ऐन दिवाळी जवळ आल्याने बहुतांश ठिकाणी फटाके विक्रेत्यांना परवाने देऊन विक्रीही सुरू झाली. निर्बंध शिथील होत असल्याने दिवाळी उत्साहात साजरी करण्याकडे नागरिकांचा कल असताना नाशिकच्या विभागीय आयुक्तांच्या फटाकेबंदीच्या पत्रामुळे नवा धमाका झाला होता. मात्र आता उत्तर महाराष्ट्रातील फटाके विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनं हा तिढा अखेर सुटला आहे. अखेर आता उत्तर महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यात होणार फटाके विक्री होणार आहे. महापालिका महासभेआधीच फटाके विक्री बंदी मागे घेण्यात आली असून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनं तिढा सुटल्याची माहिती मिळत आहे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी 5 जिल्ह्यांना निर्देश दिले होते. मात्र,भुजबळ यांनी थेट प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्या सोबत संवाद साधल्याची माहिती मिळत आहे.
दिवाळीत फटक्यांना बंदी घालण्याचा ठराव करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे यांनी सर्व महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला दिल्या. त्यामुळे नाशिक विभागात म्हणजेच उत्तर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांपुढे पेच निर्माण झाला होता.
डॉ. गमे यांनी नाशिक विभागातील नाशिक, नगर, जळगाव, धुळे व नंदुबार जिल्ह्यासाठी फटाकेबंदीच्या सूचना दिल्या आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी नाशिक विभागातील सर्व महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने फटाके विक्री आणि वापर यावर बंदी घालण्याचा ठराव मंजूर करावा. नियमित सभेत हा ठराव होऊ शकला नाही, तर त्यासाठी विशेष सभा बोलाविण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. २२ ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून फटाके बंदीची अधिसूचना काढण्यात यावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. सर्व जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना डॉ. गमे यांनी हे पत्र पाठविले आहे. दिवाळीत होणारे ध्वनी आणि हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी फटाक्यावर बंदी आणण्याचा ठराव महासभेत करण्यात यावा, त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी कराव्यात, असे पत्रात म्हटले आहे.
यंदाच्या दिवाळीत उत्तर महाराष्ट्रात फटाकेबंदीच्या नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमेंच्या सूचनेला नगरमधील मनसेनं विरोध केलाय. नगरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसे पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन फटाके फोडून गमेंच्या सूचनेचा निषेध केलाय. फटाकेबंदी म्हणजे हिंदुत्वावर घाला असल्याची प्रतिक्रिया मनसे नगर जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी म्हटलंय.