गोव्यात २०२२ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. गोव्यातील सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येणार असल्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील गोव्यातून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरु आहे. तसेच शिवसेना देखील पूर्ण ताकदीने गोवा निवडणूक लढवणार असल्याचे शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेना- काँग्रेसची युती होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत चर्चा सुरु असून सकारात्मक निर्णय़ झाला तर युती होईल अन्यथा शिवसेना स्वबळावर पूर्ण ताकदीने लढेल असे संजय राऊत म्हणाले आहेत.
महाराष्ट्राप्रमाणेच गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येईल का? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आला होता. यावर संजय राऊत म्हणाले की, गोव्यातील काँग्रेस आणि शिवसेनाबाबतच्या युती संदर्भात प्राथमिक चर्चा सुरु आहे. माझी काँग्रेसमधील काही लोकांशी चर्चा सुरु आहे. पण प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो. ज्या राज्यात अशाप्रकारच्या आघाड्या करायच्या आहेत त्या राज्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करायला लागते. ती प्रकिया तशी मोठी आहे. जर आघाडी झाली तर त्याचे स्वागत आहे. पंरतु ते तयार झाले नाहीतर आम्ही गोव्यात २२ जागांवर स्वतंत्र लढू असे संजय राऊत म्हणाले.
आगामी वर्षातील गोवा विधानसभा निवडणूकीमध्ये शिवसेना पूर्ण ताकदीने लढणार आहे. गोव्यात ४० जागांपैकी २२ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.