अनेक बेटींग अ‍ॅपच्या निर्मिती करून सदर बेटींग अ‍ॅपच्या माध्यमातून देशभरातील अनेक सामान्य गरीब माणसांची फसवणूक करण्यात आली. या अ‍ॅपमधील पैसे बांगलादेशी नागरिकांचे बनावट भारतीय कागदपत्रे बनवून एयु स्मॉल फायनान्स बँक या बँकेत हजारो बनावट खाते उघडून यातून आर्थिक व्यवहार केले गेले तसेच शासनास बुडविल्याप्रकरणी देय असलेला 28 टक्के सेवा व वस्तू कर चुकवल्याचा आरोप आशिष शेलार यांनी या वेळी केला.
 
या वर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महादेव अ‍ॅपची ईडीमार्फत चौकशी करण्यात आली असून संपूर्ण देशभरातील विविध राज्यांत या गुन्ह्याची व्याप्ती असून या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. महादेव अ‍ॅप ही मूळ कंपनी स्थापन करण्यात आली. त्या नंतर 67 वेगवेगळ्या वेबसाईट्स तयार करण्यात आल्या. या वेबसाईटचे मालक वेगवेगळे असले तरी त्यांची भागीदारी या महादेव अ‍ॅपमध्ये असल्याचे आढळून आले मात्र या अ‍ॅपची नोंदणी ही दक्षिण अमेरिकेत करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

यात कोणाकोणाची गुंतवणूक आहे? हा पैसा कुठून आला आहे? याचा तपास विशेष पथक करीत आहे. या प्रकरणी 2 महिन्यांत कार्यवाही करण्यात येईल, अशी माहितीही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. ऑनलाइन गेमिंगसंदर्भात काही प्रतिबंधात्मक अथवा नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकार पावलं उचलत आहे. गरज पडल्यास राज्य शासन राज्यापुरता कायदा अथवा नियमावली तयार करेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
 
सेलिब्रिटींनी जाहिराती करू नयेत
ऑनलाईन गेमिंगच्या जाहिराती अनेक नामांकित व्यक्ती करीत असतात. यामुळे सामान्य लोक अशा गेम्सच्या जाळ्यात अडकतात त्यामुळे कलाकारांनी अशा जाहिराती करणे टाळावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.

Edited by -Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकार सकारात्मक-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे