मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज (2 नोव्हेंबर) नववा दिवस आहे. ते आज ( 2 नोव्हेंबर) काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष असेल.
मनोज जरांगे यांनी घोषणा केल्याप्रमाणे पाणी सोडलं आहे, त्यांची तब्येत खालावली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी काल पाणी सोडल्याची घोषणा केल्यावर त्यांच्या चिंतेमुळे अनेक लोक त्यांना भेटायला आल्याची माहिती तिथे उपस्थित बीबीसी प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे यांनी दिली आहे. तिथे सरकारविरोधी प्रचंड रोषाचं वातावरण असून सातत्याने सरकारविरोधात घोषणा दिल्या जात आहेत.
जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तेथील उपस्थितांना काळजी वाटत आहे. त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ नये अशी प्रार्थना करत असल्याची भावना आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी व्यक्त केली.
आज (2 नोव्हेंबर) 12 वाजता मंत्रिमंडळाचं एक शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत पोहोचणार आहे. काल सर्वपक्षीय मंत्रि गोष्टींचं एक नविदेन ते जरांगे पाटलांना देतील, आणि आणखी वेळ द्या, अशी मागणी करतील. या शिष्टमंडळात अतुल सावे,संदिपान भुमरे आणि नारायण कुचे यांचा समावेश असेल.
1 नोव्हेंबरला मुंबईत झालेल्या सर्व पक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषण मागे घ्या असं आवाहन मनोज जरांगे यांना केलं होतं.पण जरांगे उपोषणावर ठाम आहेत.
आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीत अमित शाह यांची भेट घेणार आहेत. तसंच शिष्टमंडळ जरांगेंना भेटण्याच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली आहे.
पुण्यातून अनेक ठिकाणी जाणारी एसटी सेवा बंद
सध्या स्थितीत सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर या मार्गावरील वाहतूक बंद आहे. पोलीस प्रशासनाने सूचना दिल्यानंतर बसेस सुरू होतील असं स्वारगेट येथील डेपो मॅनेजर यांनी बीबीसी मराठीला माहिती दिली आहे. याबद्दल सोशल मीडियावरून माहिती दिली जात आहे असं ते म्हणाले.
अनेक मार्ग बंद असल्यामुळे खासगी सेवेशिवाय प्रवाशांना पर्याय नाही असं चित्र स्वारगेट बसस्थानकावर सध्या दिसत आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. अनेकांनी आपली व्यथा बीबीसी मराठीकडे मांडली.
मराठा आरक्षण आंदोलनाबद्दल छगन भुजबळांना काय वाटतं?
मराठा आरक्षण आणि जरांगेचं आंदोलन या विषयावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी रास्त आहे का? या प्रश्नाच्या उत्तरादाखल ते म्हणाले, “सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळालं की आपोआप तुम्ही ओबीसीमध्ये येता. आम्हालाही आज ओबीसी सर्टिफिकेट हवं असेल तर आम्हाला सिद्ध करावं लागतं. त्यात वेळ जातो. त्याशिवाय आम्हालाही ओबीसी सर्टिफिकेट मिळत नाही. त्यामुळं सरसकट दिलं तर ते दुसऱ्या दिवशी कोर्टात रद्द होईल. त्यामुळं पुरावे द्यावे लागतात आणि नियमानुसार द्यावे लागतात.”
“जरांगेंची मागणी अशीच होती की, निजामकालीन कागदपत्रांनुसार आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्या. त्यासाठीच समिती नेमली आणि कागदपत्र तपासली. त्यामुळं पुरावे मिळाले तर त्याला आम्हीही विरोध करू शकत नाही. त्याला कुणीच विरोध करू शकत नाही.”
ते पुढे म्हणाले, “ओबीसीमधून द्या असं कोणीच म्हणत नाही. सगळे एससी, एसटी, ओबीसी आरक्षणला धक्का न लावता वेगळ आरक्षण द्या असंच म्हणत आहेत.
फडणवीसांनी जो कायदा तयार केला त्यात सर्वानुमते हा क्लॉज टाकण्यात आला आहे. त्यामुळं सगळे म्हणतात तेच मी म्हणतो. फक्त मी ओबीसी समाजाचा कार्यकर्ता आहे, त्यामुळं मी विरोध करतो असं म्हटलं जातं नाव येतं.”
आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणावरही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, “आंदोलन हिंसक झालं हीच दुःखाची बाब आहे. त्यांचे मोर्चे अतिशय शांतपणे निघाले, त्याचाही परिणाम झाला. त्यामुळंच तर कायदे तयार केले गेले. मोर्चे पाहूनच ते झालं, त्यासाठी जाळपोळ करावी लागली नाही. मग आताच हा उद्रेक का हेच कळत नाही.”
काल झालेल्या पत्रकार परिषदेत जरांगे काय म्हणाले?
बुधवारी (1 नोव्हेंबर) संध्याकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी आरक्षण मिळेपर्यंत पाण्याला हात लावणार नाही असं म्हटलं.
मनोज जरांगेंनी म्हटलं की, "आमचा नाईलाज आहे, आम्हाला कठोर लढावं लागेल. होणाऱ्या सगळ्या प्रकाराची जबाबदारी सरकारवर राहिलं.
सरकार जाणूनबुजून गुन्हे दाखल करत आहे. वकील बांधवांनी आपल्या मराठा बांधवांसोबत उभं राहावं."
मराठे शांततेत आंदोलन करणार आहेत. मात्र सरकारवर वातावरण दूषित करण्याचा आरोप त्यांनी केला.
'मला कधीपर्य़ंत बोलता येईल आणि कधी माझं बोलणं एकदम थांबेल हे आता सांगता येणार नाही,' असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितलं की, "जिल्ह्यातील परिस्थिती सध्या शांततापूर्ण आहे. आम्ही मनोज जरांगे आणि त्यांच्या टीमच्या संपर्कात आहोत.
अफवा पसरत असल्याने इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. बीड हा शेजारचा जिल्हा आहे. बीडमधील हिंसाचाराचा व्हीडिओ क्लिप आणि इतर गोष्ट व्हायरल झाल्या की चुकीचा संदेश जातो.
जिल्ह्यात कर्फ्यू लागू नाही. कोणत्याही आंदोलनाला बंदी नाही, पण हिंसक निदर्शनास परवानगी नाही, त्यावर कारवाई केली जाईल. जिल्ह्यात अतिरिक्त फौजफाटा मागवण्यात आला आहे."
मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठकीतील ठराव
"मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत आहे. याच्या कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारं आरक्षण दिले जाऊ शकते व त्यासंदर्भात राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत.
कायदेशीर कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्यात यावी. मात्र, त्याला आवश्यक तो वेळ देणे गरजेचे आहे. हे पण लक्षात घेणे आवश्यक आहे. असा ठराव काल(1 नोव्हेंबर) संमत करण्यात आला.
"राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत, त्या अयोग्य असून यामुळे आंदोलनाची बदनामी होत आहे. या घटनांबद्दल आम्ही तीव्र नापसंती व्यक्त करतो.
"राज्यात कुणीही कायदा हाती घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
तसंच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते श्री. मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे व आपले उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे."
मात्र त्यानंतरही जरांगे पाटील त्यांच्या निर्णयापासून तसुभरही हलले नाहीत.