Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

एक लाख ५ हजार ५०० घरेलू कामगारांना प्रत्येकी दीड हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य

एक लाख ५ हजार ५०० घरेलू कामगारांना प्रत्येकी दीड हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य
, रविवार, 2 मे 2021 (15:38 IST)
राज्यात कोविड विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या प्रार्दुभावामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या काळात महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी व नूतनीकरण झालेल्या घरेलू कामगारांसाठी पहिल्या टप्प्यात सक्रिय व जीवित नोंदणी असलेल्या एकूण एक लाख ५ हजार ५०० घरेलू कामगारांना प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे एकूण १५ कोटी ८२ लाख ५० हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. 
 
निर्णयानुसार महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी व नूतनीकरण झालेल्या  एक लाख ५ हजार ५०० घरेलू कामगारांच्या बँक खात्यामध्ये थेट (डीबीटी) द्वारे प्रत्येकी दीड हजार रुपये  वितरित करण्याची कार्यवाही विकास आयुक्त (असंघटित कामगार) यांच्या स्तरावरून लवकरच करण्यात येत आहे. घरेलू कामगारांच्या थेट खात्यात शासनातर्फे मिळणारा हा निधी जमा होणार असल्याने घरेलू कामगारांना मोठा दिलासा मिळणार असल्याचेही कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.  
 
घरेलू कामगारांप्रमाणेच राज्यातील नोंदीत सक्रिय १३ लाख बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व  इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य थेट त्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही सुरू असून राज्यातील १३ लाख बांधकाम कामगारांपैकी ९ लाख १७ हजार नोंदित बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य करण्यात आले आहे. त्याशिवाय गेल्या वर्षीही कोविड -१९ या विषाणूच्या प्रादूर्भाव कालावधीत नोंदित बांधकाम कामगारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत करण्यात आली होती, असेही कामगारमंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. 
 
‘ब्रेक दि चैन’ अंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे इमारत व इतर बांधकामे तसेच इतर कामगार वर्ग आणि घरेलू कामगांराना  आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब विचारात घेऊन नोंदित तसेच घरेलू कामगारांना दीड हजार रुपयाचा अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कामगार विभागाने घेतला. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी सुरू होत असून त्याची कार्यवाही अधिक गतीने  करण्याचे निर्देश कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे निर्णायक आघाडीच्या दिशेने