शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे यांनी आता आणखी आक्रमक धोरण स्विकारण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी आता एकेक पाऊले टाकत आहेत. सर्वप्रथम त्यांनी आपल्याकडे ४० पेक्षा अधिक संख्याबळ असल्याचा दावा केला. त्यानंतर आता त्यांनी पुढील दिशा स्पष्ट केली आहे.
आज सायंकाळी होणाऱ्या बैठकीला आमदारांनी उपस्थित रहावे, असे पत्र शिवसेनेच्यावतीने आमदार सुनील प्रभू यांनी काढले आहे. मात्र, हे पत्र बेकायदेशीर असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. यासाठीच शिंदे यांनी प्रभारी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरतत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवेध आहेत, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
शिंदे यांच्याकडे जवळपास ४० आमदारांचे पाठबळ आहे. तर, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सेनेकडे केवळ १७ ते १८ आमदार आहेत. त्याजोरावरच शिंदे यांनी थेट कायद्याची भाषा वापरण्यास प्रारंभ केला आहे. याद्वारे शिंदे यांनी उद्धव यांनाच थेट आव्हान देण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट होत आहे.