“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीबीआयबद्दल स्वतःच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना क्लिन चीट दिली. सुशांतची आत्महत्या नाही, तो खून आहे. आरोपी आज ना उद्या गजाआड जातील. त्यात त्यांचा पूत्र आदित्य ठाकरे तुरुंगात जाईल”, असा दावा भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी केला आहे.
“आज मी स्पष्ट बोलतो. ते सत्तेचा दुरुपयोग करुन मुलाला वाचवत आहेत. सुशांतच्या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल. त्याला कुणी मारलं आणि दिशाचा बलात्कार कुणी केला, तिला वरुन खाली कोणी टाकलं हे सर्व बाहेर येईल. या माणसाने त्याच्या आयुष्यात काहीही केलेलं नाही. इतरांच्या मदतीनेच कामं केली”, अशी टीका राणे यांनी केली.
“आमचा तोल गेला तर आम्ही मातोश्रीची आतली आणि बाहेरची जी माहिती देऊ ती महागात पडेल. बाळासाहेब ठाकरेंकडे पाहून अजून संयमाने गप्प बसलो आहे. आमच्याकडे नजर फिरवू नका. आम्ही नजर फिरवली तर कपडे सांभाळत पळता भुई थोडी होईल”, असा घणाघात नारायण राणे यांनी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात राणे पिता-पुत्रांवर सडकून टीका केली होती. या टीकेला नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं .
“कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे पिंजऱ्यात होते आत्ता कुठे एका दौऱ्याला बाहेर पडले. हे स्वतःला वाघ म्हणतात. हे पिंजऱ्यातील वाघ आहेत का? सभेत केवळ 47 लोक टाळ्या वाजवायला होते. मी शिवसेनेत होतो, अनेक पदं भुषवली. बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक पदं दिलं. मी बेडूक नव्हतो. हे बेडूक आहेत म्हणून त्यांना मुख्यमंत्री केलं नाही. बाळासाहेब असते तर त्यांना मुख्यमंत्री केलं नसतं. ते जास्त बोलले तर 47 वर्षात जे केलं ते सर्व बाहेर काढेल”, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.
“बाळासाहेब ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी छळलं आहे. 2005-06 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेना भवनसमोर गडकरी चौकात घ्यावं असं वाटत होतं. त्यांनी सर्व नेत्यांसमोर तसं सांगितलं. मी त्यांच्याविषयी अशा घटना सांगितल्या तर मुख्यमंत्रीपद सोडून पळतील हे”, असा टोला राणेंनी लगावला.
“उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचं न ऐकता आपल्या वाढदिवसाला 27 जुलै 2006 रोजी नव्या शिवसेना भवनाचं उद्धाटन केलं. बाळासाहेब ठाकरे यांनी दसऱ्याला उद्घाटन करण्यास सांगितलं होतं. वडिलांचं नाव सांगतात. वाघ म्हणवून घेतात, कुणाच्या कानफडात तरी मारली का? केसेस आम्ही अंगावर घेतल्यात”, असं नारायण राणे म्हणाले.